बदनाम गल्ल्यांचा अक्षर ‘फरिश्ता’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>>समीर गायकवाड

आदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दीन सिद्दिकी अभिनित ‘मंटो’ हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटो यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांचा पट रंगत असताना या कथांतील पात्रे मध्ये येतात. त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. परंतु ‘मंटो’ समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं. मग ते पानागणिक उलगडत जातात!

11 मे 1912 रोजी लुधियानातील एका बॅरिस्टरच्या कुटुंबात मंटो यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण सामान्य मुलांप्रमाणे व्यतित झालं. जालियनवाला बाग हत्याकांड घडलं तेव्हा ते सात वर्षांचे होते. या घटनेनं मंटो बदलून गेले (त्यांच्यातल्या विद्रोहाची मशाल याच काळात प्रदीप्त झाली. पुढे जाऊन मंटो यांच्या ‘तमाशा’ नावाच्या कथेत या नरसंहाराचा उल्लेख आणि संदर्भ आलेत). अमृतसरमध्येच त्यांनी शिक्षण घेतलं. बंडखोर विचार आणि कमालीच्या अतिसंवेदनशील मनामुळे त्यांचं परिवर्तन एका अत्यंत अभिनव लेखकरूपी मंटोमध्ये कधी झालं हे त्यांनाही उमगलं नाही. वर्गवादआधारे पिचलेल्या घटकासाठी काम करायचं त्यांच्या मनात ठसलं. याच ऊर्मीतून त्यांनी लेखणी हाती धरली आणि त्यातून कागदावर जे उतरलं त्याने कैकांच्या मेंदूत परंपरांचा विस्फोट घडवणारी आग लावली, तर अनेकांच्या काळजातील जखमांना मलम लावलं. टीकेचा भडिमार झाला. जणू काही जगबुडी झाली आणि मानवी सभ्यता धोक्यात आली असा कांगावा केला गेला. जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापासून ते न्यायालयीन खटल्यापर्यंत लोकांनी त्यांना छळलं, पण मंटो ढळले नाहीत की मागेही सरले नाहीत.

लोकांनी इतका थयथयाट करावा असं काय होतं त्यात? असा काय गुन्हा एका लेखकाने केला होता की, त्याच्या लेखनाविरुद्ध वणवा पेटला होता? याचं उत्तर धुंडाळण्यासाठी समग्र मंटो वाचले पाहिजेत असं काही नाही. त्यांच्या काही कथा जरी वाचल्या तरी त्यांचा रोख कुणावर होता आणि त्यांना काय मांडायचं होतं हे समोर येतं. मंटोने स्वतःला घडवावं म्हणून त्यांच्या अब्बा हुजूरनी त्यांना अलिगढला पाठवलं, परंतु तिथे घडण्याऐवजी अली सरदार जाफरी, जाझबी, मजाझ, सिब्ते हसन, जाँ निसार अख्तर आणि अख्तर हुसैन रायपुरी यांच्या संगतीतून वेगळ्या अर्थाने मंटो ‘बिघडत’ गेले. त्यामुळे जेमतेम वर्ष पुरं होण्याआधीच अमृतसरला परतावे लागले. 1941 ला ते दिल्लीत परतले आणि त्यांनी ऑल इंडिया रेडिओ जॉईन केला. दिल्लीत ते अवघे 17 महिने राहिले. मात्र तेवढय़ातही त्यांनी कमाल केली. ‘आओ’, ‘मंटो के ड्रामे’, ‘जनाजे’ आणि ‘तीन औरतें’ ही रेडिओ नाटके या काळात प्रकाशित झाली. पुन्हा काही दिवसांसाठी ते लाहोरला गेले. इथं असलेली ‘हिरा मंडी’ हे त्यांचं आकर्षण होतं. हिरा मंडी ही तत्कालीन हिंदुस्थानची सर्वात मोठी वेश्या वस्ती होती. मंटो यांचं याप्रति असणारं आकर्षण शारीरिक नव्हतं, तर मानवी भावभावनांच्या गुंतागुंतीच्या ओढीचं होतं. तिथं फारच अस्वस्थ वाटू लागल्यावर ते 1942 मध्ये मुंबईस आले. 1948 पर्यंत काही नियतकालिकांसाठी व ‘इम्पिरिअल फिल्म कंपनी’च्या चित्रपटांच्या संवाद-पटकथांसाठी त्यांनी काम केलं. फाळणी झाल्यावर ते लाहोरला गेले. 18 जानेवारी 1955 रोजी लाहोरमध्येच त्यांचं निधन झालं. ‘टोबा टेक सिंह’, ‘खोल दो’, ‘घाटे का सौदा’, ‘हलाल और झटका’, ‘खबरदार’, ‘करामात’, ‘बेखबरी का फायदा’, ‘पेशकश’, ‘कम्युनिझम’, ‘तमाशा’, ‘बू’, ‘ठंडा गोश्त’, ‘घाटे का सौदा’, ‘काली सलवार’ या त्यांच्या विशेष गाजलेल्या कथा होत. आपल्या कथांतून त्यांनी स्त्राr-पुरुष प्रेमसंबंधांवर वेगळय़ा भूमिकेतून प्रकाश टाकला, ज्याने दोन्ही देश जणू धर्मसंकटात सापडले. इस्मत चुगताई आणि सआदत मंटो या द्वयीने हे काम इतक्या निर्भीडपणे आणि परखडपणे केलं की, त्या काळाला ते पचलंच नाही.

