मनतरंग – अविश्वासाची शृंखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या सौदागर ([email protected])

पती-पत्नीच्या नात्यातील गैरसमजांची शृंखला संशयाचं जाळं अधिकाधिक विणत जाते आणि हे नातं तुटण्यापर्यंत गंभीर अवस्था निर्माण होते. यादरम्यान आलेलं नैराश्याचं मळभ दूर सारत समजुतीचे शब्द यावर नक्कीच समुपदेशक ठरतात.

राजचं काही दिवसांपासून बिनसलेलं आहे हे लक्षात यायला सुरश्रीला; त्याच्या बायकोला (दोघांची नावं बदलली आहेत) वेळ लागला खरा; पण जेव्हा तिला त्याच्या अलिप्ततेचं कारण समजलं तेव्हा ती हादरली.

गेला महिनाभर तो ऑफिसमधून उशिरा येत होता आणि थेट आपल्या बेडरूममध्ये जात होता. घरी कोणाशीही तो बोलत नव्हता. राज आणि सुरश्री ह्यांचं पंधरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं होती. राजची आई आणि सुरश्रीची आई अशा दोघीही त्यांच्याकडेच राहायला होत्या. असं एकंदरीत सहा जणांचं कुटुंब म्हणायला गेलं तर गुण्यागोविंदाने राहत होतं. पण, राजचं घुमेपण, एका खोलीत स्वतला कोंडून घेणं, सकाळी लवकर बाहेर पडून रात्री उशिरा घरी येणं आणि वाढत जाणारं धूम्रपान ह्यामुळे सुरश्री काळजीत पडली. तिने मग त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काही तिला दाद दिली नाही.

असेच काही दिवस गेले. त्या दिवशी राज नेहमीप्रमाणे उशिरा आला आणि कोणाशीही न बोलता बेडरूममध्ये गेला. त्याने जाताना सुरश्रीला सांगितलं की, त्याला कोणीही डिस्टर्ब करू नये. तिला नवल वाटलं. कारण तो कधीही असं काही बोलायचा नाही. तिने काही वेळ तसाच जाऊ दिला. पण तासाभराने मात्र ती डोकावली आणि समोरचं दृश्य पाहून किंचाळली. राज बेडवर वाकडा तिकडा पडला होता आणि त्याच्या तोंडातून फेस येत होता. समोर त्याच्या औषधांची रिकामी पाकिटं होती. त्याने औषधांचा ओवरडोस घेतला होता. त्याला तातडीने इस्पितळात हलवलं गेलं आणि त्याच्यावर उपचार सुरु झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला तातडीच्या मानसोपचारांची गरज होती. राज नैराश्याशी सुमारे सात-आठ महिने झगडत होता.

“त्याने मला तेव्हाही काही सांगितलं नाही. आताही तो काहीच बोलत नाही. तुम्हीच आता विचारा त्याला,’’ असं म्हणत सुरश्री केबिनबाहेर गेली आणि राज आत बसून राहिला. त्याची नजर शून्यातच होती. त्याला काही विचारायच्या आतच त्याने स्वत बोलायला सुरुवात केली. “मॅम, मला माझ्या घरातल्या लोकांबरोबर राहायचा उबग आला आहे. प्रचंड मानसिक छळ झालेला आहे माझा माझ्या घरात. कोणाचाही म्हणजे माझ्या आईचाही माझ्यावर विश्वास उरलेला नाही. माझी बायकोही तशीच. आता माझ्याशी प्रेमाचं नाटक करतेय. मला सगळ्या गोष्टी समजतात.’’ असं सांगताना राजचे डोळे भरून आले.
राज हा एका कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होता. मोकळ्या आणि हसतमुख स्वभावाने त्याला ऑफिसमध्ये चांगला मित्रपरिवार मिळाला होता. जशी त्याला बढती मिळत गेली तशी त्याच्यावरची जबाबदारीही वाढत गेली. त्यामुळे घरातही तो काम घेऊन येई. त्यावेळी त्याचे बोलणे मोठय़ा आवाजात असे. एके दिवशी तो असाच कामाचं एका महिला सहकाऱयाशी बोलत असता त्याच्या सासूबाईंनी काही वेगळेच ऐकले आणि त्यांनी त्याला सभ्यतेचे चार शब्द सुनावले. ही एक गोष्ट घरात बरेच दिवस चघळली गेली. त्याला आणि त्याच्या आईला शरमल्यासारखं झालं. सुरश्रीसुद्धा काही काळ त्याच्याशी तुटल्यासारखी बोलत होती. “एक वेळ सगळी दुनिया माझ्याविरुद्ध गेली असती तरी मी सहन केलं असतं. पण सुरश्री माझ्याशी बोलताना तिच्या डोळ्यात किंचित संशयाची झाक दिसत होती. ते मला सहन नाही झालं आणि शेवटी मी हे सगळं संपवण्याचा निर्णय घेतला.’ हे सांगताना त्याचे डोळे भरून आले.

