
वैजनाथ महाजन
संपूर्ण विश्वसंस्कृतीत आईला निदान या क्षणापर्यंततरी पर्याय उभा राहिलेला दिसत नाही. म्हणजे एखादी महिला एखाद्या तरुणासाठी आईच्या जागी असू शकते, पण ती आई असू शकत नाही हेच आई या अगाध नात्याचे बलस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक यशस्वी पुरुषाला आपल्या आईचे आशीर्वाद नेहमीच मोलाचे वाटत आले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘ज्ञानेश्वरी’ने तर किमान सातशे वर्षे तुमचे–आमचे भरणपोषण होत आहे. यात सुद्धा आपण त्यांच्या ठायी माऊलीचाच साक्षात्कार अनुभवत असतो.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र संस्कृतीत ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ अशा अत्यंत भावस्पर्शी गाण्याच्या सुमधुर ओळी नेहमी कानावर पडत असत. काळ बदलला, गाणी बदलली. पण, आईच्या ठायी असलेले मांगल्य मात्र अभंग राहिले आणि भविष्यातही ते तसेच शाश्वत आणि तितकेच अभंग राहील याबद्दल कुणीही संदेह बाळगण्याचे कारण नाही. आईची महती गाणारी असंख्य पुस्तके आजही मराठीत येत असतात. कोण एखादा शास्त्र्ाज्ञ आपल्या आईबद्दल लिहितो तर एखादा कलावंत तितक्याच भावपूर्णरीत्या आईचे मंगल गाणे गातो. अलीकडेच महाराष्ट्रातील एका विद्यापीठात नवीन कुलगुरूंची नियुक्ती झाली. तेव्हा पहिल्या दिवशी ते विद्यापीठाच्या पायऱ्या चढताना आपल्या आईबरोबर तिथे दाखल झाले. आणि त्यांनी सर्व पत्रकारांना सांगितले की, माझ्या माऊलीमुळे मी इथवर आलो त्यामुळे आज मुद्दाम तिच्या बरोबरीने विद्यापीठाच्या पायऱ्या चढतो आहे. यामागे कुलगुरूंची मातेबद्दलची कृतार्थता तर दिसून येतेच, पण त्यांच्या जीवनात त्या माऊलीचे किती अढळ स्थान आहे हेही सहज समोर येते.
संपूर्ण विश्वसंस्कृतीत आईला निदान या क्षणापर्यंततरी पर्याय उभा राहिलेला दिसत नाही. म्हणजे एखादी महिला एखाद्या तरुणासाठी आईच्या जागी असू शकते, पण ती आई असू शकत नाही हेच आई या अगाध नात्याचे बलस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक यशस्वी पुरुषाला आपल्या आईचे आशीर्वाद नेहमीच मोलाचे वाटत आले आहेत. आणि प्रत्यक्ष पुरुषाला जेव्हा माऊलीचा दर्जा समाजाकडून बहाल केला जातो त्यावेळीतर हे नाते दिगंतराच्याही पलीकडे पोहोचते असे वाटते. ज्ञानोबा माऊली आणि आधुनिक भारतात साने गुरुजींना आपण ‘मुलांची आई’ म्हणून गौरविलेले आहे. साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ लिहून आपल्या या संस्कारसंपन्न पुस्तकातून किमान तीन पिढय़ा तरी संस्कारित केलेल्या आहेत. त्यामुळे साने गुरुजी नेहमी म्हणत की, जे माझे साहित्य वाचतील ते माझ्या काळजाला हात लावतील. हे संस्कार देणारे साने गुरुजी हे मातेचे मांगल्य घेऊन जन्माला आले आणि आयुष्यभर त्यांनी प्रत्यक्ष आई होऊन या महाराष्ट्राची सेवा केली.
ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘ज्ञानेश्वरी’ने तर किमान सातशे वर्षे तुमचे-आमचे भरणपोषण होत आहे. यात सुद्धा आपण त्यांच्या ठायी माऊलीचाच साक्षात्कार अनुभवत असतो. मानव वंश शास्त्र्ाात असाधारण कामगिरी केलेल्या इरावती कर्वे या जगातील या विषयाच्या अनेक परिषदांना अध्यक्ष म्हणून उपस्थित राहत असत. किंबहुना त्यांच्याशिवाय या परिषदा संपन्नच होत नसत. यातच एकदा पुण्यातील काही पत्रकार त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांना विचारले की, आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता, संध्याकाळची वेळ होती, शाळा सुटली होती. त्या पत्रकारांना घेऊन गच्चीत गेल्या, खालून शाळेची मुले चाललेली होती. एका मुलाने सहज वर पाहिले आणि तो आपल्या मित्राला म्हणाला, वर बघ नंद्या कर्व्याची आई उभी आहे. इरावती कर्वे पत्रकारांना सांगतात की, माझ्या आयुष्यात यापेक्षा वेगळा आनंदाचा क्षण नाही.
आईचे हे जे काय स्थान निर्माण झाले आहे ते म्हणजे प्रत्यक्ष महाकाव्यच आहे. याकरिता ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही’ असे म्हणून ठेवलेले आहे. मॅग्झीम गॉर्कीची ‘मदर’ ही संपूर्ण विश्वात गाजलेली कादंबरी आहे. या कादंबरीने जे ‘मातेचे काव्य’ साकारलेले आहे त्याला खरंच तोड नाही. असेच आपल्याकडे माधव ज्युलियन यांनी ‘‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई, बोलाव तूच आता, मी कोणत्या उपायी’’ असे अत्यंत भावसौंदर्याने नटलेले काव्य निर्माण केले आहे. त्याबरोबरच कवी यशवंतांनीही याबाबतीत आईवर कविता लिहून आपले काव्यातील स्थान निश्चित केलेले होते. यामुळे आई ही रोज आपल्या साहित्याचा आणि त्याबरोबरच नित्य जगण्याचा आनंदाचा ठेवा म्हणून समोर येत राहिली आहे. नारायण सुर्वे यांनी आपल्या एका कवितेत ‘‘आधीचे नव्हतेच काही, आता आईही नाही’’ अशा पिळवटून टाकणाऱ्या ओळी लिहिलेल्या आहेत.
आचार्य अत्रे यांनी विपुल लेखन केले. पण, आपण आपल्या आईला काशीयात्रा घडवू शकलो नाही याचे शल्य त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविले आहे. त्यामुळे मुलगा कितीही मोठा झाला, मुलगी कितीही कर्तबगार झाली तरी त्याला अथवा तिला मागे वळून पाहताना प्रथम दिसते ती आपली आई. यामुळे आई हे केवळ नाते नाही तर त्याबरोबरच ते एक भावस्पर्शाने गदगदून आलेले असे झाडच असते. म्हणून मातृमुखी मुलगा अथवा मातृमुखी मुलगी यांचे पण घरीदारी नेहमी कौतुक होत आलेले आहे.
केवळ कुटुंबकबिला सांभाळते म्हणून आईबद्दलचा कृतार्थतेचा भाव नसतो तर ती नसताना घर खायला उठते हादेखील अर्थ त्यातून पाझरत असतो. यामुळे ज्यांना आपल्या आईचा सहवास लाभतो ते तर धन्य आहेतच, पण ज्यांना आईचा मंगलमय सहवास अभावाने लाभतो त्यांच्याही ठायी आई सतत समोर असते. त्यामुळे आईला आठवणे म्हणजे साऱ्या नातेसंबंधांना आठवणे आणि त्यातून सतत मातेचे मंगलमय महान नाते समजून घेणे हाच यातील खरा सौख्याचा आणि चिरंजीव आनंदाचा असा भाग आहे.






























































