
नाथपंथीयांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही योगसाधनेची दीक्षा दिली. त्यातीलच एक अतिशय विद्वान स्त्री म्हणजे विमला देवी. नाथ संप्रदायातील प्रमुख योगिनी संत विमलादेवी या गोरक्षनाथांच्या शिष्या होत्या. नाथ संप्रदायातील बारा उपपंथापैकी ‘आई पंथाच्या’ त्या प्रवर्तक समजल्या जातात. गोरक्षनाथ भ्रमंती करीत असताना त्यांच्या मागे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करीत. गोरक्षनाथांची अवधूत गीता, गोरक्षगीता, पदे त्या लोकांना गाऊन दाखवत. प्रखर वाराग्य, सदाचार अशा आचरणासह मठाची जबाबदारी विमलादेवींनी चोखपणे सांभाळली. गोरक्षनाथांनी शिकवलेल्या योगमार्गाचे पालन करीत नाथांच्या नामोच्चाराने त्या भिक्षा मागत असत. विमलादेवींनी आपले प्राविण्य उपदेशातून सिद्ध केले. गोरक्षनाथांची शिकवण त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविले. स्त्रीउद्धाराची तळमळ असलेल्या विमलादेवींचा पंथ म्हणून ‘आईपंथा’कडे आदराने पाहिले जाते.






























































