शहरभान : माझी मेट्रो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश उपदेव

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या महामेट्रो प्रकल्पातून नागपूरच्या मेट्रोचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. दुसऱया टप्प्याचे कामही झपाटय़ाने सुरू आहे. देशातील पहिली ग्रीन मेट्रो या उद्देशाने साकारण्यात येणारा हा प्रकल्प निश्चितच वैशिष्टय़पूर्ण ठरणारा आहे.

राज्याच्या उपराजधानीसह विदर्भाचा चौफेर विकास होत असून या विकासात नागपुरात सुरू झालेल्या ‘माझी मेट्रो’ची भर पडली आहे. भविष्याचा विचार करून वाढती लोकसंख्या, प्रवासी संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या महामेट्रो प्रकल्पातून नागपूरच्या विकासात मोठी भर पडली आहे. नागपूरचे खासदार नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनमधून विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. विकासाच्या यशात ‘माझी मेट्रो’चे सर्वेसर्वा ब्रजेश दीक्षित यांचा सिंहाचा वाटा आहे. मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्थानक ते खापरी मेट्रो स्थानकापर्यंत रोज 25 फेऱया सुरू झाल्या आहेत. दुसऱया टप्प्याचे काम झपाटय़ाने सुरू असून याकरिता अहोरात्र मेहनत सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करून पहिल्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविला होता. देशातील ती पहिली ग्रीन मेट्रो देशात प्रसिद्ध होईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त केला होता. दुसऱया टप्प्याच्या कामाला आशीर्वाद देण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच नागपुरात येणार आहेत.

इच्छाशक्ती
राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणतेही कठीण काम शक्य होऊ शकते हे मेट्रोने दाखवून दिले आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विदर्भाचा विकास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ-मराठवाडय़ात विकासाचा धडाका सुरू केला आहे. पाच वर्षांचा इतिहास बघितल्यास अनेक मैलाचे दगड, अडथळे पार करीत ‘महामेट्रो’ने राज्याचा लूक बदलविण्यासाठी मोठी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावली आहे. अवघ्या काही वर्षांत नागपूरचा चेहरा बदलविण्याचे मोठे काम महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी केले आहे.

21 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘महामेट्रो’चे भूमिपूजन झाले आणि 8 मार्च 2019 मध्ये पहिल्या मेट्रोचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. दुसऱया टप्प्याचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नागपुरात लवकरच येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूरची लोकसंख्या 30 लाखांच्या घरात गेली असून त्या तुलनेत शहरात दळणवळणाची सोय कमी होती हे लक्षात घेऊन ‘महामेट्रो’ सुरू करण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर 21 ऑगस्ट 2014 रोजी महामेट्रोचे भूमिपूजन झाले. त्यानंतर 21 मार्च 2015 रोजी मेट्रोच्या संकेतस्थळाचे लोकार्पण झाले. 4 डिसेंबर 2015 रोजी प्रत्यक्ष कामाला नागपूरच्या विमानतळाजवळ सुरुवात झाली. बांधकामाकरिता 44 महिने लागले. वीस हजार कामगार, कर्मचारी या कामासाठी कार्यरत होते.
38.2 किलोमीटर लांबीचा हा महामेट्रो मार्ग तयार झाला आहे. यात नागपूरजवळील खापरी, हिंगणा, कामठी ही गावे व औद्योगिक वसाहती जोडल्या गेल्या आहेत. ‘माझी मेट्रो’वर 8 हजार 680 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मेट्रोकरिता अत्याधुनिक 38 स्थानके, दोन डेपो विकसित करण्यात येत आहेत. पहिल्या 6.5 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून मेट्रो धावायला लागली आहे.

सौर ऊर्जेवरील पहिली मेट्रो
रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. अपघातांची टांगती तलवार नागपूरकरांवर होती, मात्र ‘माझी मेट्रो’ या दोन्ही बाबींसाठी पर्याय ठरला आहे. मेट्रोसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात विजेची बचत होत आहे. प्रत्येक स्टेशनवर सौर ऊर्जा यंत्र लावण्यात आले आहे. मेट्रोसाठी वीज स्वयंपूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रदूषणात घट होणार आहे. हा देशातील पहिला प्रयोग आहे.

