
>> सुजाता बाबर
हिंदुस्थानच्या शक्ती मिशनमुळे हिंदुस्थानचे अवकाश सामर्थ्य दिसले असले तरी ‘नासा’सारख्या संस्थेने त्यावरून अवकाशातील नष्ट झालेल्या उपग्रहांच्या कचऱयाचा प्रश्न आणखी गंभीर होईल असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचा केलेला उहापोह.
गेली अनेक शतके, सहस्रके, पुराण कथांमध्ये, इतिहासामध्ये आपण जेवढे वाचले आहे, ऐकले आहे त्यामध्ये एखाद्या देशाचे बलाढय़पण हे त्या देशाच्या काही विशिष्ट संपत्तीवर ठरविले जात असते हे स्पष्टपणे लक्षात येते आणि आजही त्या प्रथा चालू आहेत. यात शस्त्रास्त्र ही एक मोठी संपत्ती मानली जाते. शिवाय कोणत्याही देशाच्या विकासामध्ये त्या देशात असलेले ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान संपत्तीदेखील नेहमीच श्रेष्ठ ठरली आहे. आपल्याकडे वेदिक काळाचे उदाहरण हे याचसाठी दिले जाते किंवा औद्योगिक क्रांतीमध्ये काही युरोपीय देश श्रेष्ठ आणि शक्तिशाली ठरण्यामध्ये हे एक कारण होते. आजही आपापल्या देशाची शक्ती जगाला माहीत व्हावी याकरिता अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात.
यात सध्या चर्चेत असलेला असाच एक विषय म्हणजे हिदुस्थानचे शक्ती मिशन. 27 मार्च 2019 रोजी हिंदस्थानने तत्राने ASAT म्हणजेच Anti-satellite weapon किंवा उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र अवकाशात सोडले आहे. असॅट म्हणजे अवकाशात सोडण्यात आलेली शस्त्र जी उपग्रह नष्ट करणे किंवा अक्षम करणे धोरणात्मक पद्धतीने लष्करी हेतूंसाठी वापरली जातात. या एक प्रकारच्या अवकाश मोहिमा असतात परंतु हेतू अभ्यास नसून लष्करी असतो. आजपर्यंत अजून तरी याचा उपयोग युद्धांसाठी केलेला नाही. परंतु अमेरिका, रशिया आणि चीन आणि आता हिंदुस्थान यांनी या उपग्रहांच्या चाचण्या यशस्वीरीत्या करून दाखाविल्या आहेत. अशा मोहिमांमधून नेहमीच जगामध्ये अनेक प्रश्न उभे केले जातात.
हिंदुस्थानच्या या असॅट मोहिमेची सुरुवात 2010 सालापासून दिसते. त्या सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये प्रथम हे जाहीररीत्या सांगितले गेले होते की, आपल्याकडे या मोहिमेसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. या चाचणी प्रकल्पाला 2017 मध्ये मान्यता मिळाली आणि 27 मार्च 2019 रोजी आपण हे यशस्वी उड्डाण करून दाखविले. हा उपग्रह पृथ्वीवरील कमी उंचीच्या कक्षेमध्ये पाठविलेला आहे. याला लो अर्थ ऑर्बीट सॅटेलाईट असेही म्हणतात. याच्या भ्रमणकक्षेची पृथ्वीपासून उंची 300 किलोमीटर्स इतकी आहे. ओडीशामधील चंदीपूर येथून या क्षेपणास्त्राचे उड्डाण करण्यात आले. या मोहिमेला शक्ती मिशन असे नाव देण्यात आले आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली डी.आर.डी.ओ. या संस्थेने विकसित केली आहे. हिंदुस्थानची ही क्षमता प्रतिबंधक असून कोणत्याही देशाच्या विरुद्ध निर्देशित केलेली नाही असे देखील आपण जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या अवकाश मोहिमांमध्ये उपग्रह अवकाशात सोडताना जी काही यंत्रणा आणि प्रक्रिया असते त्यामध्ये प्रचंड उर्जा निर्माण होत असते आणि अनेक प्रकारचा कचरा अवकाशात सोडला जातो, ज्याला डेब्रिस असे म्हटले जाते.
या मोहिमेच्या सिम्युलेशनच्या अनुसार मिशन शक्तीने अवकाशामध्ये साधारण 6500 डेब्रिस तयार केले असावेत. अवकाशामध्ये विविध उद्दिष्टांनी पाठविलेल्या मोहिमांमध्ये असे असंख्य डेब्रिस तयार होत असतात. हा एक प्रकारचा अवकाशीय कचरा आहे आणि तो हळूहळू वाढत जाणार आहे. तो अनेक करणांमुळे घातक आहे. त्यामुळे हा कचरा लवकारात लवकर कसा नष्ट करण्यात येईल यासाठी विचार मंथन चालू आहे. याचे अनेक पर्याय असले तरी ते एखाद्या मोहीमेइतके किंबहुना अधिक खर्चिक आहेत. मिशन शक्तीमुळे निर्माण झालेले डेब्रिस तीन आठवडय़ांच्या आत जळून नष्ट करण्यात यावेत असे मत जगातील अनेक खगोलभौतिकी शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. कदाचित यातील काही तुकडे वर ढकलले जाऊन वरच्या कक्षेमध्ये जाण्याची शक्यत देखील वर्तविली जात आहे. अशा प्रकारच्या 270 तुकडयांचा वेध घेतला जात आहे. या मोहिमेचे हेतू स्पष्ट करताना हिंदुस्थानने अवकाशीय कचरा व अवकाशीय सुरक्षितता यांच्या आस्थेचे वक्तव्य केले आहे. याचे रशियाने कौतुक केले आहे. चीनच्या एका मोहिमेमध्ये 3000 डेब्रिस झाल्याची नोंद आहे तर 6500 इतक्या मोठया संख्येने डेब्रिस तयार झालेली शक्ती मोहीम ही पहिलीच मोहीम आहे. डीआरडीओच्या मते हे डेब्रिस कमी उंचीच्या कक्षेत असल्याने लवकरच म्हणजे 45 दिवसांमध्ये नष्ट होतील.
