निसर्गजागर – उपद्रवी हत्तींचे ‘मैत्रिपूर्ण’ मॅपिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वरा सावंत

तो रोज येतो पाणवठय़ावर… त्याचा मार्ग ठरलेलाच… त्याचा दरारा मोठा असला तरीही माणसांचा आदर तो करतो… मग का त्याच्या वाटय़ात आपण काटे पेरायचे…? मानव जात आणि प्राण्यांमध्ये प्रेमळ सलोखा राहावा, या उद्देशाने 1 ते 7 ऑक्टोबर जागतिक पातळीवर वन्य प्राणी सप्ताह म्हणून साजरा होतोय. कोकणात निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा मानवी वस्ती आणि शेतीवर होणारा हल्ला प्रेमळ सलोख्याने कसा आटोक्यात येईल, यासाठी वन विभागाने मोहीम सुरू केली आहे. वन्य प्राणी सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्रम आणि प्राणी सुरक्षेसाठी सुरू केलेल्या चळवळीचा घेतलेला आढावा.

तिलारी खोरे… पाणी, हिरवागार निसर्ग. नारळ, सुपारी अशा अनेक वनराईने परिपूर्ण असा कोकणातील शेवटचा परिसर. कर्नाटकात 2002 साली पडलेल्या भीषण टंचाईने काही टस्कर म्हणजेच रानटी हत्ती या भागात आले आणि इथलेच झाले. या पाच हत्तींचा मोठा उत्पात या भागात वारंवार पाहायला मिळत होता. गेल्या अनेक वर्षांपासून शेतीचे नुकसान, प्रसंगी मानवी वस्तीवर हल्ला होण्याच्या घटना या वन्य प्राण्यांकडून होत आहेत. वनविभागाची मोठी टीम या भागात गस्त घालत असली तरीही हे क्षेत्र पाहता या रानटी हत्तींना आवरणे तसं कठीणच. म्हणूनच यांना विरोध करून उपयोग नाही याची जाणीव झाली आणि वनविभागाकडून या हत्तींबरोबर मैत्री करण्याचे प्रयत्न होऊ लागले.

या मैत्रिपूर्ण उपक्रमात त्यांना काय हवंय, त्यांच्या गरजा, त्रास कसा कमी करता येईल, निसर्ग अबाधित राखण्यासाठी या घटकाचे असलेले महत्त्व या सर्व मुद्दय़ांचा विचार करण्यात आला आणि अखेर सिंधुदुर्गातील दोडामार्ग आणि कोल्हापुरातील चंदगड या तालुक्यातील त्यांचा वावर बाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू झाले. भेरले माड हा माडाचा एक प्रकार… याची पाने, फळ या रानटी हत्ती तसेच गव्याकडून खाल्ली जातात. यामुळे  दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर या भेरले माडाची लागवड करण्याचे नियोजन झाले. सध्या वनविभागाने स्थानिक पातळीवर उपक्रम हाती घेत वन खात्याच्या   दोडामार्ग हद्दीत सुमारे 100 एकर जागेत 5 हजार वृक्षांची लागवड केली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 200 हेक्टरहून अधिक भागात भेरले माडाचे बीजारोपण केले आहे. त्यासाठी शासकीय निधीचा खर्च करण्यात आलेला नाही. हत्तींचे आवडते खाद्य भेरले माड यांचीही लागवड करण्यात आल्यामुळे हत्तींचा मनुष्य वस्तीतील उपद्रव कमी झाला आहे व  नुकसानीचा आकडासुद्धा घटला आहे. हा प्रयोग यंदा प्रथमच दोडामार्गात करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यांत असलेल्या पोषण वातावरणात भेरले माड वृक्षाचे बीजारोपण केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे लाभलेले वरदान पाहता दोडामार्गातच हा वृक्ष जास्त प्रमाणात आढळतो. या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून अभ्यासपूर्वक या वृक्षाची सीमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  नारळासारखेच छोटय़ा आकाराचे हे फळ असल्याने पक्ष्यांकडून बी पसरवत याची लागवड केली जाते. यामुळे याची लागवड करण्याची गरज नसते. मात्र हा उपक्रम सुरू करताना वनविभागाच्या पडिक जमिनी घेऊन वृक्षलागवड करण्यात आली आहे.