1 लाख युनिट वीज तयार
वाढत्या तापमानामुळे नागपूरकर त्रस्त झाले होते. त्याच वेळी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन विजेची मोठी बचत झाली आहे. मे महिन्यात 1 लाख 4 हजार 300 युनिट सौर विजेचे उत्पादन केले आहे. प्रत्येक स्टेशनवर सौर ऊर्जेचे पॅनेल लावण्यात आले आहेत. खापरी स्टेशनवर 209, न्यू एअरपोर्ट स्टेशन 346, एअरपोर्ट साऊथ 407 आणि एअरपोर्ट स्टेशन येथे 540 सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. याशिवाय मेट्रो भवनात 840 पॅनल लावण्यात आले असून एकूण 2,342 सोलर पॅनल लावण्यात आले आहेत.

महापालिकेला फायदा
मेट्रोमुळे महापालिकेला 200 कोटींचा फायदा होणार असून मेट्रोने महापालिकेच्या मोक्यावर असलेल्या जमिनी घेऊन तेथे मेट्रो मॉल उभारण्यात येत आहेत. महामेट्रोला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाला आहे. झीरो माईल स्टेशनजवळ सचिवालयाची निर्मिती, महात्मा फुले मार्केट, यशवंत स्टेडियमचा कायापालट करण्याची जबाबदारी महामेट्रोला मिळाली आहे. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.

मेट्रोकरिता 22 नोव्हेंबर 2018 रोजी चीनमधील दालियन सिटीतून मेट्रो कोच नागपुरात आणले असून संत्र्याच्या रंगात मेट्रो कोच आहे. 8 जानेवारी 2019 रोजी राज्य शासनाने मेट्रोच्या दुसऱया टप्प्यास मंजुरी दिली आहे. संपूर्ण प्रवास वरून होणार असल्यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. मेट्रोची एलिवेटेड चाचणी पूर्ण झाली आहे. शहरात काही ठिकाणी चार स्तरीय तर काही ठिकाणी तीन स्तरीय वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

इनोव्हेटिव्ह डिझाइन
‘माझी मेट्रो’चे इनोव्हेटिव्ह डिझाईन असून देशात कुठेही हे डिझाइन दिसत नाही. फोर टायर वाहतूक सिस्टीमही देशात कुठेही नाही. फोर टायर प्रणालीचे पहिले शहर नागपूर ठरले आहे. मेट्रोचे जाळे ग्रामीण भागात पसरविण्यात येणार आहे.

मेट्रोची वैशिष्टय़े
– मेट्रोचे डिझाइन आंतरराष्ट्रीय आर्किटेक्टकडून तयार.
– झीरो माईल्स स्टेशन 30 माळय़ांचे
– मेट्रो सुरू होण्यापूर्वीच 140 कोटींचे उत्पन्न
– 65 टक्के सौर ऊर्जेवर धावणार मेट्रो
– कॉमन मोबिलिटी कार्डाचा वापर
– 95 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना घेतला जॉय राइडचा आनंद
– डबलडेकर अत्याधुनिक वाहतूक
– फोर टायर वाहतूक व्यवस्थेचे नागपूर पहिले शहर
– आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो स्टेशन
– प्रत्येक स्टेशनवर आपल्या संस्कृतीचे दर्शन
– अल्ट्रा आधुनिक स्टेनलेस स्टीलचे कोचेस आणि वातानुकूलित सेवा
– मेट्रो निर्मितीपासून 20 हजार लोकांना मिळाला रोजगार
– प्रत्येक स्टेशनवर लिफ्ट आणि एक्सलरेटरचा वापर
– तिकिटाचा दर सर्वसामान्यांना परवडणारा

मेट्रोच्या लोकार्पणामुळे केवळ दळणवळणाची संकल्पनाच बदलणार नाही, तर हा 21 व्या शतकातील प्रगत नागपूरचा प्रारंभ ठरणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोमुळे आमूलाग्र बदल होणार आहे. ‘माझी मेट्रो’मुळे राज्याच्या उपराजधानीतील विकासात भर पडली आहे.

– [email protected]