
सिमेंटेक या तंत्रज्ञानाच्या सुरक्षा क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनीने नुकताच एका मालवेअर बदल अलर्ट जारी केला आहे. Xhelper नावाच्या या मालवेअरने आतापर्यंत जगभरातील तब्बल 45 हजारांपेक्षा जास्त मोबाईलवर हल्ला केला असून त्याची व्याप्ती प्रत्येक दिवशी वेगाने वाढते आहे. गेल्या महिन्यापासून दिवसाला सरासरी 131 मोबाईल फोन्स या मालवेअरच्या विळख्यात सापडत आहेत. हा मालवेअर अत्यंत खतरनाक असून अनइंस्टॉल केल्यानंतरदेखील तो पुन्हा स्वतःला इन्स्टॉल करून घेतो. आजवर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संगणकाच्या तुलनेत मोबाईल डिव्हाईसेसना सुरक्षित मानले जात होते. मात्र वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आता मोबाईल्सदेखील विविध व्हायरस आणि मालवेअरच्या विळख्यात सापडत आहेत आणि त्यामुळे ग्राहकांच्या खासगी माहितीची चोरी, मोबाईल फोन्सचे नुकसान अशा घटनांमध्ये वेगाने वाढ होते आहे. सिमेंटेकने शोधलेला हा मालवेअर खरे तर मार्च 2019 सालीच सापडलेला होता. मात्र त्यावेळी अत्यंत साधा असलेला आणि अधोकादायक गटात मोडणारा होता. त्यावेळी या मालवेअरचे काम विविध जाहिरातींच्या पानांवर ग्राहकांना रिडायरेक्ट करणे एवढेच होते आणि याचा कोडदेखील अत्यंत साधेपणाने लिहिलेला होता. मात्र काळाबरोबरच हा मालवेअरचा कोड बदलत गेला आणि हा मालवेअरदेखील अत्यंत धोकादायक बनत गेला. आता हा मालवेअर अत्यंत धोकादायक गटापर्यंत जाऊन पोहोचला आहे. हा मालवेअर आता फक्त ग्राहकांना जाहिरातीच्या पेजवर रिडायरेक्टच करत नाही, तर स्वतःचे आयकॉन्स लपवणे, विविध घातक पॅकेजेस इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेणे, काढून टाकल्यानंतरही पुन्हा स्वतःला री-इन्स्टॉल करणे अशा अनेक धोकादायक कामांना मूर्त स्वरूप देऊ लागला आहे. ज्या नमुन्यांची तपासणी करून सिमेंटेकने हा मालवेअर शोधला, त्याची सॅम्पल्स गुगल प्लेवर सापडत नाहीत. याचाच अर्थ गुगल प्लेवरच्या कोणत्याही ऑप्लिकेशनच्या मदतीने हा मालवेअर पसरत नसून बहुदा ग्राहक खासगी वेबसाईट्सवरून डाऊनलोड करून घेत असलेल्या धोकादायक ऑप्लिकेशन्सचा याला हातभार लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.





























































