मुद्दा – एमटीएनएलची वाटचाल…

1206

>> सुधाकर पाटील

मी एमटीएनएलचे मोबाईल सिम वापरत असून गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत बऱ्याचशा ठिकाणी सिग्नलच मिळत नसल्यामुळे मला नेहमी असे वाटायचे की, सरकार व एमटीएनएलने अनधिकृतपणे मोबाईल सेवा बंद तर केली नाही ना? या शंकेवर “बीएसएसएन-एमटीएनएल बंद करा’’ या वृत्ताने शिक्कामोर्तब केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  सरकारी कंपनी असून सर्व कर्मचाऱ्यांना चांगला पगार  मिळत असूनदेखील एमटीएनएल चांगल्या दर्जाची सेवा का देऊ शकत नाही? हा खरा ग्राहकांचा प्रश्न आहे. आमच्या कंपनीचे अनेक ग्राहक हे नवी मुंबईच्या अनेक भागात आहेत व त्यांना मिळणाऱ्या मोबाईल व लिज्ड सर्किटबाबत नेहमीच ओरड असते आणि त्यातही खासकरून उरण भागात एमटीएनएलची सेवा बहुतांश वेळेला  ‘आऊट ऑफ ऑर्डरच’ असल्याचे ग्राहक सांगतात. टेलिकॉम क्षेत्रातील ‘बाप’ कंपन्या असूनदेखील बीएसएनएल-एमटीएनएल या सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांसमोर आपल्या वेगवेगळ्या सेवांच्या दर्जाबाबत का टिकाव धरू शकत नाहीत याचे उत्तर ना सरकार, ना या कंपन्यांचे अधिकारी देताना दिसतात. एमटीएनएल प्रशासन अजूनही पूर्वीच्याच स्वप्नांच्या दुनियेत मश्गूल दिसतात. ना सेवेची चिंता, ना ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेची चिंता. बीएसएनएल-एमटीएनएलचा एकूणच कारभार हा खासगी कंपन्यांस पूरक असल्याचे दिसते. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि त्यामुळे सेवेचा दर्जा उत्तम राखणे अत्यंत आवश्यक असताना सरकारी टेलिकॉम कंपन्या आपल्या सेवेच्या दर्जाबाबत इतक्या उदासीन का? खासगी कंपन्यांचे कमी दर तर सरकारी कंपन्यांचे वाढीव दर हे धोरण सरकारी कंपन्यांना तारक की मारक? याचा खुलासा सरकारी कंपन्यांच्या मंत्र्यांनी, प्रशासनाने,  सरकारी कंपन्यांचा भार आपल्याच खांद्यावर आहे अशा अविर्भावात वागणाऱ्या नेते मंडळींनी करायला हवा. एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत व ते काम करत नाहीत असा खुलासा अधिकारी करताना दिसतात. हा सर्वात मोठा विनोद वाटतो. कर्मचारी काम करत नाहीत तर मग अधिकारी त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? की कोणीच काम करत नाही म्हणून एमटीएनएलवर ही वेळ आलेली आहे. नवी मुंबईत एमटीएनएलच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जागांचा डोकं  वापरून वापर केला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागू शकतो. शेवटी सरकारनेदेखील आपल्याला सरकारी टेलिकॉम कंपन्या बंद करावयाच्या की चालवायच्या याबाबत झाकली मूठ ठेवत ‘कर लो दुनिया मुठीमे ’ अशा म्हणणाऱ्या कंपनीला पूरक वातावरण न ठेवता एक ठोस निर्णय घ्यायला हवा. कंपन्या चालवायच्या असतील तर ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा दर्जा व दर याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. बंदच करावयाच्या असतील तर लगेच टाळे लावावे, जेणेकरून ग्राहकांची ससेहोलपट होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या