मुद्दा : मुंबईतील वाढती वाहने

110

>> वैभव पाटील

येत्या जुलैपासून मुंबईत नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या वाहनचालकांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मुंबईत वाढलेली भरमसाट वाहने व त्याचा रस्ते वाहतुकीवर होत असलेला विपरीत परिणाम भविष्यातील सर्वात मोठी समस्या आहे. मुंबईत वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने बहुतांश ठिकाणी वाहने थेट रस्त्यावरच उभी केली जातात. हीच वाहने अनेकदा वाहतुकीस अडथळा ठरतात व ट्रफिकच्या समस्येस कारणीभूत ठरत असतात. या पार्श्वभूमीवर नो पार्किंगचे नियम अधिक कडक करणे गरजेचेच आहे, मात्र मूळ समस्येसाठी हा नियम कायमस्वरूपी पर्याय ठरू शकत नाही. मुंबईतील आज एकही मुख्य रस्ता असा नाही जो वाहनांनी पूर्णपणे व्यापलेला नाही. दर दिवशी सरासरी 40 लाख वाहने मुंबईच्या रस्त्यावर धावत असतात. यात दुचाकी व कारची संख्या सर्वाधिक आहे. या वाहनांमुळे रस्त्यावर धावणारी वाहने साधारणतः 20 किलोमीटर प्रतिताशी वेगापेक्षा अधिक वेगाने धावत नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे. सकाळ-संध्याकाळच्या ट्रफिकच्या वेळी तर हा वेग ताशी 10 किमीपेक्षा कमी असतो. ट्रफिकच्या बाबतीत मुंबई जगातील सर्वाधिक वाहतुकीची समस्या असलेल्या शहारांपैकी एक आहे. वाढती वाहनसंख्या आज मुंबईसह सर्वच शहरांची डोकेदुखी झाली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाहने खरेदी व नोंदणी होत असतील तर वाहनांचा हा कर्दनकाळ किती मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर उतरत आहे हे ध्यानात येईल. वाहनांचा फोफावत चाललेला हा भस्मासुर शहरे गिळंकृत करू लागला आहे. एकीकडे पार्किंगचे नियम कडक करत असताना दररोज रस्त्यावर येणारी नवी वाहने रोखायला हवीत ही बाब कुणाच्याच कशी लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. पार्किंगसाठी जादा दंड आकारून समस्या सुटणार नाही. नव्या वाहनांची नोंदणी करतानाचे नियम अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी वाहतूक विभाग, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय जास्त महत्त्वाचा आहे. निवासी संकुलांमध्ये पार्किंगची जागा उपलब्ध असल्याशिवाय वाहनखरेदीस परवानगी देण्यात येऊ नये. शहरात नवी वाहने दाखल करताना वाहन कंपन्यांवर मर्यादा आणायला हव्यात. पर्यावरणपूरक वाहन निर्मितीवर भर देण्यात यावा जेणेकरून वाढत्या प्रदूषणाला आळा बसू शकेल. प्रतिकुटुंब वाहनांची संख्या निश्चित करावी जेणेकरून अवास्तव वाहनखरेदी रोखली जाईल. शहरात बहुमजली वाहनतळांसाठी जागा उपलब्ध करण्यात यावी. यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके, बाजारपेठा अशी ठिकाणे निवडावी. एकंदरीत वाहन पार्किंगसाठीचे नियम कडक करण्याऐवजी वाहनसंख्या कमी करण्यावर भर दिला तर वाहतूककोंडी व रहदारीच्या समस्या उद्भवणार नाहीत. आगामी काळात शहरी जीवन सुसह्य ठेवायचे असेल वाहनांचा वाढता कर्दनकाळ रोखणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने उपाययोजना आखायला हव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या