
>> योगेंद्र ठाकूर
मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झाले तर आजच्या तरुणांना विज्ञान, वाणिज्य व्यवस्थापन विधी, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी असे अभ्यासक्रम मराठीतून शिकायला मिळतील. सध्या पर्याय नाही म्हणून स्वयंरोजगार मिळवण्यासाठी इंग्रजीतून शिक्षणाचा पर्याय निवडला जातो. पण तो सर्वांना पेलवत नाही. मग रोजगाराची संधी हुकते. मराठी भाषा टिकवताना तिला रोजगाराची जोड मिळाली आणि तसे संबंधित अभ्यासक्रम राबविले तरच रोजगाराच्या संधी वाढतील. मराठीसुद्धा रोजगाराची भाषा व्हावी म्हणून मराठी विद्यापीठाची स्थापना लवकर व्हावी. फक्त मराठी भाषा टिकवण्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीही हे आवश्यक आहे.
दक्षिणेकडील राज्यात त्या त्या भाषेसाठी भाषा विद्यापीठ आहेत. रामटेक येथे संस्कृत भाषा विद्यापीठ आहे तर वर्धा येथे हिंदीचे केंद्रीय विद्यापीठ आहे. मग मराठी भाषा विद्यापीठ का असू नये, असा प्रश्न मराठी भाषाप्रेमींना नक्कीच पडतो. परंतु आता महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषा विद्यापीठ लवकर होण्यासाठी निर्णय घेतला असून त्यासाठी समितीचे कामकाज त्वरित सुरू होण्याचे सूतोवाच राज्य सरकारने नुकतेच केले आहे.
तसे पाहिले तर, मराठी विद्यापीठाची मागणी जुनीच आहे. मराठी विद्यापीठाच्या मागणीची चर्चा 1933 साली नागपूर येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात प्रथम झाली. नंतर 1939 साली नगर येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी मराठी भाषा विद्यापीठासाठी आग्रह धरला. ते म्हणतात, ‘आजची विद्यापीठे असावी तितकी प्रागतिक नाहीत. तर ती केवळ परीक्षापीठे झाली आहेत. त्यासाठी मराठी विद्यापीठाची स्थापना अत्यावश्यक आहे.’ त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. नंतर पुण्यात महाराष्ट्र विद्यापीठ सुरू झाले. परंतु मराठी भाषा विद्यापीठासाठी प्रयत्न सुरूच राहिला. मराठी विद्यापीठ रिद्धपूर (जि. अमरावती) येथे होण्याची मागणी जेव्हा करण्यात आली तेव्हा काही लोकांनी अंबेजोगाई, नेवासा येथे हे मराठी विद्यापीठ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले. ‘चक्रधर स्वामींच्या रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ होण्यासाठी साहित्यिकांनी पाठिंबा दिला. आधीच्या सरकारने तसा प्रयत्न केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्रधर स्वामींच्या नावे रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापण्याचा शासनाचा विचार आहे असे सांगितले. परंतु हालचाल झाली नाही आणि मराठी विद्यापीठाचा प्रश्न पुन्हा बासनात गुंडाळण्यात आला. नंतर महाविकास आघाडी सरकारने मार्च 2021 साली मराठी विद्यापीठ स्थापण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, अशी ग्वाही दिली आणि शेवटी मागच्या आठवडय़ात आघाडी सरकारने मराठी विद्यापीठ स्थापण्यासंबंधी ठोस निर्णय घेऊन त्याच्या पूर्णतेसाठी वाटचाल सुरू केली आहे. मराठी भाषा भवनाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला. तसाच आघाडी सरकार मराठी विद्यापीठाचा प्रश्न लवकर मार्गी लावेल असे दिसते. प्रश्न सोडवण्यासाठी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. ती राजकीय इच्छाशक्ती आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांच्या कृतीतून दिसते.
दक्षिणेकडील राज्यात त्या त्या भाषेची विद्यापीठे स्थापन झाली आहेत. त्या विद्यापीठांचे उपक्रम, प्रकल्प याचाही विचार मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करतेवेळी व्हावा. कारण महाराष्ट्रापेक्षा दाक्षिणात्य लोक आपली प्रादेशिक अस्मिता आणि भाषा जपण्यासाठी आग्रही असतात.
