आभाळमाया : चांद्रमास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक ([email protected])

या वर्षीचा जुलै महिना म्हणजे ‘चांद्रमास’ आहे असं म्हटलं तर वाचक बुचकळ्यात पडतील. कारण चांद्रमास तिथींशी निगडित असतो. जुलै हा सौरमासच, परंतु पन्नास वर्षांपूर्वी 20 जुलैला माणूस पहिल्यांदा चंद्रावर पोहोचला आणि या जुलैमध्ये त्या घटनेचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना हिंदुस्थानचं चांद्रयान चंद्राकडे झेपावणार आहे. यादृष्टीने आपल्यासाठी हा महत्त्वाचा ‘चांद्रमास’ ठरणार आहे.

पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत चंद्र हा काव्यातील सौंदर्याचा विषय होता. त्याचं शीतल चांदणं आणि वाढत, घटत जाणऱ्या कला तसंच पौर्णिमेचा तेजस्वी नजारा या साऱ्यांनी मनावर मोहिनी घातली होती. काव्यातला तो चंद्र ‘चांदोबा’ म्हणून लहान मुलांना खुणावत होता, तर प्रेमिकांसाठी तो ‘साक्षीला’ असत होता. मात्र एकदा माणसाची अंतराळ भरारी सुरू झाली आणि सूर्य-चंद्र अशा काव्यातील जोडगोळीतला चंद्र आपल्या अगदीच परसात असल्याचं निष्पन्न झालं. सूर्य पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर तर चंद्र अवघ्या तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटरवर एवढय़ा जवळ असल्यानेच सूर्याइतकं बिंब दिसणारा चंद्र सूर्याच्या चारशे पट लहान आहे आणि पृथ्वी ते चंद्र या अंतरापेक्षा पृथ्वी ते सूर्य हे अंतर चारशे पट जास्त आहे. हा वैश्विक योगायोगही खग्रास सूर्यग्रहणाचं स्पष्टीकरण द्यायला मोलाचा ठरला.

जॉन केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी एकोणीसशे साठच्या दशकारंभीच  या दशकाअखेरीस अमेरिका चंद्रावर अंतराळवीर उतरवील असं जाहीर केलं आणि 1969 मध्ये ते साहस प्रत्यक्षात अवतरलं. अपोलो-11 या यशस्वी यानातून नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स चंद्राकडे रवाना झाले. त्याचं धावतं समालोचन रेडिओवर ऐकण्याचं मागच्या पिढीतल्या लोकांना आठवत असेल. विसाव्या शतकाच्या आरंभी रेल्वे आणि मोटारींचंही आगमन नवं होतं. त्याच शतकाच्या सहाव्या दशकात माणूस थेट चंद्रावर निघाला होता. चंद्र पादाक्रांत झाला हा खगोल विज्ञानातला एक क्रांतिकारी दिवस होता. चांद्रभूमीवर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगने ‘‘हे मानवतेसाठी मोठं पाऊल आहे’’ (जायन्ट स्टेप फॉर मॅनकाइंड) असे यथार्थ उद्गार काढले.

अपोलो 10 चंद्राभोवती घिरटय़ा घालत असताना कॉलिन्स त्यातच थांबला होता. आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन चंद्रावर उतरले ते ‘ईगल’ नावाच्या ‘लॅण्डर’ किंवा ‘अवतरक’ यानातून. मग चंद्रावरची दगडमाती वगैरे घेऊन चांद्रवीर परतले. नंतरही अनेक चांद्रमोहिमा झाल्या. अपोलो-13 च्या अपयशावरही चित्रपट आला. एवढं या प्रकल्पांना महत्त्व होतं.

परंतु चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याआधीही अनेक यानं पाठवून पुरेपूर पूर्वतयारी करण्यात आली होती. चंद्रावर माणूस उतरवण्यासाठी ज्या ‘ईगल’ नावाच्या लॅण्डरची योजना केली होती त्याची रंगीत तालीम ‘स्नुपी’ नावाच्या एका यानाद्वारे घेतली गेली. दोन अंतराळयात्री ‘स्नुपी’वर स्वार होऊन प्रत्यक्ष चंद्रावतरण कसं काय जमतंय याची शहानिशा करण्यासाठी त्या छोटय़ा यानातून चांद्रकक्षेत शिरले आणि चांद्रपृष्ठापासून सुमारे 50 हजार फुटांवरून त्यांनी चंद्राचं निरीक्षण केलं. नंतर ते पुन्हा मुख्य यानाकडे परतले. तिथे आल्यावर हे वापरलेलं स्नुपी यान मूळ अपोलोपासून विलग करून अंतराळात सोडून देण्यात आलं.

गेल्या 12 जूनला प्रसिद्ध झालल्या बातमीत म्हटलंय की, ‘रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’चे संशोधक निक हॉज यांच्या मते त्यावेळी त्याग केलेल्या ‘स्नुपी’चा अंतराळी ठावठिकाणा लागला आहे. त्यांच्या मते ‘स्नुपी’चा शोध घेण्यात 98 टक्के यश आलंय आणि ‘स्पेस एक्स’सारखी कंपनी ते शोधून आणि पकडून परत पृथ्वीवर आणू शकेल.

स्पेस एक्स संस्थेचे इलॉन मस्क यांनी अंतराळ विजयाचा म्हणजे अंतराळ प्रवास सर्वसामान्यांच्या आटोक्यात आणण्याचा विडाच उचललाय. ‘स्नुपी’ सापडलं तर ते त्याचंही यथेच्छ भांडवल करतील. मात्र त्यातून चंद्रावतरणाच्या आधीच्या ‘रिहर्सल’च्या यानाचं दर्शन पृथ्वीवासीयांना घडेल.

अनेक चांद्रमोहिमांमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या असतील. या महिन्यातली ‘आभाळमाया’ चंद्रार्पण करूया. चंद्रावर अनेक मोहिमा पाठवल्या गेल्या असल्या आणि अनेक प्रकारची माहिती मिळाली असली तरी गेल्या अर्धशतकात त्याच्या विषयी न कळलेलंसुद्धा बरंच आहे. सततच्या प्रयत्नांतूनच सत्याच्या अधिक जवळ जाता येईल.

अपोलो-11 च्या यशस्वीतेने देदीप्यमान कामगिरी केली, परंतु त्यापूर्वी ‘अपोलो’ यानांनी या यशाचा मार्ग सोपा केला होता. त्यांचं महत्त्व त्यामुळेच मोठं ठरतं. अपोलो-10 मधून गेलेल्या आणि ‘स्नुपी’मधून चंद्राचं बारकाईने निरीक्षण केलं ते मार्गदर्शक होतं. हे ‘स्नुपी’ नाव चार्ल्स शुल्टझ यांच्या ‘पीनट्स’ या व्यंगमालिकेतील कुत्र्याचं नाव होतं. तेरा कोटी किलोमीटरच्या परिघातील अंतराळात त्याचा शोध घेतला गेला. ‘स्नुपी’ पृथ्वीवर आणण्यात यश आलं तर चांद्रविजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातली एक आनंददायी घटना ठरेल.