
>>प्रशांत गौतम
हिंदी सिनेसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांना नुकताच पं. हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार घोषित झाला आहे. हृदयेश आर्टद्वारा संगीत क्षेत्रात भरीव आणि ठसठशीत योगदान देणाऱ्या दिग्गजांचा प्रतिवर्षी पुरस्काराने सन्मान केला जातो. येत्या 26 ऑक्टोबर रोजी हृदयनाथ मंगेशकर यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण होणार आहे. वरिष्ठ संगीतकार आणि गीतकार अशी ओळख असलेले खय्याम आज 91 वर्षांचे आहेत. एकापेक्षा एक अजरामर संगीत दिग्दर्शन आणि गीतलेखनाने सिनेरसिकांची, जाणकारांची अभिरुची संपन्न आणि समृद्ध केली. आपल्या संगीत क्षेत्रातील करीयरची सुरुवात त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लुधियाना येथे 1943च्या सुमारास केली. पुढील काळात शर्माजी-वर्माजी या पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त संगीतकारांच्या सान्निध्यात आले. 1948 च्या सुमारास खय्याम यांनी लोकप्रिय चित्रपट ‘हीर रांझा’साठी संगीत दिग्दर्शन केले. या जोडीतील रोहनलाल वर्मा पुढील काळात पाकिस्तानात गेले आणि खय्याम यांची स्वतंत्र वाटचाल सुरू झाली. 1953 साली ‘फुटपाथ’ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले.
पंजाब राज्यात 18 फेब्रुवारी 1927 साली खय्याम यांचा जन्म झाला. आज 91व्या वर्षीही त्यांचा सक्रिय सहभाग हा उत्साहवर्धक असतो. 1953 मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फुटपाथ’ हा चित्रपट मिळाला. त्या वेळची एक आठवण सांगितले जाते ती म्हणजे चित्रपटाचे लेखक झिया सरहदी यांनी खय्याम यांना त्याच नावाने कारकीर्दीस नव्याने सुरुवात करण्यासाठी सुचविले. खरे तर या हिंदी सिनेसृष्टीत आपणही अभिनेता व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. प्रत्यक्षात मात्र संगीतकार म्हणून त्यांनी आपले बस्तान बसवले. प्रारंभीच्या काळात त्यांना संगीतकार
पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे सहायक म्हणून काम केले आणि त्यानंतरच्या पुढील चाळीस वर्षांत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिग्दर्शन देऊन भरीव योगदान दिले. फिर सुबह होगी (1958), ब्लॉकबस्टर सिनेमा शोला और शबनम (1961), आखिरी खत (1966), कभी कभी (1976), त्रिशूल (1978), नूरी (1979), थोडीसी बेवफाई (1980), दर्दे और आहिस्ता आहिस्ता (1982), रझिया सुलतान (1983) या चित्रपटांना खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन लाभले. इन आँखो की मस्ती के मस्ताने हजारो है, कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है, गपुची गपुची गम गम, जुस्तजू जिस की भी उस को तो ना पाया हमने, दिखाई दिए यूं, दिल क्या है, परबतों के पेडेपर श्याम का बसेरा, मै पल दो पल का शायर हूं, ये क्या जगह है दोस्तो, ये कौनसा दयार है, है कली कली के लब पर आज यासारखी किती तरी गाणी रसिकांच्या ओठावर असतात. संगीत दिग्दर्शन क्षेत्रात भरीव योगदानासाठी खय्याम यांना कभी कभी, उमराव जानसाठी उत्तर प्रदेश सरकारचा पहिला संगीतकार नौशाद पुरस्कार लाभला. तर 1982 च्या सुमारास फिल्मफेअर या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव झाला. महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मविभूषणही त्यांना प्राप्त झाला. खय्याम यांच्या संगीत दिग्दर्शनातील कितीतरी गाणी लता मंगेशकर, आशा भोसले यांनी गायली. जी आजही असंख्य रसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. पं. हृदयनाथ पुरस्काराने त्यांच्या संगीत दिग्दर्शन कारकीर्दीत लक्षणीय भरच पडली आहे.


























































