लेख – प्राप्तकाल हा…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप जोशी ([email protected])

नवी वर्ष सुरू झाले. यंदाचे हे ‘ग्रेगरियन कॅलेंडर’नुसार गणना होणारे वर्ष, ‘लीप इयर’ आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्याचे दिवस 29 असतील. दर चार वर्षांनी असे वर्ष येते ते कालगणनेतील समोल साधण्यासाठी. इंग्रजी कॅलेंडर सौर पद्धतीवर तर आपली कालगणना चांद्रमास पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे आपल्याकडे तीन वर्षांनी एकदा ‘अधिक मास’ पाळून गणिती सातत्य राखले जाते.

कालगणनेचे प्रकार आणि नाव जगभर वेगवेगळी असली तरी दिवसामागून दिवस उलटत ‘काळ चालला पुढे’ याचा अनुभव सर्वांना सारखाच येतो. गतकाळातील काही चांगल्या तर काही दुःखद स्मृती मनावर कोरल्या जातात. एकच काळ कोणाला उत्कर्षाचा तर कोणाला निराशेचा वाटतो. हे व्यक्तिसापेक्ष असतं. परंतु दुष्काळ, लढाया किंवा भूकंप, रोगराई यांचे वाईट परिणाम सर्व समूहाचा काळ कठीण करतात. सणवार आणि उत्सवी दिवस समूहांना आनंदाने न्हाऊ घालतात. तेव्हा ‘काळ तर मोठा कठीण आला आहे’ असं कोणाला वाटतं तर ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ असं कविवर्य केशवसुतांसारखे विचारवंत संदेश देत असतात.

आताचा ‘प्राप्तकाल’ कसा आहे? गेल्या काही दशकात जग इंटरनेटच्या माध्यमातून विलक्षण जवळ आलं आहे. एकेकाळी पत्रं पाठवल्यावर त्याचं उत्तर यायला महिनाभर लागायचा. आता ते काम व्हिडीओ कॉल क्षणात करतो आणि पलीकडची दूरस्थ व्यक्ती समोर बसल्यासारखी गप्पा करू लागते. दैनंदिन व्यवहारातही या संपर्कक्रांतीने बऱ्याच सोयी केल्या आहेत. नेटबँकिंग, नेट खरेदी, नेटद्वारा रेल्वे, विमानाचं बुकिंग आणि बरंच काही. विविध ‘ऍप’ डाऊनलोड केली की हव्या त्या सेवा हातात येतात. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ज्या गोष्टी स्वप्नातही पाहिल्या नसतील त्या सत्यात उतरताना दिसतात.

ही तशी अलीकडची गोष्ट. पण 1850 च्या सुमारास कोणाला पोस्ट खातं आणि रेल्वे याची कल्पना सांगितली असती तर तीही स्वप्नवतच वाटली असती, नव्हे वाटतच होती. अगदी इंग्लंडमध्ये  पहिली रेल्वे गाडी धावली तेव्हाही हा रूळांवरचा ‘चमत्कार’ बघायला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. फोन आल्यावर तर ‘पलीकडून आपल्या माणसाचा आवाज काढून कोणी भलतंच बोलत नाही ना’ अशा धास्तीतून ‘नको ते काळे यंत्र’ म्हणणारेही होते.

परंतु काळाची गती प्रवाहासारखी असते. तो पुढेच जात असतो. आणि संस्कृतीमध्ये वेगवेगळय़ा गोष्टींची भर पडून ती व्यापक होत जाते. त्यातल्या काही गोष्टी जीवन समृद्ध करणाऱ्या तर काही त्रासदायक ठरणाऱ्याही असतात. तरीही केशवसुतांची ‘जुने जाऊद्या मरणा लागुनि’ म्हटलं तेही सापेक्ष म्हणजे कालबाहय़ रूढीवादावरचं भाष्य होतं. ‘जुने ते सगळेच सोने’ असं नसतं आणि जुन्यातील सगळंच वाईट असंही नसतं. ज्या काळात समाज समंजसपणे ‘सम्यक’ किंवा आजच्या भाषेत ‘बॅलन्स्ड’ विचार करत असतो  ते त्या वेळचा सुवर्णयुग असतं. जगाच्या इतिहासात असे कालखंड आले आणि गेले.

‘सर्वेः सुखिनः सन्तु’ म्हणजे सर्वजण सुखी असोत असा माणुसकीने भारलेला विचार प्राचीन काळीच व्यक्त झाला असला तरीही सर्वांना ‘सुखी’ करणारा काळ इतिहासाच्या पानात अपवादाने आढळेल. वास्तविक आता जगाने ‘उद्या’चा म्हणजे भविष्यकाळाचा नव्याने रचनात्मक दृष्टीने विचार करावा असा हा काळ आहे. उत्तमाचा ध्यास घेऊन सारी साधनसामुग्री आणि यांत्रिक प्रगती उपयोगात आणली तर उद्याचा काळ सुखाचा असेल. बदलत्या काळाची नैसर्गिक आव्हानंही मोठी आहेत. मात्र आधुनिक, परंतु सर्व जीवसृष्टीचा विचार करून जगभरच्या सत्ताधीशांनी धोरणं आखली आणि साडेसात अब्ज मानवी समूहाचं रचनात्मक, सकारात्मक विचारांनी प्रबोधन करणारे वारे वाहू लागले तर केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर’ आहे. त्यावर ‘सुंदर लेणी’ खोदण्याचं काम सर्वांनाच करायचं आहे. त्यातला महत्त्वाचा भाग आहे तो ‘सत्’चा. ‘सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर’ असं म्हटलं जातं. परंतु कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात त्याप्रमाणे ‘मानसा मानसा कधी होशील मानूस?’ हाच खरा प्रश्न आहे. आपल्या ज्ञात विश्वात आपणच, म्हणजे मानवी समाज सर्वश्रेष्ठ आहे असं मानलं तर ‘सर्वश्रेष्ठ’ कार्य करण्याचीही जबाबदारी त्याच्यावरच येते. बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचं तर ‘तुला दिले देवाने दोन हात, दहा बोटे’ हे लक्षात ठेवलं की कालप्रस्तरावर ‘सुंदर लेणी’ निर्माण होतील!