चीन आणि अमेरिका यामधील अवकाशीय शीतयुद्ध हे पुढील अनेक अवकाशीय लष्करी मोहिमांवर निश्चितच प्रभाव टाकेल. आता भारतही यात यशस्वीपणे उतरल्याने अधिकच भर पडेल. या मोहिमेनंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये नासा या संस्थेने भारतातील इस्रो संस्थेबरोबरचे सहयोग संपुष्टात आल्याचे जाहीर केल्याच्या बतम्या आल्या होत्या. परंतु 2 एप्रिलच्या पत्रामध्ये हा सहयोग संपल्याचा उल्लेख नाही. तरीही या मोहिमेमध्ये तयार झालेल्या डेब्रिसची संख्या पाहता अनेकांनी यावर टीका केलेली आहे.
केसलर सिंड्रोम
हिंदुस्थानच्या या प्रक्षेपणाने पुन्हा एकदा अवकाश कचऱयाचा विषय ऐरणीवर मांडला जात आहे. 2018 जानेवारीच्या अहवालानुसार या अवकाशीय कचऱयामध्ये 10 सेंटीमीटर पेक्षा मोठे 29000 तुकडे आहेत, 1 ते 10 सेंटीमीटर आकारचे 7,50,000 तुकडे आहेत तर 1 मिलीमीटर ते 1 सेंटीमीटर आकाराचे 166 दशलक्ष तुकडे आहेत. हे आकडे प्रचंड मोठे आहेत आणि यात अनेक देशांच्या मोहिमांचा हात आहे. यातील एखादा तुकडा इतर कोणत्याही यानावर आपटला तर ते धोक्याचे ठरेल. अगदी लहानशा दोन तुकद्यांची टक्कर जरी झाली तरी त्याची शृंखला अभिक्रिया तयार होईल. समजा यांचा भ्रमणाचा वेग सेकंदाला 8 किलोमीटर इतका जरी गृहीत धरला तरी एखाद्या गोटीच्या आकाराचा तुकडा एखाद्या उपग्रहाला अवकाशातून उडवून लावू शकेल. आणि पुन्हा यामधून अनेक टकरी संभवतील. या घटना-प्रक्रियांना केसलर सिंड्रोम असे म्हणतात. याचा अर्थ आपल्याला गुगल नकाशे उपलब्ध होणार नाहीत आणि हे अनेकांसाठी भयावह स्थिती असू शकते! अर्थातच हे केवळ एक उदाहरण आहे. जपान, अमेरिका, सिंगापूर आणि युके यांनी 103 दशलक्ष डॉलर्स निधी केवळ हा कचरा साफ करण्यासाठी देऊ केलेला आहे. प्रत्येक अवकाश मोहीम आखतानाच त्यातून निर्माण होणाऱया डेब्रिसचा विचार केला गेला पाहिजे.
या एसॅट मोहिमेने भारताचे नाव नक्कीच मोठे केले आहे, आपली अवकाश शक्ती काय असू शकते दाखवून दिले आहे. अवकाशासंबंधी जे काही शांती प्रस्ताव आणि कायदे आहेत त्यांचे पालन करणे आपल्याला अनिवार्य आहे कारण आपण त्यावर सह्या केल्या आहेत.
अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा इतिहास तसा फार जुना नाही. परंतु त्यामुळे त्याकाळच्या बलाढय़ देशांमध्ये, अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शीतयुद्धाचा पाया रचला होता. त्याकाळी 1985 मध्ये रशियाने झ्-781 या उपग्रहाला नष्ट करण्यासाठी त्यांचा शेवटचा एसॅट अवकशात सोडला होता. शक्ती मिशनने हिंदुस्थानच्या शक्तीचे दर्शन जरी घडवून आणले असले तरी त्यामुळे अवकाश विज्ञानाच्या इतर परिणामांचे विषय पुन्हा चर्चेत आणले गेले आहेत. यामध्ये राजकीय खेळी असू शकते. परंतु ही एकूणच जागतिक-वैश्विक समस्या असून सर्वांनी एकत्र तोडगा काढणे आणि त्यांचे नियमन करणे हे सर्वांच्या भल्याचे ठरेल!






























































