लेख – मुंबई बनली टॉवर्स नगरी

>> ज्ञानेश्वर भि. गावडे

टॉवर्सची संख्या मुंबईचा घास घेत आहे. मुंबई शहराची लोकसंख्या पावणे दोन कोटींच्या आसपास गेली असून आडवी वाढण्यास जागाच नसल्यामुळे एकावर एक मजले वाढत आहेत. मजल्यावर मजले चढत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जगातील सर्वात जास्त घनतेचे शहर म्हणून मुंबईची ओळख झालेली आहे.

शहरातील फुप्फुसे वा वायुकोश असलेल्या ठिकाणांची दमछाक झालेली आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी मुंबईत ‘उषाकिरण’ नावाची पहिली उंच इमारत जन्माला आली. नंतर कामगार वस्तीमध्ये नागपाडा भागात ‘केडी टॉवर’ आकारास आली. नंतरच्या काळात मुंबईच्या लष्करी ठाण्यात ‘आदर्श टॉवर’ बत्तीस माळे व शंभर सदनिका असलेला टॉवर उभा राहिला.

राजकारण आणि लष्करातील उच्चभ्रू लोकांचा सहभाग म्हणून प्रचंड टीकेचा प्रहार ‘आदर्श’च्या वाटय़ाला आला. या काळात सुमारे पाच हजार टॉवर्स जन्माला आले आणि मुंबईची ‘टॉवर्स नगरी’ म्हणून ओळख सुरू झाली. आजही 72 फूट उंचीच्या उंच इमारती मुंबईत ठिकठिकाणी आहेत. त्यावरही एकेक मजले वाढविल्याचे उघडय़ा डोळय़ांना दिसतात.

एखादी उंच वास्तू बांधली की, वरून खाली रंगरंगोटी, गिलावा करण्याचे काम सुरू करावे लागते, परंतु अशा काही इमारती मर्यादित उंचीच्या असल्या तरी त्यावर नवनवी बांधकामे करीत असल्याचे स्पष्टपणे जाणवतेच. मुंबईच्या लोकसंख्येच्या घनतेची तीव्रता वाढवीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या