मराठी भाषा – एक मानसिक द्वंद्व

>> रविराज गंधे

मराठी भाषेच्या विकासाचा-प्रसाराचे दायित्व हे फक्त शासनाच्या मराठी भाषा विभाग, साहित्य आणि भाषाविषयक कार्य करणाऱया संस्थापुरते मर्यादित राहून चालणार नाही तर त्याला व्यापक जनाधार असणे गरजेचे आहे. जगभर प्रादेशिकवाद आणि राष्ट्रीय अस्मितेचे वारे वाहत असताना मराठी आणि अन्य हिंदुस्थानी समाजाने आपापल्या भाषाविषयक मानसिक द्विधा मनःस्थितीतून बाहेर पडणे ही काळाची गरज आहे.

लाखो वर्षांपूर्वी आदिमानव हा सांकेतिक खुणा, चिन्ह, हावभाव-हातवारे, ध्वनी या आधारे आपल्या मनातील भावना किवा आशय व्यक्त करीत होता. भाषाविज्ञान शास्त्रामध्ये भाषा हे अभिव्यक्तीचे साधन मानले जाते. आपला मुद्दा पटविण्यासाठी आपण भाषेबरोबरच देहबोलीचा नेहमी आधार घेतो. त्याच मूळ आदिमानवी अवस्थेत दडलं आहे. मानवाने भाषा म्हणून उच्चारलेला पहिला शब्द हा दाम किवा पैशाशी निगडित असा होता असा निष्कर्ष भाषा संशोधक काढतात कारण वस्तू विनिमियामध्ये आदी मानवाला ‘किती’ हाच शब्द अभिप्रेत असावा. अशा अवस्थेतून जात जगभरात हजारो भाषा निर्माण होऊन प्रगत आणि समृद्ध झाल्या. त्याद्वारे माणसाच व्यावहारिक-सांस्पृतिक जग समृद्ध झालं.

आज जगभरात जवळपास 6 हजार भाषा बोलल्या जातात. हिंदुस्थानात सर्व प्रकारच्या जवळपास 1600 हून अधिक भाषा बोलल्या जात असल्याचे मानले जाते. त्यातील प्रमुख अशा 780 भाषांपैकी मराठी ही देशातील चौथी आणि जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱया भाषांमध्ये पंधरावी भाषा म्हणून ओळखली जाते. मराठी साहित्य, संस्पृती आणि कलांचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेचा विकास, प्रसार आणि तिचे अस्तित्व यासंदर्भात अनेक प्रश्न आज आपल्यापुढे उभे ठाकले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मराठी दिनाच्या निमित्ताने या प्रश्नाचा धांडोळा घेणे अगत्याचे ठरावे.

ज्या ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नव्हता त्या इंग्रजांची बुद्धिमत्ता, व्यावहारिक काwशल्य, संशोधक वृत्ती आणि अथक परिश्रम करण्याची सवय आदी गुणविशेषाबरोबरच एक महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे होता तो म्हणजे इंग्रजी भाषेच प्रेम आणि अभिमान! अठरापगड जाती-जमातीच्या, विविध भाषा, धर्म-संस्पृती-रूढी-परंपरांचे जीवापाड पालन करणाऱया हिंदुस्थानींना भाषिकदृष्टय़ा एकसंध कसे करायचे असेल तर इंग्रजी भाषेची सक्ती करणे गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले. प्रादेशिक आणि लोकभाषेतून शिक्षण-व्यवहार झाले तर लोक पटकन साक्षर होतील. बुद्धिमान होऊन संघटित आणि आपले अस्तित्व धोक्यात येईल.

या चाणक्यनीतीमुळे इंग्रजी ही शिक्षण आणि व्यवहाराची भाषा झाली. तेव्हापासून इंग्रजीच हिंदुस्थानींच्या मनावर बसलेले गारुड आजही कमी झालेले नाही. किंबहुना हिंदुस्थानींच्या मनात प्रादेशिक भाषा की इंग्रजी भाषा अशी द्विधा मनःस्थिती निर्माण होऊन यासंदर्भात मानसिक संघर्ष सुरू झाला.

मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी आज शासनाचा मराठी भाषा विभागाच्या वतीने अनेक प्रकल्प राबविले जातात. अनेक सांस्पृतिक आणि भाषाविषयक कार्य करणाऱया संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते शिक्षणक्रमात सक्तीचे मराठी, मराठी व्याकरण कोशाची निर्मिती, युनिकोडचा वापर, मराठीतून संभाषण, अमराठींना मराठी शिकवण्याची गरज अशा अनेक गोष्टींचा सातत्याने प्रसार करताना दिसतात. या प्रयत्नांना सर्वसामन्यांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. भाषेसाठी एक आंतरिक तळमळ आणि उमाळा असणे गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे पुठल्या एकाच भाषेचा आग्रह आता कालबाह्य आणि निरुपयोगी वाटत असला तरी जशा आपण आपल्या धार्मिक श्रद्धा, संस्कार आणि रीतीरिवाज आपल्या परीने कसोशीने जपण्याचा प्रयत्न करतो. तशीच मराठी भाषेची जपणूक ही पुठलाही न्यूनगंड अथवा मराठी द्वेष न बाळगता समाजाकडून होणे अपेक्षित आहे. मराठी साहित्यविषयक पुस्तके, नाटके, सिनेमे यांना मिळणारा मर्यादित प्रतिसाद तसेच मोठय़ा प्रमाणावर इंग्रजीतून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या हे मराठी लोकांची मराठीविषयीची उदासीनता दर्शवितात. जी मंडळी मराठी भाषेत छान बोलतात, लिहितात आणि पुस्तके काढतात त्यांना मराठी भाषेच्या संदर्भात सगळ आलबेल आणि हिरवगार आहे असेच वाटते. महाराष्ट्रमध्ये मोठय़ा प्रमाणावर घसरलेल्या जो मराठी टक्का आहे त्या सीमित वर्गाची अश प्रकारची भावना आहे. बाकी महाराष्ट्रातील मिश्र भाषी समाजाला त्याचे फारसे सोयरसुतक नाही. तो सोयीसोयीने, गरजेनुसार सर्व भाषांचा वापर करीत व्यवहार करीत असतो. समाजाच्या अशा मानसिकतेमुळे आज मराठी भाषेची अवस्था ही दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी झाली आहे.

आज आपली तरुणाईची भाषा पाहिली तर ती तंत्रज्ञानाच्या परिभाषेनी युक्त बहुभाषी आणि सांकेतिक अशी झालेली दिसते. अशा भयावह परिस्थितीत प्रमाण भाषा कशी अमलात आणणार? आणि लोकांना तरी तिची गरज भासते का? असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत.
मराठी भाषेच्या विकासाचा-प्रसाराचे दायित्व हे फक्त शासनाच्या मराठी भाषा विभाग, साहित्य आणि भाषाविषयक कार्य करणाऱया संस्थापुरते मर्यादित राहून चालणार नाही तर त्याला व्यापक जनाधार असणे गरजेचे आहे. आज चीन, जर्मनी, जपान, रशिया आदी अनेक देश कल्चरल डिप्लोमासीचा भाग म्हणून आपापल्या मायभाषेचा जगभरात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहेत. त्याद्वारे त्यांना आपल्या भाषेचा डंका जगभर फिरवत अस्मिता जपायची आहे आणि व्यापारी हितही साधायचे आहे. सरकारच्या आणि समाजाच्या अशा मानसिकतेमुळे आपल्या प्रादेशिक भाषा लोप पावत आहेत. हिंदुस्थानातल्या नोंदणीपृत 780 भाषांपैकी गेल्या 50 वर्षात जवळपास 250 भाषा मृत पावल्याचे भाषा अभ्यासक सांगतात.

आज मराठी भाषेचा विचार करायचा झाला तर तो ऐतिहासिक, सांस्पृतिक, किवा साहित्यिकदृष्टय़ा भावनिक होऊन किवा वृथा अभिमान बाळगून करता येणार नाही. जागतिकीकरणाच्या एपूण बदललेल्या परिप्रेक्षात करावा लागेल. आज सर्वच देशांमधील त्या त्या भाषांचे अभिजात सौंदर्य आणि कमी-अधिक प्रमाणात ढासळत चालला आहे. शेक्सपिअर आणि बर्नार्ड शॉच्या काळातील अस्सल युरोपीय इंग्रजी आज अस्तिवात नाही. चीन, जपान, जर्मनी मधील भाषांची हीच अवस्था आहे. प्रत्येक भाषेत कालागानिक सोपे, साधे, बोलीभाषेतील बदल होत गेले. लोकांना ते भावले. त्यांनी ते आपलेसे केले. दैनंदिन बोलण्यात ते त्याचा सर्रास वापर करू लागले.

जागतिकीकरणाच्या स्पर्धेत जगाशी पैज लावण्यास निघालेल्या मराठी समाजाला आपल्या ‘अमृताशी पैजा’ जिंकणाऱया मराठीची थोडीशी ओळख जरी जगाला करून देता आली तरी अर्धी लढाई जिंकली असेच म्हणावे लागेल. जगभर प्रादेशिकवाद आणि राष्ट्रीय अस्मितेचे वारे वाहत असताना मराठी आणि अन्य हिंदुस्थानी समाजाने आपापल्या भाषाविषयक मानसिक द्विधा मनःस्थितीतून बाहेर पडणे ही काळाची गरज आहे.

(लेखक माध्यमतज्ञ आहेत)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या