
>> सुनील कुवरे
अभूतपूर्व चक्रीवादळातून सावरण्यासाठी व पुन्हा उभे राहण्यासाठी कोकणवासीयांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. वादळे आणि पावसाचा तडाखा या गोष्टी कोकणवासीयांसाठी नवीन नाहीत. दहा-बारा वर्षांपूर्वी आलेल्या ‘फयान’ वादळानेही कोकणात मोठे नुकसान झाले होते. त्यातूनही कोकणी माणूस पुन्हा ताठ मानेने उभा राहिला. आताही ‘निसर्ग’ वादळाच्या तडाख्यात कोकणवासीयांनी पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे.
निसर्ग संपन्न आणि विविधतेने नटलेल्या कोकणाला ‘निसर्ग’ चक्री वादळाने जबरदस्त तडाखा दिला. कोकण अनन्वित घाव सोसत आला आहे. वादळे आणि पावसाचा तडाखा या गोष्टी कोकणवासीयांसाठी नवीन नाहीत. कोकणी माणूस आजवर अनेक वादळे, पाऊस, पुरांना सामोरा गेला आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी आलेल्या ‘फयान’ वादळानेही कोकणात मोठे नुकसान झाले होते. त्यातूनही कोकणी माणूस पुन्हा ताठ मानेने उभा राहिला, हा इतिहास आहे. मात्र 3 जून रोजी ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने रायगड, रत्नागिरी या कोकणातील दोन जिल्ह्यांना जबरदस्त तडाखा दिला. ‘निसर्ग’चा तडाखा मुंबई शहराला बसणार अशी अटकळ बांधली गेली होती. पण सुदैवाने खरी ठरली नाही.
या वादळाची व्याप्ती एवढी भयानक असेल हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. परंतु ‘निसर्ग’ चक्रीवादळ 3 जूनला धडकणार असं हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेतली. प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे या वादळात मोठी जीवितहानी झाली नाही. तरी प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, पेण, दिवेआगर, माणगाव या सात तालुक्यांसह रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले. हजारो घरे जमीनदोस्त झाली. घराचे पत्रे कापसासारखे वादळात उडून गेले. विजेचे खांब जमिनीतून उखडून खाली कोसळले. तर पोटच्या मुलाप्रमाणे वर्षानुवर्षे जपलेली आंबा, फणस, पोफळी, नारळाची झाडे भुईसपाट झाली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही झाडे वाढवायला आयुष्य घातलं त्या या कोकणतल्या माणसाला वीस वर्षे मागे हे वादळ घेऊन गेले. अंदाजे दोन हजार गावे या चक्रीवादळाने बाधित झाली. पंधरा हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, अशा काही तालुक्यातील गावांना या चक्रीवादळाचा तडाखा जास्त बसला. तब्बल सव्वाशे वर्षांनी चक्रीवादळाने पुन्हा एकदा कोकणवर जबरदस्त आघात केला. यातून या जिल्ह्यांना सावरायला नक्कीच वेळ लागेल. कारण या संकटाचा सामना करणे तेवढे सोपे नाही. वादळाची विध्वंसक शक्ती केवढी मोठी होती ते वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांच्या बातम्यांतून दिसून येत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वादळग्रस्त भागांचा दौरा केला. शरद पवार यांना अशा परिस्थितीमधून कशी वाटचाल करायची याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला उपयोग होईल यात शंका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडसाठी 100 कोटी, रत्नागिरीसाठी 75 कोटी, सिंधुदुर्गसाठी 25 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली असली तरी आर्थिक नुकसान त्याहून मोठे आहे. पंचनामे सुरू झाल्यानंतर सरकारी मदतीचा ओघ सुरू होईल. पण त्यापूर्वी प्रत्येक कुटुंबास काही आर्थिक मदत दिली तर काही प्रमाणात जनतेला दिलासा मिळेल.
खरे तर संकटात धावून जाणे, मदत करणे हा मानवता धर्म आहे. दोन वर्षांपूर्वी केरळला महापूर आला होता. तेव्हा महाराष्ट्र सरकारने वीस कोटी रुपयांची मदत दिली होती. आज महाराष्ट्रावर संकट आले असताना अजूनही कोणी पुढे आले नाही. सामाजिक बांधिलकी जाणिवली नाही. याचे आश्चर्य वाटते. आपत्तीच्या वेळी कोणत्याही सरकारला त्यांच्या मर्यादित उत्पन्नातून सर्वांना गरज पुरविणे शक्य नसते. पण कोकणवासीयांनी कधी सरकारपुढे हात पसरले नाहीत. कारण कोकणातील माणसं फार कष्टाळू असतात. जे मिळेल त्यात समाधान मानणारी वृत्ती कोकणवासीयांकडे आहे. त्यांचे संसार उभारण्याचे फार मोठे आव्हान सरकारपुढे आहे. नुकतेच प. बंगाल आणि ओरिसा राज्यात वादळ आले. तेव्हा केद्र सरकारने प. बंगालला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र महाराष्ट्राला केद्र सरकारने थोडीही मदत जाहीर करू नये? तसेच केद्राचे पथकसुद्धा कोकणात वादळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले नाही. गेल्या वर्षी प. महाराष्ट्रात महापूर आला होता. त्यावेळी सुद्धा केद्राने दुजाभाव केला. आता राज्य सरकार केद्र सरकारकडे मदत मागणार आहे. परंतु राज्य सरकारने मदत मागण्यापूर्वी केद्राने स्वत:हून किमान काही कोटींची मदत जाहीर करायला हवी होती. केद्राकडून मदत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. महाराष्ट्रासाठी केद्राकडे संवेदनशीलता नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
या अभूतपूर्व चक्रीवादळातून सावरण्यासाठी व पुन्हा उभे राहण्यासाठी कोकणवासीयांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे मदतीचे निकष बदलण्याची गरज होती. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तिन्ही जिल्ह्यांतील वादळग्रस्तांना अधिक मदत मिळणे गरजेचे होते. यासाठी महाआघाडी सरकारने नुकसानभरपाईचे निकष बदलले. त्यामुळे आता तिन्ही जिल्ह्यांतील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्यांना घसघशीत मदत मिळेल. तरी मदत निकषात आणखी बदल आवश्यक आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकण भूमीला पुन्हा उभे करण्याची गरज आहे. तेव्हा या समस्येकडे राजकीय हेतूने न पाहता विशाल दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. भूकंप, वादळे, इतर नैर्सिगक आपत्तींचा धोका कमी करणे आणि आत्पकालीन व्यवस्थेची क्षमता वाढविणे ही उद्दिष्टे ठेवून काम करावे लागेल. कोकणवासीयांनाही पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभे राहावे लागेल.






























