प्रादेशिक अस्मिता आणि भाषा जपण्यासाठी सदैव तत्पर असणाऱया दक्षिणेकडील राज्यांना त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून तर दिलाच आणि भाषा विद्यापीठेदेखील स्थापन केली. आपल्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिणकेडील सरकारने मग ती कुठल्याही पक्षाची असती तर त्यांच्या भाषेवरचे प्रेम कमी होती नाही. त्यांची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ होती म्हणूनच भाषा विद्यापीठे स्थापन झाली. तामीळ भाषा विद्यापीठ (1981), तेलगू भाषा विद्यापीठ (1985), कन्नड भाषा विद्यापीठ (1991) तर मल्ल्याळम भाषा विद्यापीठ (2012) साली स्थापन झाली. तामीळ भाषा विद्यापीठ तंजावर येथे स्थापन झाले असून त्या विद्यापीठात कला, पांडुलिपी विज्ञान, तामीळ विकास भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्र असे सहा विभाग आहेत. त्यात उद्योग, भूगर्भशास्त्र, स्थापत्य शास्त्र, संगणक शास्त्र आणि पर्यावरण असे पोट विभाग आहेत. तामीळ भाषा विद्यापीठ स्थापण्याचा प्रयत्न 1925 पासून केला गेला. स्वातंत्र्यानंतर तामीळनाडू सरकारने विधिमंडळात कायदा पास केला आणि 1981 पासून तामीळ भाषा विद्यापीठ सुरू झाले. तेलगू भाषाविद्यापीठ 1985 साली हैदराबाद येथे पोट्ट श्रीराममुल्लू विद्यापीठ या नावाने स्थापन झाले असून एकूण 52 ज्ञान-विज्ञानविषयक अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. कर्नाटकने 1991 साली हम्पी येथे कन्नड भाषा विद्यापीठाची स्थापना केली, तर 2012 साली केरळाने मल्ल्याळम भाषा विद्यापीठ हे तिरुर येथे स्थापन केले. या विद्यापीठाचे विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र आदिंचे पदव्युत्तर शिक्षण मल्ल्याळीमध्ये देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. दक्षिणेकडील राज्यात सर्वत्र इंग्रजीतून शिक्षण घेण्याचा कल दिसत असला तरी इंग्रजीबरोबर आपापल्या राज्यांच्या भाषेत सर्व शाखांचे शिक्षण देण्यासाठी ही विद्यापीठे स्थापन झाली आहेत. या सर्व विद्यापीठांना राजकीय व आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे आज ती विद्यापीठे विकसित झाली आहेत. भाषिक अस्मितेची जोड लाभल्यामुळे आजही राज्ये सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. आपल्या महाराष्ट्रातही हे होऊ शकते.
मराठी विद्यापीठ स्थापन झाल्यास विज्ञान, तंत्रज्ञान, आयुर्विज्ञान, अभियांत्रिकी आदि विषय शिकण्याचा पर्याय ज्या युवकांना इंग्रजीमधून शिकायचे नाही त्यांच्या पुढे येऊ शकतो. पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण व संशोधन यांना चालना मिळू शकते. देशातील व परदेशातील साहित्याचे अनुवाद करून त्यांच्या भाषांतील दर्जेदार साहित्याचा अनुभव घेता येईल. तसेच मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये अनुवाद करून ते जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी अधिक सुलभ होईल. अनुवादाच्या माध्यमातून जागतिक भाषांमधील अधिकाधिक साहित्य, विज्ञान-ज्ञान मराठीत आणता येईल. लोककला, लोकसाहित्य, बोलीभाषा अभ्यास, प्राचीन ज्ञानाचे संशोधन आदि उपक्रम राबविण्यास मराठी समृद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ज्या मराठी तरुणांना इंग्रजीतून शिक्षण घेण्याची संधी आर्थिक किंवा सामाजिक अडचणींमुळे मिळू शकली नाही, त्यांना आपल्या मायमराठीतून शिकून मिळू शकेल. राज्य सरकारतर्फे अनेक महत्त्वाचे अनुवादाचे उपक्रम हाती घेतले आहेत. उत्कृष्ट अभ्यासू अनुवादकांची सध्या मागणी आहे. जागतिक पातळीवर आपले मराठी साहित्य पोहोचवण्यासाठी अशा अनुवादकांची गरज भासते म्हणून मराठी विद्यापीठ स्थापन केल्यास अशा उपक्रमांना गती येईल, असे मराठी भाषा अभ्यासकांना आणि भाषातज्ञांना वाटते.


























































