लेख : अक्षर मैत्री

885

दिलीप जोशी ([email protected])

आधी येतो ध्वनी मग येतं अक्षर. पृथ्वीवर माणूस जसजसा उक्रांत होत गेला तेव्हा त्याने संदेशवहनाची अनेक साधनं विकसित केली. सुरुवातीला आदिम मानव हातवारे करून किंवा काही विशिष्ट आवाज काढून प्राणी किंवा पक्ष्यांप्रमाणे संकेत भाषा बोलू लागला. त्यानंतर अनेक शतकांनी त्याचं जीवन स्थिर होऊन नगररचना अस्तित्वात आली. तेव्हा त्याला आवाजाच्या आकाराची किंवा ‘नोटेशन’ची गरज भासू लागली. त्यातूनच पुढे जगभरच्या विविध भाषा, त्यांच्या उच्चारप्रणाली आणि त्यांच्या लिपी अस्तित्वात आल्या.

पक्षी-प्राण्यांच्या ध्वनिसंकेत भाषेच्या मर्यादा लक्षात घेता त्यांची उच्चारप्रणाली युनिव्हर्सल किंवा जागतिक म्हणावी लागेल. युरोप अमेरिकेतली मांजर ‘म्याव’च करणार आणि वाघ डरकाळीच फोडणार. ‘भाषा’ बदलाची शक्यता त्यांच्यात नाही. माणूस नावाच्या प्रगत प्राण्याचं तसं नाही. व्यक्त होण्याच्या ध्वनीचे विविध प्रकार आपापल्या पद्धतीने नियमबद्ध करीत मानव समूह बोलू लागले. जगातल्या सगळय़ाच बोली भाषांना स्वतंत्र लिपी आहे असंही नाही. सूक्ष्म फरकाच्या बोलीभाषा एकाच प्रमाण लिपीत लिहितात. मात्र त्याच अक्षरांचा उच्चार थोडय़ा वेगळय़ा पद्धतीने करतात. मानवी समूहाचं बोलणं आणि त्यातील एकाच भाषेतील विविध ‘हेल’ व ‘उच्चार’ यावर बर्नार्ड शॉ यांनी ‘जिग्मॅलियन’ हे नाटक लिहिलं. त्यावर ‘माय फेअर लेडी’ हा चित्रपट आला आणि मराठी भाषेपुरती तशीच थीम घेऊन सध्या जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी ‘ती फुलराणी’ हे बहारदार नाटक लिहिलं. आवाजी भाषांच्या नोंदीचा विचार स्फुरला तेव्हा मूळाक्षरं निर्माण झाली. एकाच आवाजाला ‘आकार’ देणं विविध ठिकाणी विविध पद्धतीने नोंदलं जाऊ लागलं. आपल्याकडे ‘अ’चा उच्चार ‘अननस’ म्हटल्यावर कळेल, पण पाश्चात्य देशात त्यासाठी  ‘A’ अक्षर न वापरता ‘U’ अक्षर वापरलं तर चटकन ‘अ’ उच्चारला जाईल. त्यांचा ‘अ’ अपमधला म्हणजे उच्चार एकच, पण नोटेशन निराळं.

