प्रासंगिक –  पंचमीचा सण आला….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा कुलकर्णी

दरवर्षी नागपंचमीचा सण जवळ आला की, मन हळवे होते आणि बालपणीच्या काळात जाऊन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून झोके घेऊ लागते. श्रावणमासाची चाहूल लागली की, घरात आईची नागपंचमीच्या सणाची तयारी सुरू होत असे. शेतातली खास लाह्यांकरिता काढलेली शाळू ज्वारी घरी यायची. मग त्या ज्वारीवर आधण टाकून, निथळून ती आजीच्या मऊसूत लुगड्यावर वाळवायला पसरली जायची. अधूनमधून त्या वाळवायला पसरलेल्या ज्वारीवर हात फिरवून ती सारखी करायचे काम आम्हा मुलांना फार आवडायचे. बाजारातून नागोबाच्या नैवेद्याला करायच्या तंबिटाच्या लाडवांकरिता म्हणून पंढरपुरी डाळे आणले जायचे. आई ते डाळे जात्यावर दळून काढत असे. मग एक दिवस दुपारची जेवणे आटोपली की, लाह्या भाजण्याचा कार्यक्रम होत असे. कोठी घरातून लाह्या भाजण्याकरिता मोठे लोखंडी घमेले आणि घोळणा बाहेर काढला जायचा. शेजारच्या काकू, मामी मदतीला यायच्या. मोठी चूल रसरसून पेटायची. त्यावर घमेले चढवले जायचे आणि तापलेल्या घमेल्यात मूठ मूठ ज्वारी टाकून ती भाजली जायची. बघता बघता ज्वारीच्या चांदण्यासारख्या पांढर्‍याशुभ्र, टपोर्‍या, हलक्या लाह्या तडतडून फुटायच्या. लाह्यांचा मोठा ढीग व्हायचा. मग त्या चाळून, घोळून मोठमोठय़ा पत्र्याच्या डब्यात भरल्या जाईपर्यंत आम्हा मुलींचे परकराचे ओचे आणि मुलांचे खिसे लाह्यांनी भरायचे. घरात लाकडी पाटाचा झोपाळा कायमच असायचा, पण तरीसुद्धा खास पंचमीकरिता म्हणून जाडजूड असा दोरखंडाचा झोपाळा तुळईला बांधला जायचा. परसातल्या चिंचेवर आणि बाभळीवरही असेच झोपाळे बांधले जायचे. लाह्यांबरोबर भाजलेले शेंगदाणे, खोबरे, गूळ असायचे. पोटभर ताज्या लाह्या खायच्या. दुसर्‍या दिवशी आई नागोबाच्या नैवेद्याला खास तंबिटाचे लाडू करायची. आईला मदत म्हणून लाडवात घालण्यासाठी खोबरे किसून दे, तीळ निवडून दे अशी मदत आम्ही करायचो. तंबिटाचे लाडू हे एका विशिष्ट पद्धतीने वळायचे असतात. लाडू गोल वळून वरच्या बाजूने तो खोलगट ठेवायचा असतो. असे लाडू वळताना खूप मजा यायची. तंबिटाचा खमंग दरवळ घरभर पसरायचा. तोंडाला पाणी सुटायचे, पण नागाला नैवेद्य दाखविल्याशिवाय मिळणार नाही अशी सक्त ताकीद असायची. लाडू झाले की, आई भाजणीची चकली आणि चिवडा करायची. गल्लीतल्या सगळ्या घरांमधून अशी पंचमीची तयारी सुरू झालेली असे. गल्लीत नव्या लग्न झालेल्या माहेरवाशिणी पंचमीच्या आणि मंगळागौरीच्या सणासाठी म्हणून माहेरी आलेल्या असत.

नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अंगण, घर स्वच्छ झाडून, अंगणात सडा टाकून त्यावर रांगोळीने छान गाठीचा नागोबा काढला जायचा. उंबर्‍यावर, देवघरातही ठिपक्यांचे, गाठीचे नाग आणि त्याची पिले अशीच रांगोळी काढली जायची. परसातल्या बागेतून फुले, पत्री, तुळस, दवणा, आघाडा, माका, बेल काढायचा. खास बाजारातून केवडाही आणलेला असे. पिवळ्या शाडूचा, रंगीत ठिपक्यांनी रंगवलेला नागोबाही आदल्या संध्याकाळीच आणून ठेवलेला असे.  पाटावर रांगोळी काढून त्यावर अक्षता घालून नागोबाची स्थापना व्हायची. त्याला जानवे, गेजवस्त्र, हळदकुंकू, गंध, फुले, पत्री घालून छान पूजा केली जायची. दूध, लाह्या, तंबिटाचा लाडू, चकली, चिवडा यांचा नैवेद्य दाखविला जायचा. घरची अशी पूजा झाली की, सगळ्या मैत्रिणी, शेजारपाजारच्या बायका मिळून पूजेचे साहित्य घेऊन गावातल्या देवळात आणि वेशीवरच्या वारुळाला ‘चल गं सखे वारुळाला। नागोबाला पुजायाला।।’ अशी पारंपरिक गाणी म्हणत जायचे. वारुळाची पूजा करायची. त्यादिवशी दिवसभर गारुडी टोपलीत घालून तर्‍हेतर्‍हेचे नाग, साप घेऊन येत असत. त्यांनाही पैसे, फराळ, शिधा असे दिले जात असे. नागपंचमीच्या दिवशी काही कापायचे, चिरायचे, तळायचे नाही म्हणून स्वयंपाकात उकडीचे पुरणाचे दिंड केलेले असत. जेवणे झाली की, दुपारभर झोपाळ्यावर बसून उंच उंच झोके घेत पारंपरिक गाणी म्हटली जायची. संध्याकाळी एकमेकांकडे हळदीकुंकवाला जायचे. रात्री घरातले सगळे एकत्र जमून नागोबाची आरती केली जायची. दुसर्‍या दिवशी नागोबाला दहीभाताचा नैवेद्य दाखवून त्याचे विसर्जन करायचे. पंचमीचा सण असा दणक्यात, उत्साहाने साजरा व्हायचा. पुढे महिनाभर लाह्या आणि लाह्याच्या पिठापासून बनवलेले अनेक प्रकार करून खाल्ले जायचे. एकमेकांकडच्या फराळाची, तंबिटाची देवाणघेवाण व्हायची. झोपाळे मनसोक्त झुलवले जायचे. पंचमीच्या सणाचा हा आनंद पुढे कित्येक दिवस मनात आणि वातावरणात रेंगाळत राहायचा.

आजही नागपंचमीचा सण आला की, या सार्‍या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. नागपंचमीच्या सणातला तो आनंद, ते वातावरण आणि त्यातले निरागस हळवेपण कुठेतरी हरवून गेल्याची रुखरुख मनाला लागून राहते आणि नकळत ओठांवर गाणे येते, ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले…’