आभाळमाया – विविधरूपी तारे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

गेल्या वेळच्या लेखात आपण आपल्या सूर्याविषयी थोडीशी माहिती घेतली. माणूस जेव्हा डोळसपणे आकाश निरीक्षण करू लागला तेव्हापासून त्याला रात्रीच्या चमचमणाऱया आकाशाबद्दल अमाप कुतूहल वाटत आले आहे. अवकाशातील तेजस्वी ‘ज्योती’चा मागोवा घेणे म्हणजेच ज्योतिषशास्त्र्ा. फलज्योतिष वेगळं. त्यामुळेच आपल्याकडच्या वराहमिहीर, आर्यभट्ट, भास्कराचार्य या खगोल अभ्यासकांना ज्योतिर्विद म्हटलं जातं. जगातल्या बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींनी आपापल्या पद्धतीने अवकाशाचा वेध घेत काही आडाखे बांधले. अवकाशासंबंधीचे नियम तयार करण्याचा, प्रमेय, गणित मांडण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांचं प्रेरणास्थान हे तारेच होते.

तारे आणि ग्रह यातला फरक या प्राचीन अभ्यासक-निरीक्षकांच्या लगेच लक्षात आला. आपण ज्यांना ग्रह मानलं त्या वेळोवेळी जागा बदलणाऱया, म्हणजेच ज्यांची गती सहज समजते अशा गोलकांना पाश्चात्त्यांनी ‘प्लॅनेट’ किंवा भटके असं म्हटलं. तारे मात्र वर्षानुवर्षे एकाच जागी स्थिर दिसतात. तसेच ग्रह लुकलुकत नाहीत, तारे चमचमतात असे फरक लक्षात येऊ लागल्यावर त्यांच्याविषयीच्या अभ्यासाला अधिक गती आली. वैज्ञानिक प्रगतीमध्ये एकदा सुरुवात झाली की, सातत्य ठेवता आल्यास उत्तरोत्तर प्रगती होत जाते. आपल्याच जुन्या संकल्पना पुनः पुन्हा तपासून घेत अधिकाधिक अचूकतेकडे जाण्याचा प्रयत्न करतं ते विज्ञान. म्हणूनच खगोलशास्त्र्ाात सूर्य हा तारा, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आणि राहू-केतू हे पृथ्वी-चंद्र यांच्या कक्षांचे छेदनबिंदू असतात. तर आपला सूर्य हा विश्वातला एक सामान्य तारा असल्याचं आपल्याला ठाऊक आहे.
ताऱयांचा जन्म एखाद्या तेजोमेघातून होतो. आपल्या सूर्याचा जन्मही एका लहान तेजोमेघातूनच सुमारे पाच अब्ज वर्षांपूर्वी झाला. सूर्याच्या जन्मानंतर काही कोटी वर्षांनी त्याच्यापासूनच आपली ग्रहमाला तयार झाली. तेजोमेघांचे आकुंचन होऊन त्यातील द्रव्याचे तापमान वाढून ऊर्जा निर्मिती करणरा तारा आकाराला येतो.

प्रत्येक ताऱयाचे ठरावीक वय असते. आपल्या सूर्याएवढय़ा वस्तुमानाचे तारे दहा अब्ज वर्षे जगतात. नंतर त्यांचं लाल महाताऱयात (रेड जायंट) रूपांतर होतं. शेवटी शेवट होतो. आपल्या सूर्याचा एकूण जीवनपट शंभर वर्षांचा समजला, तर त्यापैकी पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. सूर्य आता पोक्त झाला असून हळूहळू तो वृद्धत्वाकडे जाईल. त्यापूर्वीच त्याभोवतीची ग्रहमाला नष्ट होऊ लागेल. लाल महातारा झालेल्या सूर्याचा विस्तार बुध, शुक्र, पृथ्वीला गिळून पुढे मंगळापर्यंत पोहोचेल. पृथ्वीवरची जीवसृष्टी त्यापूर्वीच नष्ट झालेली असेल, पण ज्या मंगळावर जाऊन वस्ती करण्याची स्वप्नं आपण पाहत आहोत, त्या मंगळाचंही या वैश्विक प्रक्रियेत खरं नाही. ऊर्जेचं वस्तुमानात रुपांतर होऊन तारे, ग्रह तयार होतात, पण ताऱयाच्या अंतानंतर त्यातील वस्तुमानाचं त्याच्या स्वरूपानुसार नेमपं कोणत्या ऊर्जेत रूपांतर होतं हे पुढच्या लेखात वाचूया.

सोप्या भाषेत सांगायचं तर जन्म-मरणाचा फेरा ग्रह-ताऱयांनाही चुकलेला नाही. आपल्यासारख्या ‘प्रगत’ वगैरे प्राण्यांसकट सूक्ष्म जीवांचं अस्तित्वही त्या अब्जावधी वर्षांच्या प्रक्रियेतला एक छोटासा घटक आहे. त्यामुळेच वैश्विक योगायोगाने आपल्याला जे अस्तित्व प्राप्त होऊन विश्वाच्या स्वरूपाची जाणीवही झाली यातच अतीव समाधान मानायला हवं. कारण सूर्य आणि ग्रह तसंच जीवसृष्टीची ‘फिल्म’ रिवाइंड करून पुन्हा तशीच निर्माण करणं केवळ अशक्य. सारे ‘कॉस्मिक’ योगायोग तसेच पुन्हा जुळतील याची काय शाश्वती?