लेख – नवे वर्ष, नवे आयाम, नवे परिमाण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजय पांढरीपांडे

2020 हे वर्ष माइल स्टोन म्हणून वापरले गेले होते. डॉ. कलाम  यांच्यासारख्यानी ‘मिशन 2020’ अंतर्गत नवे संकल्प आखले होते, पण दुर्दैवाने कोरोना विषाणूच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे सारे तंत्र बिघडले. आता आपण अशा आपदासाठी तयार राहायला पाहिजे. यापूर्वी देशादेशातील युद्ध फक्त सीमेवर लढले जात होते. ठरावीक शस्त्रांनीच लढले जात होते. आता यापुढे ही युद्धे घरबसल्या तंत्रज्ञानाने लढली जातील. त्यांचे दृश्य परिणाम दिसणारदेखील नाहीत. त्यासाठीचे सायरनदेखील वाजणार नाहीत. पूर्वसूचना ही येणाऱ्या संकटासाठी नेहमी सज्ज राहा हा नवा संदेश गेल्या वर्षाच्या अनुभवाने दिला आहे.

एकविसाव्या शतकाचे एकविसावे वर्ष संपते आहे. 2019 साली सुरू झालेले करोना विषाणूचे जागतिक संकट संपेलेले नाही. एक संपले की दुसरेच अशी संकटाची मालिका सुरूच आहे. हा फक्त माणसाच्या वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न राहिलेला नाही. उद्योग, शिक्षण, पर्यावरण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत आजारपण आले आहे. इथे तक्रारीला अर्थ नाही.एकमेकांना दोष देण्यातही अर्थ नाही. प्रश्न आहे पुढे जाण्याचा.आहे त्या परिस्थतीत मार्ग शोधण्याचा. जग थांबलेले नाही.ते थांबणारही नाही. माणसाने बुद्धीच्या, आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर यापूर्वीदेखील अनेक संकटांवर मात केली आहे. पूर्वीच्या तुलनेत नवनवे तंत्रज्ञान आपल्या मदतीला आहे  ही केवढी जमेची बाजू!  कल्पना करा, इंटरनेट कम्युनिकेशन, वाय-फाय, स्मार्ट फोन नसते तर काय झाले असते? ऑनलाइन प्रक्रियेत पूर्णत्व नसेल. कमतरता असेल. पण तरीही या गेल्या दोन वर्षांत बरेचसे उद्योग, शिक्षण यंत्रणा, दळणवळण,संवाद हे सारे या यंत्रणेच्या बळावरच सुरू आहे. आरोग्य क्षेत्रातही ऍपच्या माध्यमातून या काळात युद्धपातळीवर चांगले काम झाले. कसेतरी का होईना पण शिक्षण चालू राहिले. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता, इन्फो, बायो, नॅनो तंत्रज्ञानाचे संलग्नीकरण,संगणकाची वाढती क्षमता असे नवनवे तंत्रज्ञान पुढे येते आहे. ज्यामुळे जगाचा चेहरामोहराच येत्या दोन- तीन दशकांत बदलणार आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटेदेखील असतात. विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत अंतिम शाश्वत असे काही नसते. कालची थिअरी आज चुकीची ठरते. प्रत्येक नवा दिवस वेगळा असतो. हे सातत्याने होणारे बदल आपण स्वीकारले पाहिजेत. आत्मसात केले पाहिजेत.

शिक्षणाच्या संकल्पना आता बदलाव्या लागतील. दहा ते पाच शाळा-कॉलेज ही परंपरा बदलणार आहे. तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यायचे तर वेळेचे बंधन झुगारून सकाळी-रात्रीदेखील वर्ग घ्यावे लागतील. मूल्यमापनाच्या नव्या पद्धती स्वीकाराव्या लागतील. तीन तासांचा, शंभर गुणांचा पेपर, एका तासाचे पन्नास गुणांचे प्रॅक्टिकल,अमुक गुण पासिंग, ग्रेस मार्काचे अनुदान या साचेबद्ध चौकटीतून बाहेर यावे लागेल. मुख्य म्हणजे शिकविण्यापेक्षा शिकणे शिकवावे लागेल. स्वयंअध्ययनासाठी विद्यार्थ्याची मनोवृत्ती घडवावी लागेल. त्यासाठी शिक्षकाची भूमिकाच बदलावी लागेल. पालकांनीदेखील आपली विचारसरणी बदलायला हवी. उद्योगाच्या, करीअरच्या भविष्याच्या गरजा आता पार बदलल्या आहेत. तोच तो जुना अभ्यासक्रम, तीच ती शिकविण्याची पद्धत कामाची नाही. आजचे अर्धेअधिक अभ्यासक्रम हे कालबाह्य, कुचकामी ठरणार आहेत. येत्या दशकात लाइफ लाँग लर्निंग हाच शिक्षणाचा, प्रगतीचा मूलमंत्र ठरणार आहे.

नीती-अनीतीच्या संकल्पना,जीवन मूल्ये, विवाह संस्था, कुटुंब पद्धती, सामाजिक, राजकीय व्यवस्था यात सातत्याने होणारे बदल आपल्याला स्वीकारावे लागतील. सध्या एकमेकांना दोष देणे, दुसऱ्याच्या चुका शोधणे, परस्परांचे पाय खेचणे, जातीधर्माच्या आधारावर द्वेष पसरविणे यातच आपली शक्ती खर्च होतेय. विशेषतः ज्यांच्या हातात अधिकार आहेत, सत्ता आहे ती मंडळी जास्तच भरकटलेली दिसतात. अनिर्बंध, असामाजिक, अविचारी वर्तन खपवून घेतले जाणार नाही असे दंडक निर्माण करावे लागतील.

