
माय मराठी, साद मराठी
भाषांचा भावार्थ मराठी
बात मराठी, साथ मराठी
जगण्याला या अर्थ मराठी
मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. 1987 मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यावेळी शासनाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी जागतिक अकादमीने पुढाकार घेतला. या दिवसाला अनेक नावाने संबोधिले जाते. मायबोली मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मराठी भाषा दिन. आपल्या मराठी भाषेला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे. आपली मराठी भाषा संतांची कीर्तने, भारुडे आणि भजनांनी सजली आहे. हीच आपल्या मराठी भाषेची संपत्ती आहे. या दिवशी शाळेत, महाविद्यालयांत भरपूर कार्यक्रम घेतले जातात. छोटी छोटी नाटके सादरीकरण, काव्य वाचन, काव्यलेखन, शास्त्र्ााrय संगीताची बैठक असे अनेक कार्यक्रम केले जातात.
साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे की, तिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते.
‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यानंतरचा ‘विशाखा ’हा कविवर्य कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यांवरील प्रेम यातून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत गेला. कविता या वाङ्मय प्रकारावर कुसुमाग्रजांनी सर्वाधिक प्रेम केले. ‘जीवनलहरी’पासून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवास सुरू झाला. त्यांचे काव्यलेखन अनेक पदरी आहे. त्यामुळेच रसिकांचे, अभ्यासकांचे व समीक्षकांचे लक्ष कुसुमाग्रजांच्या कवितेने वेधून घेतले.
‘क्रांतीचा जयजयकार’ ही ‘विशाखा’तील राष्ट्रीय वळणाची कविता. अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकणाऱ्या राजबंद्याच्या ओठांवरचे गाणे कुसुमाग्रजांनी या कवितेत शब्दबद्ध केले आहे.
मराठी संस्कृतीचा आणि बाल साहित्याचा वारसा आपणचं मुलापर्यंत पोहोचवू शकतो. मुलांच्या समोर बालसाहित्याचा खजिना आपणच ठेवला तर तेही आवडीने वाचणार. त्याकरिता मुलांना गोष्टीच्या पुस्तकातून वाचनाची आवड निर्माण करू शकतो.‘मराठी भाषा दिवस’ हा आपल्याला एकच दिवस साजरा न करता रोज साजरा करायचा आहे, तेही दररोज पुस्तके वाचून…
जाऊ पुस्तकाच्या गावा
लुटू आनंदाचा ठेवा
वाचता पुस्तके भरपूर
भेटती दोस्त मंडळी न्हारी
वाचू त्यांच्या गमती जमती
करू त्यांच्याशी मैत्री …
‘ इये मराठीचिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ’ अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख करता करता ‘ब्रह्मविद्या’ म्हटले आहे. त्याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते.
- कविता फाले–बोरीकर (लेखिका माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर येथे कार्यरत आहेत.)




























































