संकल्प करा विचारपूर्वक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

नवीन वर्षात आपण पदार्पण केले आहे. कालनिर्णय, महालक्ष्मी, सनातन दिनदर्शिका आणि अशा अनेक दिनदर्शिका बाजारात आलेल्या आहेत. तसेच नव्या वर्षाच्या रोजनिशी अर्थात डायऱ्या बाजारात आलेल्या आहेत. गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी गीता प्रेस गोरखपूरची रोजनिशी (डायरी) घेत असतो. आताही ती आणली आहे. काही वर्षांपूर्वी खूप प्रकारची शुभेच्छा कार्डही विक्रीला येत होती. आताही येतात, परंतु त्याचे एवढे आकर्षण राहिले नाही. आता व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वगैरेमुळे नववर्ष शुभेच्छा कार्ड पाठवण्याची पद्धत जवळपास बंदच झाली आहे. त्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छा दिल्या जातात.

नवीन वर्षाचे निरनिराळे, वैयक्तिक आणि सामाजिक संकल्प केले जात असतात.

खरं तर नवीन वर्षाचे संकल्प करण्यापूर्वी गतवर्षात आपण काय ठरवले होते, काय संकल्प केले होते, ते कितपत पूर्ण झाले याचा विचार करणे हे तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या वळणावर आपण काय करायला हवे ते ठरविता येते.

संकल्प म्हणजे काय, तर आपणच आपल्याला दिलेले जे वचन असते आणि आपण जर स्वतः दिलेले वचन जर पाळू शकत नसलो, तर दुसऱ्याला दिलेले वचन कसे पाळणार? तेव्हा आपण म्हणतो, ‘ना वचनाला जागला तर…’ त्यात याच गोष्टीचा अंतर्भाव असतो आणि त्यातून एखादी गोष्ट ठरवून कोणाला काही देणे, यात आपण आपला सकारात्मक बदल किंवा सकारात्मक विचार पुढे नेऊ शकतो.

नवीन वर्षात आपण अनेकविध संकल्प करू शकतो. त्यात आपण काही वैयक्तिक स्वरूपात गोष्टी करायचे ठरवतो, तर काही सामाजिक देणे. ‘देणे समाजाचे’ म्हणून ते करायचे असतात.

वैयक्तिकमध्ये वाचनाचा संकल्प करणे, लिखाणाचा संकल्प करणे, आपल्या आरोग्याविषयी काही काळजी घेणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, व्यसनांपासून दूर राहणे.

सामाजिक गोष्टीमध्ये पर्यावरण, प्रदूषण, वृक्ष लागवड, स्वयंसेवी संस्थांना मदत करणे. आपल्या घरात आपण टाकून दिलेली, परंतु वापरण्याजोगी कपडे असल्यास ते त्या संस्थांना देणे, गरजूंना मदत करणे, एखाद्या वाचनालयाला पुस्तकांची भेट देणे.

सामाजिक कार्यात किंवा आपण सर्वांशी निगडित एखादा संकल्प करतो, त्या वेळेला आपण केलेला संकल्प हा इतरांसाठी महत्त्वाचा आहे. जसा जो तो आपल्यासाठी आहे आणि आपणच जर त्याचे उल्लंघन केलं तर त्यापासून आपल्याला होणाऱ्या नुकसानाबरोबरच इतर अनेकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही जाणीव मनामध्ये प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे आणि अशी जाणीव जर आपल्या मनात निर्माण झाली तरच आपण केलेले संकल्प पूर्णत्वास नेऊ शकतो. जसे आपल्याकडून जर प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होत असेल तर ती आपल्याला जर त्रासदायक आहे, पण त्याचबरोबर त्यामुळे असंख्य लोकांना त्यापासून उपद्रव होऊ शकतो. त्यामुळेच ही जाणीव महत्त्वाची आहे.

आपली प्रतिष्ठासुद्धा संकल्प करताना महत्त्वाची असते. म्हणजे जसे संकल्प करताना आपले समाजातले स्थान, मित्रमंडळीतले स्थान, नातेवाईकांमध्ये स्थान, अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि आपण जे संकल्प जाहीर करतो ते जर पूर्ण केले नाही तर त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धोका पोहचतो. म्हणजेच संकल्प करताना प्रतिष्ठासुद्धा प्रेरणाच असते. त्यासाठी हा विचार होणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण जे काही संकल्प करतो ते जाहीर करणे आवश्यक आहे आणि फायद्याचेसुद्धा आहे.

भ्रष्टाचारमुक्ती अभियानास सहकार्य करणे थोडक्यात भ्रष्ट मार्गाने काम करून न घेणे, रस्त्यावर वाहन उभे करून अडथळा निर्माण न करणे, कार्यक्रमात डी.जे.सारखे वाद्य वाजवून ध्वनिप्रदूषण करणे टाळायला हवे. वृक्षतोड करणे टाळावे, त्याऐवजी वृक्षारोपण करावे. एक तरी झाड लावण्याचा आणि जगवण्याचा संकल्प करावा. पाण्याचा योग्य वापर करणे आणि अनावश्यक वापर करण्याचे टाळावे. स्त्री भ्रूणहत्या, स्त्री अत्याचारविरोधात अभियानास मदत करणे, प्लॅस्टिक पिशव्यांचा किंवा हानिकारक प्लॅस्टिकचा वापर न करणे, सार्वजनिक जागी कचरा करणे, गुटखा पुडय़ा टाकणे आणि अस्वच्छता करणे टाळायला हवे. कुठलेही व्यसन न करणे. याप्रकारे हे जे सामाजिक जाणीव मनात ठेवून करायचे संकल्पन ते प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यामुळे आपल्यालाही आणि संपूर्ण समाजालाही त्यापासून काही धोका पोहोचू शकत नाही व आपले आरोग्य धोक्यात येत नाही.

चांगले कार्य करणाऱ्या संस्थेला काही आर्थिक मदत करता आल्यास ती करावी. अनेक सेवाभावी संस्था आहेत, निराधार मुलांना सांभाळून त्यांचा राहण्याचा, शिक्षणाचा खर्च करून बऱयाच संस्था समाजात चांगले कार्य करीत आहेत. यातील अनेक मुली आज उच्चशिक्षण, मोठमोठय़ा नोकरी करत आहेत. त्यांना आर्थिक मदत करणे किंवा एक दिवसाचे अन्नदान, त्यांना ड्रेस, पुस्तके, वगैरे यांसाठी मदत आपण करू शकतो, तर आपल्यालाही चांगले कार्य केल्याचे आत्मिक समाधान मिळते.

या सर्व गोष्टीत काही ना काही चांगले करणे म्हणजे संकल्पच आहे. कुठलीही चांगली गोष्ट ठरवून ती पूर्णत्वास नेणे हाच खूप मोठा संकल्प आहे आणि याचाच विचार आपण सगळय़ांनी करून जे जे चांगले आहे, समाजाच्या हिताचे आहे, आपल्या स्वतःच्या हिताचे आहे ते करण्याचे ठरवावे हाच सर्वांसाठी 2023 सालाचा संकल्प समजावा.