हा बदल एकाएकी होणार नाही, पण तो मंदगतीनेही होता कामा नये. जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे तर रांगून चालणार नाही. अक्षरशः धावावे लागेल. एकटय़ाने नव्हे, सर्वांनी मिळून. हातात हात घालून. महासत्ता वगैरे होण्यापेक्षा आत्मसत्ता जास्त महत्त्वाची. स्वतःचे उन्ययन,स्वतःवर नियंत्रण स्वतःत बदल जास्त महत्त्वाचे. जगाची चिंता नको. जगातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने बदलला की, जग आपोआप बदलेल.

प्रत्येक क्षेत्रात नीती नियम आहेत. ते इतरांनी पाळावे,आम्ही पाळणार नाही अशी मग्रुरी चालणार नाही. ती शासनानेच नव्हे तर समाजानेदेखील खपवून घेता कामा नये. या बेशिस्तीतूनच बेदिली निर्माण होते. अतिरेकी,समाजकंटक निर्माण होतात. शिस्त, शांतता ही सर्वांनी समान पद्धतीने समान पातळीवर अंगीकारायला हवी.

गेल्या दोन वर्षांच्या परिणाम स्वरूप अन् येत्या दशकातील तांत्रिक बदलामुळे आपल्याला मानसिक आरोग्याकडे, शारीरिक आरोग्यापेक्षाही जास्त लक्ष द्यावे लागेल. डॉक्टराचे व्यापारिक सल्ले बाजूला ठेवले तर आपले शारीरिक आजार हे खरे मानसिक आजारच असतात. शिक्षणव्यवस्थेतील मरगळ, परिणामस्वरूप भविष्यातील करीअरविषयीची चिंता, सारखे घरात कोंडून राहिल्यामुळे आलेले नैराश्य, ज्याचे पोटपाणीच घराबाहेर निघण्यावर अवलंबून आहे अशा कामगार,कलाकार ,अत्यावश्यक सेवार्थी यांची झालेली होरपळ, याचा एकत्रित परिणाम आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यावर होणार आहे. याचे उत्तर डॉक्टरांजवळ नसणार. ते तुझे आहे तुजपाशी या न्यायाने आपल्या जवळच आहे. कौटुंबिक नात्याला नवे आयाम,परिमाण देणे,सोशल डिस्टन्सिंग सांभाळून एकमेकाशी सुसंवाद साधणे,चर्चेतून समस्या जाणून त्यावर मिळून उपाय शोधणे, परस्परांना मदत करणे, एकमेकाची विचारपूस करणे हे सगळे आपल्या संस्कृतीचाच अविभाज्य भाग असलेले संस्कार नव्या रंगरूपात जपावे लागतील. अध्यात्म हे केवळ धर्माशी संबंधित नाही. मनाचे विचार, विकार धर्मानुसार बदलत नाहीत. पण योगा, प्राणायाम,आसने,अध्यात्म ग्रंथाचे अन् इतरही आवडीचे वाचन  याद्वारे आपण आपले मानसिक आरोग्य सांभाळू शकतो .त्यासाठी इतरांनाही मदत करू शकतो. इथे ज्येष्ठांची, शिक्षक/प्राध्यापकाची भूमिका महत्त्वाची ठरते. मुले मोठय़ाचे नीट शब्दांत सांगितले तर ऐकतात. शिक्षकांवर विश्वास ठेवतात. या विश्वासात श्रद्धादेखील असते. या बाबतीतले नीतीनियम कुठल्याही पुस्तकात लिहिले नसतात. मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्याच्या आधारे आपणच आपल्या घरी, कुटुंबात प्रयोग करू शकतो. खचलेल्या मित्रांना, सहकाऱ्यांना मदत करू शकतो. प्रत्येकाची समस्या वेगवेगळी असू शकते. त्यामुळे एक प्रयोग दुसऱ्यावर यशस्वी ठरेलच असे नाही. चुका करत करतच आपण शिकू शकतो. किंबहुना धडपडत, खरचटत, झगडत यशाचा टप्पा गाठण्यात जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. आपण युरेका, युरेका असे आनंदाने ओरडू शकतो!

2020 हे वर्ष माइल स्टोन म्हणून वापरले गेले होते. डॉ. कलाम  यांच्यासारख्यानी ‘मिशन 2020’ अंतर्गत नव्हे संकल्प आखले होते, पण दुर्दैवानं कोरोना विषाणूच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे सारे ताळतंत्र बिघडले. आता आपण अशा आपदासाठी तयार राहायला पाहिजे. यापूर्वी देशादेशातील युद्ध फक्त सीमेवर लढले जात होते. ठरावीक शस्त्रांनीच लढले जात होते. आता यापुढे ही युद्ध घरबसल्या तंत्रज्ञानाने लढली जातील. त्यांचे दृश्य परिणाम दिसणारदेखील नाहीत. त्यासाठीचे सायरनदेखील वाजणार नाहीत. पूर्वसूचना ही येणाऱ्या संकटासाठी नेहमी सज्ज राहा हा नवा संदेश गेल्या वर्षाच्या अनुभवाने आपल्याला दिला आहे. या एकूणच परिस्थितीकडे संयमाने, शांतचित्ताने, सकारात्मक दृष्टीने बघितले तर यातूनही मार्ग निघू शकतील. नव्हे निघतीलच. आपल्याला जरा हिमतीने घ्यावे लागेल एवढेच. त्यामुळे काळजीचे कारण नाही. आपण नव्या वर्षाचे आधीच्याच जोमाने स्वागत करायला हरकत नाही.