लेख: थोडा वेळ फक्त आईसाठी

266

 

आज मातृसुरक्षा दिन. आपण फक्त वर्षातून एकदा मदर्स डे साजरा करतो. फेसबुकवर आईचा आणि आपला सेल्फी टाकून… पण खर्‍या अर्थाने आपल्या आईसाठी आपण किती वेळ देतो…? तिची किती काळजी घेतो…? तिच्या समवेत किती वेळ घालवतो…? तिला आवडणारी एखादी गोष्ट तिच्यासाठी करतो का…? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्यात महाग असणारा आपला अमूल्य वेळ खर्‍या अर्थाने तिच्यासाठी कितीसा देतो…?

आठवणीने फोन करतो

sudam-chopadekar

‘आई’ या सुंदर शब्दातच मातृत्व दडलेले आहे. ज्यांच्यासोबत त्यांची आई राहते ते खरंतर खूप भाग्यवान असतात. आमची गावी शेती असल्याने माझे आई-वडील गावी असतात आणि मी मुंबईत राहतो. व्यवसायाने ग्राफीक डिझायनर असून माझी जाहिरात एजन्सी आहे. कामाच्या व्यापात नेहमी फोन करणे तिला शक्य होत नाही, शिवाय अनेकदा गावी नेटवर्क प्रॉब्लेम असतो पण दर दोन दिवसांनी तिला माझा एक फोन असतोच. कशी आहेस, तब्येत बरी आहे ना? तुला काही हवे आहे का? या आपुलकीच्या शब्दानेच ती सुखावून जाते, तिच्या तब्येतीची चौकशी करतो आणि एखाद्या दिवशी वेळ मिळाला नाही तर आईचा हमखास मला फोन असतो. कधी गावी जायचे असेल तर प्रवासादरम्यान तिचे सात ते आठ फोन होऊन जातात. कुठे आहेस, गाडी सावकाश चालव त्यात तिची काळजी असते. गावी गेलो की शक्यतो कुठे बाहेर जात नाही. मग सगळा वेळ तिच्यासोबत घालवतो. ती आवडीचे पदार्थ खाऊ घालते. अगदी अजूनही मी लहानच आहे अशाच प्रकारे माझी ऊठबस करत असते. त्यामुळे तिच्यासोबत नसल्याने फोनवरूनच तिची विचारपूस करत असतो. तिला हवी नको ती औषध, तिच्या तब्येतीची काळजी घेत असतो. आईचे खरंच आपल्यावर खूप उपकार असतात. त्या उपकाराची परतफेड होऊच शकत नाही. त्यामुळे तिला काही आपल्याकडून सोनं-चांदी नको असते. हवी असते ती आपुलकी. जी एका फोनमधूनही मिळते. त्यामुळे मी कितीही काम असले तरी आईसाठी थोडा वेळ काढतो, फोनवर तिची विचारपूस करतो. तेवढंच तिच्यासाठी पुरेसे असते. त्यामुळे जीवनात काम, पैसा पुष्कळ मिळेल पण आई नाही. त्यामुळे दोन दिवसांतून एक फोन मी करतोच.

सुदाम चोपडेकर, ऐरोली

 

  वेळ अपुरा वाटतो

shubhangi

माझी आई एकोणऐंशी वर्षांची आहे. माझ्या कामाचे स्वरूप फार धकाधकीचे असल्याने मला आईसाठी वेळ देता येत नाही. पण आठवड्यातून एकदा तिला भेटायला जायचे असा नियमच मी स्वतःला लावून घेतलेला आहे. नेहमी रविवारची संध्याकाळ ही तिच्यासाठी राखून ठेवलेली आहे. कारण आठवडाभराच्या अनेक गप्पागोष्टी तिला माझ्यासोबत शेअर करायच्या असतात. तिला फळं खूप आवडतात. दर रविवारी आठवडाभर पुरतील एवढी फळं मी तिला घेऊन जाते. दोन-तीन तास मी तिच्याबरोबर तरी तिच्यासोबत वेळ घालवते. पण तरीही तो वेळ तिला आणि मला दोघींनाही अपुरा वाटतो. मला अजून तीन बहिणी आहेत. त्याही त्यांच्या परीने आठवड्यातून एकदा येऊन तिला भेटून जातात. एखाद्या आठवड्यात मला तिच्याकडे जाणे शक्य झाले नाही तर फोनवर तिचा सगळा वृत्तांत मिळतो. तिची औषधे, तिला डॉक्टरकडे नेणे, तिला लागणार्‍या रोजच्या गरजेच्या वस्तू आम्ही चौघी आपआपल्या परीने आणून देतो. तिला माझ्या बहिणीकडे ठाण्याला राहायला खूप आवडतं. पण आठ दिवस झाले की तिला पुन्हा तिच्या घराची ओढ स्वस्थ बसू देत नाही.

शुभांगी भाटकर, अंधेरी

 

आई माझी मैत्रीण

rahul-coubal

 आई माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. तिच्याशी बोलताना कसले दडपण येत नाही. त्यामुळे तिच्याशी सर्वकाही शेअर करत असतो. ती माझ्यासाठी एक आदर्शच आहे. अनेकदा बर्‍याच गोष्टींत तिने दिलेले सल्ले मला उपयोगी पडतात आणि मग मला कसलेच दडपण येत नाही. ती प्रेमळ आहेच त्याबरोबर हळवी पण आहे. अनेकदा तासन्‍तास आमचे गप्पा मारण्यात जातात. कधीतरी तीही माझ्या वयाची होऊन माझ्याशी अनेक किस्से शेअर करत असते. तिच्या चेहर्‍यावरचा आनंदच मला समाधान देत असतो. त्यामुळे तिला नेहमी खूश ठेवत असतो.

राहुल चौबळ, ठाणे

 

तिचे मन जपते

madhura-shirsath

आपल्या आयुष्यात आपण एका माणसाला नेहमी गृहीत धरतो ती म्हणजे आपली ‘आई’. राग आला, खूश असलो,  चिडचिड झाली, रडू आले सगळ्यांसाठी एकच उपाय ‘आई’. तिच्या असण्यातच कितीतरी सामर्थ्य आहे. आईला कधी जर राग आला, तिला एक दिवस ब्रेक घ्यावासा वाटला तर आपले काय होईल. आपण जसे मोठे होतो, नोकरीला जातो तेव्हा कळतं की आईने पण हेच केले पण तिने कधी कुरबुर केली नाही. नोकरीला जाताना नास्ता, जेवण तेही आवडीचे बनवून जायची. अगदी कुठलीही अपेक्षा न ठेवता आताही कामावरुन घरी आल्यावर जेवणाचे आयते ताट समोर मिळते. हे सगळे आपली आईच करु शकते. तिच्या कामात मदत करण्यापेक्षा तिला नेमकी कसली गरज आहे हे जाणून घेणे जास्त महत्वाचे असते. आईचे मन जपणे, तिला जास्तीत जास्त रोज आनंदी ठेवणे हा माझा रोजचा प्रयत्न असतो. त्यासाठी तिला कामातून वेळ काढून जेवलीस का असा फोन करते, आजची भाजी छान झाली होती असे तिच्या जेवणाचेही कौतुक करते हे एवढे बोलण्यानेही तिच्या चेहर्‍यावर समाधान येते. बाकी आईला काय हवे असते.

मधुरा शिरसाट, बोरिवली

आपली प्रतिक्रिया द्या