
>> अनिल हर्डीकर
जयंत सावरकर हे मराठी रंगभूमीवरील एक सुवर्णपानच. जयंत सावरकरांचे नाटय़वेड हेरत पुरुषोत्तम बाळ यांनी त्यांची भेट विजया मेहता यांच्याशी घालून दिली आणि आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांना एक चांगला नट मिळून गेला.
गिरगावच्या साहित्य संघात रात्री 8.30 वाजता ‘जंगली कबूतर’ या नाटकाचा प्रयोग लागला होता. रात्रीचे 8 वाजले होते आणि नाटकात मित्राची भूमिका करणारा नट येऊ शकणार नव्हता. नाटकाचे मॅनेजर चित्रे घामाघूम झाले होते. त्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे गेलं आणि तो त्यांचा संकटमोचक ठरू शकेल असं त्यांना वाटलं. त्यांनी त्याला विचारले, ‘कुठे चालला आहेस?’ तो म्हणाला, आता घरी जाऊन झोपणार. त्यावर चित्रेंनी आपली अडचण बोलून दाखवली. त्या कलाकाराने नाटकासाठी लागणारे कपडे नसल्याचे सांगितले. त्यावर चित्रेंनी त्या सर्व गोष्टींची तरतूद करण्याची समर्थता दर्शवली.
हाताशी केवळ अर्धा तास होता. त्या नटाला संहिता देण्यात आली. त्या नाटकात त्याने केलेली भूमिका आयत्या वेळी केलेली आहे असा संशयदेखील कुणा प्रेक्षकाला आला नाही. तो कलाकार होता जयंत सावरकर!
जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात तरुणपणी अशी वेळ येते की, माणसाला ठरवावे लागते की यापुढे त्याने चरितार्थ चालवण्यासाठी काय करायला हवे? अशाच वळणावर जयंत सावरकर नावाचा तरुण होता. मराठी रंगभूमी आणि नाटकांची आवड असणाऱया रसिकांना जयंत सावरकर हे नाव निश्चित परिचयाचे आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विनय आपटे किंवा विक्रम गोखले यांच्यासारखे मिरवावे इतका लौकिक जरी या अभिनेत्याला मिळाला नसला तरी जयंत सावरकर या अभिनेत्याने जेवढय़ा विविधरंगी भूमिका केल्या तेवढय़ा ज्यांच्या नावांचा वर उल्लेख केला त्यांनीही केल्या नसतील असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. फक्त 150 हून अधिक नाटके नाही तर 25 ते 30 मराठी मालिका, 5 हिंदी मालिका, 10-12 मराठी तसेच 7-8 हिंदी चित्रपट.. या सगळय़ात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. महाराष्ट्रातील अनेक नामवंत संस्थांनी त्यांना मानाचे अनेक पुरस्कारदेखील बहाल केले आहेत.
जयंत तरुण असताना त्याला नाटकाची हौस होती. शाळकरी वयात तो गिरगावातल्या चाळीतल्या गणेशोत्सवातील नाटकातून तो मिळेल त्या भूमिका करू लागला. बॅकस्टेजवरदेखील तो उत्साहाने काम करत होता. घरात काही श्रीमंती नव्हती. एसएससीच्या परीक्षेत जेमतेम पास झाल्यामुळे वडीलबंधूंनी स्पष्टपणे कॉलेजला अॅडमिशन घेण्यात असमर्थता दर्शवली होती. जयंताने शॉर्टहँड शिकायला सुरुवात केली आणि एकीकडे सिडनेहॅम कॉलेजला
अॅडमिशनही घेतली. शॉर्टहँडची परीक्षा पास झाला. सारे काही जयंताच्या मनासारखे त्या वेळी झाले. पब्लिक सर्व्हिस कौन्सिलची परीक्षा पास होऊन मंत्रालयात लागून वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत राहून वयाच्या 58 व्या वर्षी सुखाने निवृत्तदेखील झाला असता.पण नियतीला ते मान्य नव्हते. जयंत सावरकर यांचा जन्म झाला होता तो नाटय़देवतेची सेवा करण्यासाठी. दैवाचे फासे तसेच पडले.
जयंताचे नाटय़वेड हेरलेले एक गृहस्थ होते. ज्यांचे नाव होते पुरुषोत्तम बाळ. नाटय़क्षेत्रातील विजया जयवंत, नंदकुमार रावते, दामू केंकरे अशा मोठमोठय़ा मंडळींसोबत त्यांची नेहमीची ऊठबस होती. पुरुषोत्तम बाळ आंतर महाविद्यालयीन राज्य नाटय़ स्पर्धेतून कामे करत. 1955 साली पुरुषोत्तम बाळ यांनी तरुण जयंताला या क्षेत्रातील फार मोठय़ा व्यक्तीकडे घेऊन जायचे ठरवले. मात्र नेण्यापूर्वी हजार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. कसे वागायचे आणि कसे नाही याच्या. जयंता आपल्याला काहीतरी चांगले शिकायला मिळणार हा एकच हेतू मनामध्ये ठेवून होता. ज्यांच्या घरी जायचे होते ती मोठी व्यक्ती होती, विजया जयवंत (मेहता) आणि नियतीची चाल पहा, ज्या वेळी जयंता तिथे गेला त्या वेळी तिथे दस्तुरखुद्द विजया जयवंतसह अरविंद देशपांडे, माधव वाटवे, सुलभा कामेरकर, कमलाकर सारंग हेही होते. जयंताच्या नाटय़सृष्टीतील पदार्पणाचे जणू काही स्वागत करायला उत्सुक होते.
या जयंताने पुढे जो पराक्रम केला तो पाहून हे जाणते रंगकर्मी नक्कीच आनंदित झाले असतील. आयत्या वेळी काम करणारा नट अशी एक वेगळी ओळख मिळवणारा हा कलावंत त्यांनी आयत्या वेळी केलेल्या भूमिकांचे किस्से त्यांच्या ‘मी एक छोटा माणूस’ या आत्मकथनपर पुस्तकात वाचायला मिळतात.
व्यक्ती आणि वल्ली, एकच प्याला, सूर्यास्त, लहानपण देगा देवा, वाहतो ही दुर्वांची जुडी, सौजन्याची ऐशी तैशी, दुरितांचे तिमिर जावो, तुझे आहे तुजपाशी, नाथ हा माझा, पुण्यप्रभाव, लग्नाची बेडी, हिमालयाची सावली, भावबंधन, सखाराम बाईंडर, बेबंदशाही… अशा अनेक नाटकांतून त्यांनी विविध भूमिका केल्या
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद या संस्थेतर्फे मानाचे नानासाहेब फाटक, मा. नरेश, चिंतामणराव कोल्हटकर यांच्या नावाने दिली जाणारी पारितोषिके तर त्यांना मिळालीच, पण जीवन गौरव पुरस्कारानेदेखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पुरुषोत्तम बाळ नावाच्या एका हितचिंतकाने जयंत सावरकरांची भेट विजयाबाईंशी घालून दिला आणि रसिक प्रेक्षकांना एक चांगला नट मिळून गेला.



























































