लेख – ऐसी अक्षरे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
marathi-school

>> दिलीप जोशी

माणूस जेव्हा केव्हा समूहाने राहू लागला आणि नगररचनेतून त्याची पृथ्वीभर ठायी ठायी वस्ती झाली तेव्हा आधी परस्परांशी आणि नंतर विविध समूहांशी संपर्क साधण्याच्या विचारांची देवाण-घेवाण करणाऱया अभिव्यक्तींचा विकास झाला. आदिमानव कदाचित ठरावीक आवाज आणि खाणाखुणा करत बोलत असेल. पुढे ‘शब्द’ अवतरले. त्या मौखिक परंपरेचीही बरीच वर्षे गेल्यावर जे बोलतो तो ध्वनी नोंदण्याचा विचार आला आणि ‘आवाजा’ला ‘आकार’ लाभला. तेच अक्षर! अ-क्षर म्हणजे नष्ट होत नाही ते. ‘ऐसी अक्षरे’ जगातल्या विविध संस्कृतीत विविध रूपं धारण करून आली. एकाच फोनेटिकची किंवा उच्चाराची विविध भाषांतली नोंद किंवा ‘नोटेशन’ भिन्न आकाराचं झालं. आपण ‘अ’चा उच्चार अर्थातच ‘अ’असाच करतो. कारण आपली देवनागरी लिपी आपल्याला ठाऊक असते. इंग्लिशमध्ये हा ‘अ’ उच्चारायला बहुतेक वेळा ‘यू’ या अक्षराची नोंद केलेली आढळते. बऱयाच वेळा म्हणायचं कारण असं की, इंग्लिशमध्ये एका उपचाराची नोंद अनेक प्रकारे होते. आपल्याकडे ‘क’चा उच्चार कुठेही ‘क’च होणार, पण इंग्लिशमध्ये ‘सी’, ‘के’ किंवा ‘सीएच’सुद्धा ‘क’ उच्चारी असू शकतो. त्या भाषेत सव्वीस मूळाक्षरांत सर्व भाषा सामावली आहे हे बलस्थान, तर उच्चाराची गडबड हा दोष.

असं प्रत्येक भाषेचं म्हणजे लिपी, अक्षरांचं काही बलस्थान आणि काही मर्यादा असतात. तामीळमधला विशिष्ट ‘ल’ आपल्या उच्चारात क्वचितच येतो. यामध्ये आपल्या मराठीची ‘देवनागरी’ लिपी खूपच सुबोध आणि उच्चारानुवर्ती आहे. बाकी जगातली प्रत्येक भाषा आणि अक्षरात नोंदली न जाणारी बोलीसुद्धा खूप प्रभावी असते हे अशा बोलींमधली लोकगीतं, म्हणी, वाप्रचार ऐकले की लक्षात येतं.

जेव्हापासून ‘अक्षर’ जन्माला आलं तेव्हा संदेशवहन पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटीविना शक्य झालं. त्यानंतर तार, फोन आणि व्हिडीओफोनपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. दूरस्थ असणाऱयांशी थेट संवाद साधण्यात आता विलक्षण प्रगती झाली आहे. पूर्वी मात्र ही गोष्ट पत्र, खलिते, शिलालेख वगैरे माध्यमातून होत असे. त्यातही सर्वसामान्य लोकांनी लिहिणं-वाचणं हे छपाईचं तंत्र अवगत झाल्यावर वाढलं आणि ‘पोस्ट’ खातं आल्यावर सामान्य मंडळीसुद्धा आपल्या दूरच्या नातेवाईकांना लिखित सांगावा धाडू लागली. साठ-सत्तर वर्षांपूर्वी पोस्टाच्या कचेरीजवळ साक्षर नसलेल्यांसाठी ती मंडळी सांगतील तसं पत्र (कार्ड) लिहून देणारे लेखनिक असत. त्यावर ‘पुलं’सारख्या सिद्धहस्त लेखकांनी विनोदही केले आहेत. पण लिहिण्यास ‘सांगणारा’ लिहिणाऱयाला शेवटचं वाक्य ‘आक्षरास हसू नये’ असं सांगतो त्यातली विसंगती विनोद निर्माण करते.