लोकसहभाग महत्त्वाचा

प्रकल्प राबवताना केवळ वनविभाग काम करताना दिसले. मात्र या उपक्रमात लोकसहभाग तितकाच महत्त्वाचा ठरला आहे. यापूर्वी हत्तींना हटविण्यासाठी स्थानिकांकडून फटाके फोडणे, ढोल वाजविणे आदी प्रकार चुकीचे होत होते. त्यामुळे उलट हत्ती बिथरून हल्ला करीत होते. तर बऱ्याचदा गव्यांनीही मानवी वस्तीवर हल्ला केला आहे. याबाबत जनजागृती केल्यानंतर या प्रकारांना आळा बसला आहे. तर या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी   स्थानिकांनी आपल्या पडिक जमिनींवर शासनाकडून मिळणारे झाडांचे बीजारोपण करून आपले योगदान दिले आहे.

नुकसानीच्या आकडय़ांत 60 टक्क्यांनी घट

दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा वावर असलेल्या जंगलात भेडले माड लावण्यात आले आहेत. वन्य प्राण्यांचे खाद्य जंगलात उपलब्ध करून दिल्याने 60 टक्क्यांनी नुकसानीचा आकडा कमी होत आहे. दरम्यान, स्थानिकांच्या प्रत्येक नुकसानीची जबाबदारी घेत वनविभागाने कामाचा उच्च दर्जा कायम ठेवला आहे.

सिनेमातूनही मांडली प्राण्यांची बाजू

प्राणी प्रिय असलेल्या सिनेजगताने आपल्या झगमगाटाच्या माध्यमातून प्राण्यांविषयीची आस्था वेळोवेळी दाखवून दिली आहे. प्राण्यांच्या संवेदना मांडण्यात हॉलीवूड, बॉलीवूड बरोबरच हिंदुस्थानातील सिनेइंडस्ट्रीचेही योगदान आहे. काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत यांचावर चित्रित झालेल्या ‘जंगली’ या सिनेमाने हत्तींचा रानटी उपद्रव तर प्रेमळ सलोख्याचे दर्शन घडवले. बॉलीवूडमध्ये रोअर, शेरणी, हाथी मेरे साथी प्राणिमात्रांवर आधारित सिनेमांची यादी मोठी आहे.  हॉलीवूडमधले जुमानजी, द लायन किंग, द जंगल बुक हे सिनेमे प्रसिद्ध आहेतच.  तर मराठीतही अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा ‘डेब्यु’ सिनेमा आजोबा, तामीळमधला राणा दग्गुभट्टीचा ‘कडन’ जास्त पाहिले गेलेले ठरले आहेत. या सिनेमाचे हिंदी डबिंग ‘हाथी मेरे साथी’ हा नव्याने झालेल्या सिनेमात पाहता आले. प्रत्येकानेच ही संवेदना जपत प्राण्यांविषयी केलेली जनजागृती कौतुकास्पद ठरली आहे.

सिंधुदुर्ग जिह्यातील वनखात्याच्या जंगलामध्ये आंबा, काजू, फणस अशा विविध झाडांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले आहे. ते वनखात्याचे कर्मचारी आणि वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यासाठी कोणताही निधी खर्च करण्यात आलेला नाही. हत्तींना जंगलात रोखण्यासाठी तसेच मानवी वस्तीशी त्यांचा सलोखा राहण्यासाठी वनविभागाची महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे वन्य प्राण्यांबाबत माणसांमध्येही आदर कायम राहील, यासाठी हा केलेला प्रयत्न आहे.
–  शहाजी नारनवर, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग.

[email protected]