लेख – शक्तीच्या उपासनेचा उत्सव

939

>> दिलीप देशपांडे

नवरात्रात अनेक ठिकाणी विशेष कार्य करणाऱ्या, शौर्य गाजवणाऱ्या स्त्र्ााrशक्तीचा सन्मान केला जातो. नवदुर्गा म्हणून संबोधण्यात येते. नवरात्र हा शारीरिक आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो. पण त्याच काळात एकीकडे असे काही अपप्रकार घडत असतील, घडवून आणले जात असतील, अपप्रवृत्तीचा प्रवेश होत असेल तर हे थांबायला हवे. या पवित्र उत्सवाचं पावित्र्य टिकायलाच हवे. स्त्रीशक्तीचा आदर करायला हवा. हे आपणच करायला हवे ना?

वर्षभरात गणेशोत्सव आणि दुर्गा उत्सव अर्थातच नवरात्रोत्सव असे दोन मोठे उत्सव आपण साजरे करत असतो. गणेशोत्सव आटोपला की नवरात्राचे वेध लागतात. पितृपक्षातच अनेक मंडळांची दुर्गा उत्सवाची तयारी सुरू होते. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. शक्ती म्हणजे देवी. घरोघरी घटस्थापना केली जाते. अखंड दीपप्रज्वलित ठेवला जातो.

नवरात्राचे नऊ दिवसांत युद्धात देवीने अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचाही वध केला. म्हणूनच महिषासूरमर्दिनी नाव रूढ झाले. या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेनसंस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः।।’ हाच जप आपण म्हणतो. नऊ दिवस होईल तेवढी जास्तीत जास्त या शक्ती देवीची उपासना करायची असते. देवीच्या पाठाचे वाचन करायचे असते. अनेक ठिकाणी देवीचे पाठ केले जातात.

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या रूपांतही देवीची पूजा केली जाते.

नवरात्राचे नऊ दिवस वेगवेगळय़ा फुलांच्या माळा घालण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. पहिली माळ शेवंती, सोनचाफा अशा पिवळय़ा फुलांची, दुसरी माळ मोगरा, तगर, अनंत, चमेली अशा पांढऱ्या फुलांची, तिसरी माळ गोकर्ण, निळी फुले, कृष्णकमळ, चौथी माळ अबोली, तेरडा, केशरी फुले, पाचवी माळ बेल, सहावी माळ कर्दळीची फुले, सातवी माळ झेंडूची फुले, आठवी माळ कमळ, गुलाब, जास्वंदी आणि नवव्या मांडला कुंकुमार्चन करतात.

नवरात्राच्या आरतीत देवीच्या रोजच्या रूपाचे वर्णन आहे. प्रतिपदेला घटस्थापना, द्वितीयेला चौसष्ट योगिनी पूजा, तृतीयेला शृंगार, चतुर्थीला विश्वव्यापक जननी, पंचमीला उपांगललिता, षष्ठाrच्या दिवशी गोंधळ, सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग गडावर, अष्टमीला अष्टभुजा नारायणी, नवमीला नव दिवसांचे पारायण होते आणि दशमीच्या दिवशी अंबा सीमोल्लंघनाला निघते.

नवरात्रात जोगवा मागणे ही एक देवी उपासनेचा प्रकार आहे. पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पिठाचा जोगवा मागतात. आपल्यातला अहंकार नष्ट व्हावा ही यामागची कल्पना आहे.

अनादी निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी।

मोह महिषासूर मर्दना लागुनी।।

त्रिविध तापांची कराया झाडणी।

भक्ता लागुनी पावसी निर्वाणी।।

आईचा जोगवा जोगवा मागेन।।

द्वेत सारुनी माळ मी घालीन।।

हाती बोधाचा झेंडा मी घेईन।

भेदरहित वारिसी जाईन।

नवविध भक्तीच्या करून नवरात्रा

करून पोटी मी मागेन ज्ञानपुत्रा।।

ही एकनाथ महाराजांची रचना प्रसिद्ध आहे. घरोघरी हा जोगवा म्हटला जातो.

महाराष्ट्रात-कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी हे तीन पूर्ण पीठं, तर वणीची सप्तशृंगी देवीचे अर्ध शक्तिपीठ असे साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवरात्रात इथे जाऊन दर्शन घेणे खूप भाग्याचे समजले जाते. नाशिक, चांदवड, मुंबई, वज्रेश्वरी, चिखली, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी देवीच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. दुसरीकडे उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप बघता अतिशय उत्साहाचा, दैवीशक्ती उपासनेचा हा नवरात्री उत्सव, पण गेल्या काही वर्षांत यात खूप बदल होत आहेत.

दररोज साडय़ांचे रंग कोणते असावे, याच्या जाहिराती वर्तमानपत्रांत वाचायला मिळतात. त्याचेही मार्केटिंग सुरू होते. दुकानात त्या त्या रंगांची मागणी वाढू लागते.

एक वेगळे वळण सार्वजिक उत्सवाला येत आहे. तरुण मुलं-मुली नऊ-दहा दिवस गरबा, दांडिया खेळतात. डी.जे. गाणी, रोषणाई, दैवी उपासनेशी त्यांना घेणदेणं नसतं.

नवरात्रात अनेक ठिकाणी विशेष कार्य करणाऱ्या, शौर्य गाजवणाऱ्या स्त्रीशक्तीचा सन्मान केला जातो. नवदुर्गा म्हणून संबोधण्यात येते. नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो. पण त्याच काळात एकीकडे असे काही अपप्रकार घडत असतील, घडवून आणले जात असतील, अपप्रवृत्तीचा प्रवेश होत असेल तर हे थांबायला हवे. या पवित्र उत्सवाचं पावित्र्य टिकायलाच हवे. स्त्रीशक्तीचा आदर करायला हवा. हे आपणच करायला हवे ना?

आपली प्रतिक्रिया द्या