दुष्यंत-शकुंतलेच्या कथेतील ‘भूर्जपत्रा’चा उल्लेख, प्राचीन अक्षर झाडाच्या पानांवर (पत्र) किंवा रुंद साल काढून त्यावर लिहिली जात. असे प्राचीन गंथही उपलब्ध आहेत. अक्षर वाङ्मयात हळूहळू प्रगती होत गेली आणि अनेकांनी आपल्याला सुचलेले विचार नोंदवून ठेवले. पुढे छापखान्यात पुस्तकं छापली जाऊ लागली. आता तर लिखित ‘मेसेज’ क्षणार्धात जगाच्या दुसऱया टोकाला पोचू शकतो. एवढंच नव्हे तर, एका लिपीतून दुसऱया लिपीतली अक्षर नोंदही करता येते.

गेल्या आठ तारखेला ‘साक्षरता’ दिवस होता. त्यावरून हे आठवलं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच्या आणि आताच्या संपूर्ण देशातील साक्षरतेच्या प्रमाणात प्रचंड सुधारणा झाली आहे. मोबाइल संदेशामुळे का होईना, लोक लिहू लागलेत. अर्थात ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे’ हे खरं असलं तरी ‘काहीतरीच’ लिहू नये हे पथ्य प्रत्येकाने स्वतःच्या तारतम्याने पाळायला हवं.

लिखाणाची अक्षरकला प्राप्त झाल्यावर अनेकांना आपलं मनोगत व्यक्त करता येऊ लागलं. इतर कोणी ऐकणारं नसेल तेव्हा लिखाणात किंवा वाचनात मन रमवणं शक्य झालं. अनेकांनी लिहिलेली पुस्तकं ही माणसाची ‘मित्र’ झाली. मग ती छापील असोत नाहीतर किंडल किंवा ऑनलाइन. शेवटी ती अक्षरबद्धच असणार. आमच्या पिढीला अजूनही छापील पुस्तकाचीच ओढ आहे. पुढच्या काळात ती कमी होईल म्हणतात. तरीसुद्धा जगातील छापील पुस्तक वाचणाऱयांची संख्या खूप कमी होतेय असं दिसत नाही. हा ज्याच्या त्याच्या सोयीचा आणि आवडीचा भाग आहे.

‘कोरोना’ काळात घरी बसलेल्या जगातले अनेक हात लिहिते झाले. एक तर त्यांना त्यासाठी वेळ मिळाला आणि मनातले विचार व्यक्त करण्याच्या अक्षर (सा)धनाचं महत्त्वही लक्षात आलं.

आपल्या मनातले विचार अक्षरबद्ध करून जीवन आपलं आणि इतरांचं जीवन समृद्ध करण्यात अनेक दिव्यांगांचाही समावेश होतो. कवी गोविंद यांच्या आपल्या आजारावर मात करणाऱया कविता किंवा स्टीफन हॉकिंगसारख्या विश्वसंशोधकाने अनेक दशकं केवळ खुर्चीला खिळून निर्माण केलेली वैज्ञानिक साहित्यसंपदा साऱया जगाला थक्क करणारी, विचार करायला लावणारी ठरली. ‘अक्षर’ हेच त्यांचं जीवन झालं. कोणत्याही भाषेत साक्षर असल्याचा ध्यास बालपणीच रुजवायला हवा. अगदी प्रौढ साक्षरता वर्गात शिकूनही लेखन करणारी मंडळी आहेत. अनेक भाषांची अक्षरओळख असेल तर उत्तमच. जीवन अधिकाधिक समृद्ध करण्याचा अक्षर हा एक मार्ग आहे.