गैरसमजाचे एक उदाहरण म्हणून राजच्या केसकडे बघता येईल. हे एक प्रकारचे गॅस लायटिंग ही असू शकते ज्यामध्ये व्यक्तीच्या स्वभावावर, विचारांवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्याभोवती संशयाचे जाळे विणले जाते. यासाठी गॅस लायटिंग करणारी व्यक्ती असे काही प्रसंग तिच्या बोलण्यातून तयार करत असते की इतर व्यक्ती त्या व्यक्तीप्रमाणे विचार करायला लागतात आणि पीडित व्यक्तीकडे संशयाच्या दृष्टीने पाहतात. ह्या सगळ्याचा अर्थातच त्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि ती व्यक्ती अनेकदा स्वतविषयीच शंका घेत राहते आणि सरतेशेवटी नैराश्याच्या गर्तेत जाते. काही राजसारख्या व्यक्ती टोकाचा विचार करतात.

राजचं जेव्हा थेरपी सेशन सुरू झालं तेव्हा त्याला स्वतच्याच अपराधी गंडातून बाहेर काढण्यासाठी मदत केली गेली. कारण; तो स्वतला हानी पोहोचवत होता. त्याच्या मनावर हे बिंबवण्यात आलं की त्याने कुठलाही अपराध किंवा अनैतिक कृत्य केलेलं नाही. जर एक व्यक्ती त्याला जाणून न घेता त्याच्या फक्त काही मिनिटांच्या ऐकीव संभाषणावरून तिचे स्वतचे आडाखे बांधत असेल आणि महत्त्वाचे म्हणजे त्यातून जर विकृत आनंद घेत असेल तर अशा व्यक्तींना किती महत्त्व द्यायचे हे त्याने ठरवायला हवे. त्यासाठी त्याला स्वतला स्वतवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्याला सुरश्रीबाबतही समजावून सांगावे लागले. “सुरश्रीची तुला समजून घेण्यात चूक झाली असली तरी तिला एक व्यक्ती म्हणून माफ करशील का? कारण तिने तुला ह्या महिन्यांमध्ये सांभाळून घेतलं नाही का? तिने तुला तुझ्या नाराज राहण्याचं कारण विचारलं नाही का? आणि जर ह्याही गोष्टी आता तुला पटत नसतील तर तू सुरश्रीशी एकदा मनमोकळं बोलून बघशील का?’’ असा त्याला पर्याय सुचवल्यावर त्याने होकारार्थी मान हलवली. तेव्हा पुढच्या वेळी सुरश्रीलाही सेशनमध्ये बोलावण्यात आले.

तिनेही राजची माफी मागितली, पण बोलताना हेही स्पष्ट केलं की, त्यावेळी ती त्याला पटकन बोलून गेली कारण तिच्या आईने ज्याप्रकारे तिला हे सांगितलं तेव्हा तिची मनस्थिती धक्का बसल्यासारखी झाली. तिलाही काही काळ जावा लागला.
राजने सुरश्रीच्या खांद्यावर हात ठेऊन तिला थोपटलं आणि ‘ माझ्यासाठी पुढची अपॉइंटमेंट कधी मिळेल?’ असं विचारून तो पहिल्यांदा मोकळेपणाने हसला. त्याच्या त्या हास्यात मोकळेपण आणि आशावाद डोकावत होता. (राजची केस आता व्यवस्थित चालू आहे आणि त्याचा प्रतिसादही उत्तम आहे).
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)