लेख – अथवा की आणि?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी  

एकदा ट्रेनमध्ये गप्पा चालल्या होत्या… ‘‘आमची मुलगी सतार शिकते’’ कोणीतरी म्हणालं, ‘‘अरे वा!’’ असे कौतुकाचे उद्गारही आले. तिथेच बसलेल्या चाळिशीच्या एकाने म्हटलं, ‘‘मलासुद्धा आवड आहे, असं काहीतरी तंतुवाद्यं शिकायची, पण सध्या कुठे जमतंय? कामाचा, संसाराचा व्याप, निवृत्त झाल्यावर मी हा छंद जोपासणार आहे.’’ त्यावर आणखी एक म्हणाला, ‘‘पण निवृत्तीनंतर फार वेळ लावू नका, नाहीतर वाढत्या वयात थरथरत्या हातांनी वाद्यं आपोआपच वाजायला लागतील!’’ मग हास्यकल्लोळ.

यातली गंमत जाऊ द्या. त्या गृहस्थांच्या मनात एखादी सतार किंवा व्हायलिन किंवा संतूर झंकारत होतं हे महत्त्वाचं. पुढे त्यांनी कसलं शिक्षण घेतलं ठाऊक नाही, पण हा किस्सा आठवला की, त्याचबरोबर आमच्या एका शिक्षकांचं सांगणं आठवलं. ते म्हणायचे, ‘‘तुमची प्राधान्यक्रमाची यादी कशी असावी माहितेय? व्हर्टिकल किंवा एकाखाली एक अशी नव्हे, तर हॉरिझॉन्टल म्हणजे एकाच प्रतलात. आयुष्यात उत्तम काही करण्याचा सुवर्णकाळ म्हणजे तारुण्य. तेव्हा ‘ऑर’मध्ये (अथवा) विचार करू नका ‘अॅण्ड’मध्ये (आणि) करा. आम्ही त्यांचं सांगणं नंतरच्या आयुष्यात जमेल तसं अमलात आणलं.

हे की ते? असा प्रश्न आपल्याला सातत्याने पडत असतो. पर्याय आणि संधी अनेक असल्या तरी सुखाच्या गोष्टीतही असे प्रश्न पडतातच. म्हणजे आज नाटक बघायचं की सिनेमा? पण त्याचं उत्तर लगेच शोधता येतं. नोकरीसाठी एकदम दोन ठिकाणी निवड झाली तर खूप मोठा प्रश्न पडतो. अशा वेळी तारतम्याने निर्णय घेतला जातो. कधी तो बरोबर ठरतो, कधी चुकतो. त्याला इलाज नसतो. घेतलेला निर्णय स्वतःच्या मनाशीही कटकट न करता निभावून नेता येणं अधिक महत्त्वाचं.

एकाच वेळी अनेक गोष्टी यशस्वीरीत्या करणाऱ्या प्रज्ञावंतांविषयी आदर वाटतोच, पण त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली पाहिजे. मराठीत पहिलं वर्तमानपत्र ‘दर्पण’ सुरू करणारे बाळशास्त्री जांभेकर अल्पायुषी ठरले, पण अवघ्या बत्तीस वर्षांच्या जीवनात ते सहा-सात भाषा शिकले. विज्ञानाचाही अभ्यास केला. खगोलातील ज्या तारकासमूहांना हिंदुस्थानी नावं नव्हती ती त्यांनी चपखलपणे दिली, ‘अॅड्रोमीडा गॅलॅक्सी’ला देवयानी दीर्घिका अशा प्रकारची.

रॉजन बेकन नावाचा संशोधक उत्पृष्ट चित्रकार होता आणि कुस्ती खेळण्यातही वस्ताद! त्याने अनेक गोष्टींवर वैज्ञानिक संशोधन केलं. स्वामी विवेकानंदांना अवघं एकोणचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलं, पण अमोघ वाणीने त्यांनी जग जिंकलं. मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली.

तीव्र इच्छा असली की, मनात किंतु येत नाही. छोटय़ाशा वाटणाऱ्या आपल्या आयुष्यात रचनात्मक असं बरंच काही करता येतं. कोणाला तरी प्रभावित करण्यासाठी नव्हे, तर आपल्याला समाधान मिळावं म्हणून ते केलं, तर त्याचे लौकिक फायदेही आपोआप मिळतात.

मध्यंतरी एक तरुण भेटला. मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं की मराठी माध्यमाच्या, असा प्रश्न त्याच्यापुढे होता. मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर ते लवकर समजतं आणि रुचतं असं आता भाषातज्ञही सांगतात. त्यावर त्याचं म्हणणं ‘‘आमच्या इथली त्याच्या वयाची सगळीच मुलं इंग्रजी माध्यमात शिकतायत. याला मराठी शाळेत घालून कॉम्प्लेक्स आला तर? पण इंग्लिशमधून शिकवणंही पटत नाही.’’

माझ्या शिक्षकांचं म्हणणं त्याला सांगितलं. मराठी ही आपल्या संस्कृतीची भाषा आहे, तर इंग्लिश ही व्यावहारिक सोयीची. आम्हीही मराठी माध्यमातच शिकलो. मी तर अकरावीपर्यंत म्युनिसिपल शाळेत शिकलोय. कुठे प्रश्न आला नंतर इंग्लिश न येण्याचा? तू ‘ऑर’मध्ये विचार करू नकोस, ‘अॅण्ड’मध्ये कर. घरी मुलाला उत्तम इंग्लिश शिकव. शाळेत मराठीत त्याला सहज सारं समजेल. मराठी माध्यमातून शिकून इंग्लिशवर प्रभुत्व मिळविलेली कितीतरी मराठी मंडळी मला माहीत आहेत. त्यातून हे जमत नसेल तर शिक्षणाचं माध्यम इंग्लिश निवडलंस तरी संस्कृतीचं माध्यम मराठीच असेल याची काळजी घे. समस्या म्हणून नव्हे, तर आव्हान म्हणून स्वीकार. संस्कृतीविषयक मराठी संस्कृतीमधल्या सर्व गोष्टींची चर्चा घरी होत असेल तर त्याचं सांस्कृतिक संवर्धनही होईल.

आमच्या खगोल संस्थेत आम्ही जाणीवपूर्वक  प्रयोग केला. इंग्लिश माध्यमाच्या मुलांना मराठीत आणि मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्लिशमध्ये व्याख्यानं घ्यायला नुसतं सुचवलं नाही, तर शिकवलं. नंतर सर्व कार्यकर्ते दोन्ही भाषांमध्ये उत्तम व्याख्यानं देऊ लागले. ही काही उदाहरणं एवढय़ासाठी की, प्रत्येक वेळी ‘अथवा’चा विचार करताना आपण काहीतरी गमावतो. अगदीच नाइलाज असतो तेव्हाची गोष्ट वेगळी, पण बहुतेक वेळा ‘अॅण्ड’ किंवा ‘आणि’मध्ये विचार केला तर मनात रुखरुख राहणार नाही. त्यासाठी वेळेचं अचूक नियोजन आणि कष्ट करायची जिद्द मात्र हवी. बुद्धिदात्या गणपतीचा उत्सव सुरू असताना मनाला विचारशील करण्याची प्रेरणा प्राप्त केली तर उत्तम कृतीशीलताही साध्य होईल.

[email protected]