
>> रविप्रकाश कुलकर्णी
आपल्याकडे व्यंगचित्रासंदर्भात लेखन-प्रकाशन याचं दुर्भिक्ष जाणवतं. अशा पार्श्वभूमीवर मराठी व्यंगचित्रांच्या गंगोत्रीचा शोध प्रवीण मच्छिंद्र सुरेखा मस्तुद यांना घ्यावासा वाटला हे विशेषच. हा त्यांचा अभ्यास मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास या पुस्तकात पाहायला मिळतो. प्रकाशक आहेत ‘पुस्तक मार्केट पब्लिकेशन.’
कला म्हणजे काय, व्यंगचित्राचे प्रकार, जगातले पहिले राजकीय व्यंगचित्र, 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन कसा झाला, असा मागोवा घेत लेखक भारतातील पहिले वृत्तपत्र, मराठी भाषिक पहिले वृत्तपत्र, जिथून वृत्तपत्रात व्यंगचित्र देण्याची परंपरा सुरू झाली ते ते हिंदू पंच वर्तमानपत्र, सत्यशोधकी व्यंगचित्र पत्रे, चित्रमय जगतची कामगिरी, मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ याची माहिती येते. ही सर्व माहिती लेखकाने रा.के. लेले यांच्या मराठी वृत्तपत्रांचा इतिहास यामधून घेतलेली आहे.
‘टाकाच्या फेकी’ हे व्यंगचित्राचे बहुदा पहिले पुस्तक. ना. सि .फडक्यांच्या निरीक्षणावर शंकरराव किर्लोस्कर यांनी व्यंगचित्रं काढली. आधी ती किर्लोस्कर मासिकात प्रकाशित झाली आणि नंतर त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. पुढे असाच प्रकार चित्रा साप्ताहिकात झाला. कल्पना अनंत काणेकरांच्या असत आणि त्यावरून दीनानाथ दलाल व्यंगचित्र काढत. अशा निवडक व्यंगचित्रांचा संग्रह ‘टीकाचित्रे’ या नावाने प्रकाशित झाला. त्यानंतर व्यंगचित्रांची काही पुस्तक आलेली आहेत ज्यात श्याम जोशी, वसंत हळबे, श्रीकांत ठाकरे, अशा व्यंगचित्रकारांची पुस्तकं सांगता येतील. व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे यांनी अशी पुस्तके उद्वेली बुक्सतर्फे प्रकाशित केलेली आहेत. याची दखल या पुस्तकात यायला हवी होती.
हे असमाधान व्यक्त करत असतानाच हेही सांगायला पाहिजे की या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीची व्यंगचित्र असलेला संग्रह ‘हसण्यावारी नेऊ नका’ – (अवधूत डोंगरे अनुवादित) या संग्रहाची दखल घेतलेली आहे. तीच सजगता ते इतर माहितीच्या बाबतीत का घेत नाहीत?
आर. के. लक्ष्मण यावर एक प्रकरण या पुस्तकात आहे. ते योग्यही आहे. पण मराठीतील एकही व्यंगचित्रकार त्यांना सापडू नये की ज्याच्यावर प्रकरण लिहिता आले असते. सदर पुस्तक वाचताना असे कितीतरी असमाधान वाढतच जाते. तरीसुद्धा या पुस्तकाची दखल घेतो आहे. त्याचं कारण व्यंगचित्र संदर्भात मुळातच लिहिणारे फार कमी आहेत. त्यात पुन्हा प्रवीण मस्तुद यांनी एम. फिल. आणि पीएच.डी. देखील व्यंगचित्र संदर्भात केलेली आहे. अशा लेखकाकडून अधिक मूळ संदर्भ बघून सखोल लेखन अपेक्षित आहे. त्यासाठीच ही नोंद.