पराकोटीचा द्वेष, उपेक्षा सोसत त्यांनी तब्बल 19 वर्षे साहित्यसेवा केली. 230 कथा, 67 रेडिओ नाटके, 22 शब्दचित्रे आणि 70 लेख ही त्यांची लेखनसंपदा. मंटो दिल्लीत होते तेव्हा त्यांच्या रेडिओ नाटकांनी त्यांना वादग्रस्त प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या नाटकांनी आजही रंगमंच गौरविला जातो. मात्र मंटो यांना खरी लोकप्रियता आणि फेम मिळवून दिली ती कथांनी! त्यांच्या कथांत कमालीची नाटकीय मूल्ये ठासून भरलेली होती. तो केवळ विद्रोह नसून तो तर साहित्यिक सीमांच्या चौकटबंद झापडांना उद्ध्वस्त करून टाकणारा अक्षरप्रलय होता. मंटो यांच्या आयुष्यात डोकावताना सुरुवातीस उत्सुकता असते, नंतर जिज्ञासा वाटू लागते. रोमांचक असतं हे सगळं, पण नंतर समोर येतो तो डोक्याला झिणझिण्या आणणारा काळय़ाकभिन्न अंधाराकडे नेणारा अंतहीन प्रवास! मंटो यांनी समाजातील सर्वात खालच्या स्तराला असणाऱया शोषित वेश्यांवर कथा लिहून एका नव्या दृष्टिकोनाचा आरंभ केला, पण समाजाने त्यांना काय दिलं ? त्यांच्या साहित्याला अश्लाघ्य, निषिद्ध मानत त्यांचा अप्रत्यक्ष छळवाद मांडला, अघोषित बहिष्कार टाकला. परिणामी एक उमदा साहित्यिक अकाली गेला. जे आपण आनंदाने अनुभवतो, समाज ज्या शोषणाचा मिटक्या मारत आनंद घेतो त्यावर एक विलक्षण माणूस सर्वशक्तिनिशी आसुड ओढतो हे कुणाला बरे रुचेल? द्वेष आणि असूयेने भारलेल्या समाजाने मंटो यांना अव्हेरलं. तत्कालीन सुधारणावादी साहित्यिकांनीही यावर ठोस भूमिका न घेता मंटो यांनाच मागं सरण्याचा सल्ला दिला, पण आपल्या कथांवर मंटो यांचा इतका जीव होता की, जणू त्यांचं ते प्रथम प्रेम होतं!

‘मेरा नाम राधा हैं’ या कथेत राधा या नवअभिनेत्रीचं राजकिशोर या मुरब्बी अभिनेत्यावरचं पहिलं प्रेम आणि त्याचं ‘लंगोट का पक्का असणं’ नि मग तिने त्याला जोखून बघणं या गोष्टी मंटो यांच्या खुमासदार शैलीत समोर येतात. ‘ठंडा गोश्त’मध्ये एक चोर आणि एक वेश्या यांच्यातल्या शरीरसंबंधासोबतच दोन भिन्न विश्वात जगणाऱया जीवांची तगमग समोर येते. ‘बाबू गोपीनाथ’ या कथेत ‘पीर का मजार’ आणि ‘रंडी का कोठा’ या दोन्हींविषयी आत्मीयता असणाऱया जगावेगळय़ा माणसाची शरीरलालसा दिसते. ‘काली सलवार’ या कथेत एका गरीब स्त्राrला नवी सलवार हवी असते तर एकीला पैंजण हवे असतात. स्त्राrमनातल्या शृंगारविश्वाचा अत्यंत हळुवार आलेख यात मांडला आहे. ‘पीरन’ या कथेत मंटो यांनी बृजमोहन आणि त्याची प्रेयसी पीरन यांच्यातील नखरेल आडमुठय़ा संबंधांचं ‘रसभरीत’ वर्णन केलंय. मंटो यांच्या कथांचं सार लिहायचं म्हटलं तर शब्दसीमा आड येते. तरीही एक गुणविशेष सांगावासा वाटतो तो म्हणजे, त्यांची एकही कथा त्यांच्याच दुसऱया कथेची नक्कल वाटत नाही. शब्दनिवड, आशय, विषय तेच असूनही ही किमया मंटो यांनी लीलया साधली आहे.

