
>> वैश्विक, [email protected]
गोफणगतीची कौशल्यपूर्ण वैज्ञानिक कसरत पूर्ण करत पृथ्वीला पाच फेऱ्या करून, प्रत्येक फेरीच्या वेळी गती वाढवत वाढवत आणि पर्यायाने इंधनाची मोठी बचत करत चांद्रयान-3 ठरल्या वेळी चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. गेल्या पाच तारखेला चंद्राच्या कक्षेत शिरताना गती कमी करत करत आता नियोजित कार्यक्रमानुसार चांद्रपरिक्रमा करू लागलं आहे. 1969 मध्ये अमेरिका अवघ्या चार दिवसांत चंद्रावर माणूस पाठवू शकली, तर आपण एकविसाव्या शतकात इतका संथ चांद्रप्रवास का निवडला? याचं उत्तर ‘गोफणगती’च्या लेखातून मिळालं असेलच. इंधनाची ‘शिदोरी’ कमी न्यायची आणि वजन घटवायचं तर पृथ्वी-चंद्र यांच्याकडून मिळू शकणाऱ्या नैसर्गिक गतीचा वापर करणं गरजेचं कसं ठरतं आणि अगदी रशियाच्या ल्यूनापासून ते अमेरिकेच्या व्हॉएजरपर्यंत अनेक यानांसाठी यशस्वी झालेली ही पद्धत स्वीकारणं आर्थिक बचत करणारी असल्यानेच आपण त्या ‘गोफणगती’ मार्गाने चंद्राकडे जातो. चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 या दोन्ही यानांची गती अशीच होती आणि या यानांचं, चांद्रयान-2 च्या अखेरच्या क्षणी अपयश आलं तरीही जे (नव्वद टक्के) यश मिळालं त्यासाठी यानाची गती अशीच होती. यावेळी तशी गफलत होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतल्यामुळे आणि गेल्या वेळी (चांद्रयान-2 च्या वेळी) सोडलेलं, आजही चांद्रप्रदक्षिणा करणारं यान सहयोग देत असल्याने येत्या 23 तारखेला चांद्रयशाची शंभर टक्के शक्यता आहे.
अशा वेळी थोडं चंद्राविषयी जाणून घेऊ. ‘चंद्रजन्मा’च्या पारंपरिक कथा अनेक आहे. त्या जगभर आहेत. परंतु चंद्र केवळ दृष्टिपथातच नव्हे तर त्याची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्याच्याविषयीची अनेक कोडी आता सुटायला लागली आहेत. सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी, नुकत्याच जन्माला आलेल्या पृथ्वीशी एका तारापूर्व (प्रोटोस्टार) गोलकाची महा टक्कर झाली आणि त्यातून आपल्या ग्रहाभोवती परिक्रमा करणाऱ्या चंद्राचा जन्म झाला. चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह होऊन फिरतो याचं कारण म्हणजे दोघांचं गुरुत्वमध्य केंद्र (सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी) पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 1100 किलोमीटरवर आहे. त्यामुळे सुमारे 3400 किलोमीटर व्यासाचा हा गोलक पृथ्वीपासून सरासरी केवळ 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती फिरत आहे. म्हणूनच, चंद्र पृथ्वीच्या परसदारी किंवा ‘बॅकयार्ड’मध्ये आहे असं म्हटलं जातं. खगोलीय अंतरांची व्यापकता लक्षात घेता ते खरंही आहे.
चंद्रावरचं वातावरण अतिशय विरळ आहे. तिथलं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एक-षष्ठांश असल्याने इथे एक फूट उंच उडी मारली तर तिथे ती सहा फूट जाईल! म्हणून चांद्रवीर विशिष्ट चांद्रवेश (मूनसूट) परिधान करून चंद्रावर सावकाश चालतात, तरी ती चाल उडय़ा मारल्यागत वाटते.
वातावरण नसल्यामुळे सूर्यप्रकाशाचं विकिरण (रिफ्रॅक्शन) होत नाही. परिणामी आकाश निळं न दिसता दिवसाही काळंशार दिसतं. चंद्रावरची मातीही तिथे लाखो वर्षे पडलेल्या दगड-धोंडे-अशनी यांच्यामुळे काळीच आहे. (ती आम्ही पीआरएलमध्ये (1993) पाहिली होती.) सततच्या अशनी वर्षावामुळे चंद्रावर ठायी ठायी विवरं आहेत. काही प्रचंड आहेत.
चंद्रावर पडणाऱ्या प्रखर सूर्यप्रकाशाचे परावर्तन होऊन तो आपल्याला चंद्रेरी, रुपेरी दिसतो. चंद्र पृथ्वीच्या खूपच जवळ असल्याने पौर्णिमेच्या रात्रीचं चांदणं मार्ग दिसण्यासाठीही उपयुक्त ठरतं. चंद्राच्या गाभ्यात छोटासा लोहगोल आहे. त्यावरचं कवच, म्हणजे त्याचा पृष्ठभाग पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा जाड (थिक) आहे. चंद्रावर चुंबकीय क्षेत्र क्षीण स्वरूपात फार पूर्वी होतं, आता अजिबात नाही.
गेल्या 3 अब्ज वर्षांत चंद्राच्या पृष्ठभागाच्या रचनेवर उल्लेखनीय फरक पडलेला नाही. याचं कारण तिथे समुद्र, पाणी, वारा, पाऊस, वादळं असं काहीच नाही. म्हणून चांद्रवीरांचे सन 1969 मधले पावलांचे ठसे आजही तसेच आहेत. एखादी उल्का किंवा अशनी त्यावर पडला तरच ते नष्ट होतील. चंद्रावरची मऊ माती काळय़ा अग्निजन्य खडकांची पूड (पावडर) झाल्याने तयार झाली आहे.
चंद्र पृथ्वीवरच्या सागराला भरती-ओहोटी आणण्यासाठी कारणीभूत आहे. पृथ्वीवरच्या महासागरांना भरती-ओहोटीचं चक्र नसतं तर आता पृथ्वीवर आहे तशी जीवसृष्टी विकसित झाली नसती. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे सूर्य चंद्राच्या 400 पट मोठा असून पृथ्वी ते चंद्र अंतरापेक्षा पृथ्वी ते सूर्य हे अंतर 400 पटच आहे. या मॅजिक नंबरमुळे आपल्याला, चंद्र जेव्हा सरळ रेषेत पृथ्वी सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण दिसतं, कारण दोघांचं दृश्यबिंब समान आकाराचं भासतं. मात्र चंद्र पृथ्वीपासून थोडा थोडा दूर जात असल्याने कालांतराने खग्रास सूर्यग्रहणाचं विलोभनीय दृश्य पुढच्या पिढय़ांना दिसणार नाही. त्यांना कंकणाकृती सूर्यग्रहणावरच समाधान मानावं लागेल! पुढच्या लेखात चांद्रयानाच्या चंद्रावतरणाविषयी…




























