हळूहळू त्यातही सुधारणा, बदल होत होत आता रूढ झालेल्या लिपी जन्माला आल्या. मराठीची बाराखडी आपल्याला ठाऊक असते. ती आपण तिसऱ्या-चौथ्या वर्षी शिकतो. तोपर्यंत घरात आपण आपल्या भाषेत बोलायला शिकलेलोच असतो. लिहिण्याआधीचं बोलणं पाटी किंवा आता एक्सरसाईज बुकात गिरवताना थोडय़ाच काळात लक्षात येतं की, आपण न बोलताही काही नोंदी दुसऱ्याच्या हाती दिल्या तर आपल्याला काय म्हणायचंय हे त्याला समजतं. लिपी उक्रांत झाल्यावर ‘लिखित’ संदेशवहनाचा मार्ग सोपा झाला. पहिली हजारो वर्षे माणसं स्वहस्ते (किंवा लेखनिकाद्वारे) लेखन करीत राहिली. पत्र, खलिते, संदेश पोहाचवण्याचं काम अक्षरांनी केलं. तरीसुद्धा आज एकविसाव्या शतकाचा जवळपास एकपंचमांश भाग संपत आला असताना जगात 10 कोटींपेक्षा जास्त लोक निरक्षर आहेत. गेल्या 8 तारखेला त्यासाठी जागतिक साक्षरता दिवस साजरा झाला. निरक्षरांचे नैमित्तिक व्यवहार तसे उत्तम चालतात असा काळ अगदी 200 वर्षांपूर्वीपर्यंत होता. 1820 मध्ये जगातल्या फक्त 12 टक्के लोकांनाच लिहितावाचता येत होतं. साक्षरतेमध्ये पुरुषांचाच अधिक भरणा होता. आता ते प्रमाण पूर्ण बदललंय. जगात 14 टक्केच निरक्षक लोक आहे. 86 टक्के लोकांनी वाचन-लेखनाच्या माध्यमातून अक्षर मैत्री जोपासली असून साक्षरांची संख्या 100 टक्क्यांवर जाण्याचा दिवस दूर नाही. याचं कारण म्हणजे प्राचीन गावगाडय़ामध्ये ठरावीक लोकांना पोथ्यापुराणं किंवा हिशेबापुरतं लेखन करता आलं की काम भागत होतं. राजदरबारी खलिते लिहिणारे अमात्य होते, पंरतु गेल्या 120 वर्षांत साक्षरांचं प्रमाण विविध कारणांनी वेगाने वाढलं. त्याला कारण जगाने नित्यनव्या संशोधनाचं युग अनुभवलं. छपाई सुरू झाली आणि अक्षरांचे खिळे तयार झाले.  ते जुळवून एकच मजकूर अनेकांना वाचता येईल इतका छापला जाऊ लागला. पूर्वी पाठांतराने जे समजत होतं ते आता लिखाणाने समजू लागलं. एकोणिसाव्या शतकात तर छपाईतंत्राने वेग घेतला. विसाव्या शतकात ऑफसेट पिंटिंग आलं. त्यापूर्वीच अगदी शिळाछापांवर छापलेली वृत्तपत्रे युरोपात सतराव्या शतकापासून होती.

बदलत्या जगात वाचणं-लिहिणं अनिवार्य झालं. आता तर कॉम्प्युटर आणि सेलफोनच्या वापराने ‘मेसेज’ पाठवायचा तरी अक्षरओळख हवीच याची खात्री पटल्याने पुढच्या पिढय़ा एकच नव्हे तर अनेक भाषा शिकताना दिसतायत. एखादी भाषा कॉम्प्युटरवर वाचून आणि उच्चारही ऐकून आत्मसात करण्याचा प्रयत्न नवतरुणाई करीत असते.

उच्चारांच्या बाबतीत मात्र लिपी समजली तरी घोळ होऊ शकतो. इंग्लिश भाषेच्या 26 मूळाक्षरांतल्या ‘सी’, ‘के’ आणि ‘सीएच’चा उच्चार वेगवेगळय़ा वेळी ‘क’सारखा केला जातो. (केअर, काइट, केमिस्ट्री) मराठीची देवनागरी लिपी कमालीची उच्चारानुवर्ती आहे. संस्कृत, हिंदी यांचीही हीच लिपी. ती उच्चारांच्या अधिकाधिक जवळ जाते. तरीही पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘जल’ शब्दातील ‘ज’ आणि जळणे या शब्दातील ‘ज’चे उच्चार वेगळे. तेच ‘जल’ ‘जळ’ झालं की ‘ज’चा उच्चार बदलला. इंग्लिशमध्ये सायकॉलॉजीचं स्पेलिंग ’झ्’ ने सुरू होतं. कोणतीही भाषा शिकताना हे बारकावे कसे निर्माण झाले याचाही विचार करावा लागतो. आजच्या काळात प्रभावी लिहिणं आणि बोलणं याला खूप महत्त्व आहे. त्यासाठी साक्षरता आवश्यक ठरते. भाषाशास्त्र्ाात जगभर प्रगती होऊनही सिंधू संस्कृतीच्या हरप्पा येथे मिळाल्या सील (seal) वरचं आपल्याला अजून वाचता आलेलं नाही. तिथे अजूनही आपली निरक्षता असून ती दूर करण्याचे प्रयत्न चाललेत.

आपली प्रतिक्रिया द्या