मंटो यांची पत्नी, त्यांच्या तीन मुली यांची मंटो यांच्या या विचारांमुळे ससेहोलपट झाली. याला कारण म्हणजे त्यांची आर्थिक, सामाजिक नाकेबंदी. 1948 मध्ये पाकिस्तान सरकारने ‘नाकुश’ या मासिकावर मंटो यांची ‘खोल दो’ ही कथा प्रकाशित केल्याबद्दल बंदी आणली. ‘अदब-ए-लतीफ’,‘सवेरा’, ‘नाकुश’ या मासिकांवरची बंदी हा पाकिस्तान सरकारची सेन्सॉरशिप आडूनची मुस्कटदाबी होती. ‘ठंडा गोश्त’ कथेद्वारे अश्लीलता व भावना दुखावण्याच्या आरोपाखाली शिक्षेची मागणी करत मुस्लिम वाचकांनी मंटो यांना कोर्टात खेचले. ‘बू’ या कथेमध्ये त्यांनी स्त्राrच्या छातीला छाती संबोधल्याने लाहोरमध्ये त्यांच्यावर खटला भरला गेला. बर्फ कारखान्यात कामावर असतानाची बाब असो वा अखेरीस मनोरुग्ण झालेल्या मंटो यांना घ्यावी लागलेली शॉक ट्रीटमेंट असो, त्यांना पैशांची कायमच चणचण राहिली ती याच कारणामुळे ! त्यांच्या कथा नाकारल्या गेल्यावर एकदा ते म्हणाले होते की, ‘‘इफ यू कॅन नॉट बेअर माय स्टोरीज, देन धिस इज अनबेअरेबल टाइम!’’  ते शेवटपर्यंत लिहीत राहिले आणि त्यांच्या नवविचारांना मानणारा एक छोटासा गट त्यांची पाठराखण करत राहिला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. खरं तर पाकिस्तानमध्ये आज जे काही त्रोटक विचारस्वातंत्र्य आणि वैचारिक आधुनिकता दिसून येते त्याचं कारण म्हणजे हिंदुस्थानातून पाकिस्तानात गेलेल्या मंटो, फैज अहमद फैज, डॉ. अरसद आणि सज्जाद जहीर या दिग्गज विचारवंतांचं वास्तव्य होय.

‘मंटो खूप आवडले’, ‘त्यांच्या लेखनाने झपाटून गेलो’, ‘त्यांच्यावरचा सिनेमा खूप प्रभावशाली वाटला’, ‘माइंड ब्लोइंग लाइफ होती त्यांची’ अशा अर्थाची विविध सृजनांनी केलेली मीमांसा वाचण्यात आली. वाचून छान वाटलं, पण सखेद आश्चर्यही वाटलं. मंटो यांनी ज्याच्यासाठी संघर्ष केला त्या विषयावर बोलण्याचं अत्यंत त्रोटक अपवाद वगळता अनेकांनी सफाईदारपणे टाळत मंटो यांचं गुणगान केलेलं दिसून आलं. त्यांच्या लेखनावर वा त्यांच्या जीवनावर स्तुतिसुमने उधळणं खूप सोपं आहे, पण मंटो यांचे विचार सार्वजनिक जीवनात पचवणं अवघड आहे याचा प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा एकदा आला.

मंटो हा केवळ लेखक नाही किंवा कुणी प्रेषितही नाही, मंटो एक विचारधारा आहे, जी हलाहलाहूनही जहरी आहे, पण तरीही जीवनदायी आहे. आपल्याच प्रकाशमान दुनियेच्या एका अंधारल्या कोनाडय़ात तिष्ठत पडलेल्या लूतभरल्या दुनियेचं ती प्रतिनिधित्व करते. या दुनियेतलं वास्तव अंगावर आरेखताना त्याचे ओरखडे वाचणाऱयाच्या काळजावर कायमस्वरूपी उठावेत हे मंटो यांच्या साहित्याचं प्रयोजन! नुसते मंटो तर कुणालाही आवडतील, पण त्यांच्या प्रयोजनाचं काय? एखाद्या वेश्येजवळ जाऊन तिच्या लुगडय़ातला अंधार धुंडाळताना आपलं सत्त्व टिकवून ठेवून समाजाला आरसा दाखवण्याचं धारिष्टय़ जोवर येत नाही तोवर मंटो आवडून काहीच साध्य होणार नाही. फार तर आपण नवमुक्ततावादी विचारांचे पाईक आहोत याचा जगापुढे दिखावा करता येईल. मंटो सदैव जिवंत असतील ते या वेगळेपणामुळेच!

  [email protected]