आगळेवेगळे ‘श्री नृसिंह मंदिर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनुराग वैद्य

धौम्य ऋषींचे वास्तव्य या भागात होते म्हणून या गावाला धोम हे नाव पडले असे आजूबाजूच्या गावामध्ये प्रचलित आहे. याच धोम गावामध्ये कृष्णा नदीकाठावर श्री सिद्धेश्वर महादेवाचे सुंदर शिवालय आहे. मुळातच बंदिस्त आवार लाभलेले हे शिवालय खरे तसे पाहायला गेले तर शिवपंचायतन आहे. निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेल्या या शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत.

सातारा जिह्यातील प्राचीन नगरी ‘वाई’ येथे मध्ययुगातली विविध मंदिरे उभारली गेली आहेत. मेणवली येथे  ‘नाना फडणवीस’ यांनी उभारलेली मंदिरे आज जगाच्या नकाशावर चमकायला लागली आहेत. बऱयाचशा हिंदी चित्रपटांचे शूटिंग म्हणून मेणवलीच्या मंदिरांना पहिली पसंती दिली जाते, परंतु वाईपासून अवघ्या 10 कि.मी. अंतरावर धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरात धोम या गावी साधारणपणे 17 व्या शतकात उभारले गेलेले आगळेवेगळे ‘श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर’ मेणवलीच्या अगदी जवळ असूनही आजही फारसे प्रकाशझोतामध्ये नाही.

वाई आणि आजूबाजूच्या या प्रदेशाला महाभारतामध्ये फार महत्त्व होते असे सांगतात. विराट राजाची विराट नगरी म्हणून वाई आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये अनेक वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. वाळकी आणि कृष्णा या दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमावर ‘धोम’ नावाचे टुमदार निसर्गरम्य गाव हे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले आहे. एका बाजूला पांडवगड, दुसऱया बाजूला केंजळगड तर धरणाच्या जवळ, परंतु पलीकडच्या बाजूला अगदी हाकेच्या अंतरावर आपल्या पोटामध्ये कावेची विहीर हे वैशिष्टय़पूर्ण पाषाणशिल्प घेऊन उभा ठाकलेला कमळगड या सर्व किल्ल्यांच्या कुशीमध्ये हे धोम गाव लपलेले आहे. मुळातच धोम आणि परिसरावर निसर्गाची एवढी कृपा आहे की, साऱया बाजूने डोंगररांगा आणि हिरवागार परिसर आणि या हिरव्यागार परिसरामध्ये वसलेले टुमदार धोम गाव आणि गावाच्या बाजूने वाहणारी कृष्णा नदी, त्यावर बांधलेले धरण हे सारे काही पाहूनच आपले मन भरते.

धौम्य ऋषींचे वास्तव्य या भागात होते म्हणून या गावाला धोम हे नाव पडले असे आजूबाजूच्या गावामध्ये प्रचलित आहे. याच धोम गावामध्ये कृष्णा नदीकाठावर श्री सिद्धेश्वर महादेवाचे सुंदर शिवालय आहे. मुळातच बंदिस्त आवार लाभलेले हे शिवालय खरे तसे पाहायला गेले तर शिवपंचायतन आहे. निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेल्या या शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत.
एकसंध पाषाणामध्ये उभारलेले हे मंदिर पाहत असतानाच आपली नजर पडते ती समोर असलेल्या नंदीवर. पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव नंदी अक्षरशः अवाक करतो. इतका सुंदर आणि देखणा नंदी पाहायला मिळणे याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसतच नाही इतका तो नंदी देखणा आहे. या नंदीची रचना फार कल्पना करून उभारलेली आहे असे आपल्याला दिसते. हा नंदी शिवपंचायतन आणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध एक कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी सुमारे 2.5 मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्या कूर्माच्या (कासवाच्या) पाठीवर नंदी उभारला असून ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर एक सुंदर नंदी मंडप उभारलेला आपल्याला बघायला मिळतो. या नंदी मंडपाचे अजून वैशिष्टय़ म्हणजे, जेव्हा या पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा आपल्या पाठीवर नंदी घेऊन कासव पाण्यावर तरंगत आहे की काय, असा भास आपल्याला होतो. इतकी सुबकरीत्या ही कल्पना येथे कारागीराने मांडलेली आहे असे आपल्या लक्षात येते.

हे शिल्प बघत आपण येऊन उभे राहतो ते एका उंच अष्टकोनी जोत्यासमोर. या जोत्यावर श्री नरहर – नृसिंह मंदिर उभारलेले आहे. मंदिरात जायला पायऱया खोदलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मंदिर अत्यंत सुबक बांधलेले आहे. मंदिराच्या आत गेल्यावर आपल्याला पूर्व आणि पश्चिम अशा विरुद्ध दिशांना नरसिंहाच्या दोन स्थापन केलेल्या सुंदर आणि रेखीव मूर्ती बघायला मिळतात. त्यापैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती मूर्ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी मूर्ती असून पश्चिमेकडे असलेली मूर्ती ही नरसिंह मूर्ती असून त्या मूर्तीच्या मांडीवर साक्षात श्री लक्ष्मी बसलेली आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे, नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरच्या उजव्या हातामध्ये कमळ असून वरच्या डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आपल्याला दिसतो. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरच्या आणि खालच्या जबडय़ातील आठ-आठ दात तसेच दातांमधून बाहेर आलेली जीभ यामुळे संपूर्ण मूर्ती आणि तिचे भाव अक्षरशः जिवंत वाटतात.

या नृसिंह मंदिरामध्ये आपल्याला प्रल्हादाचीदेखील मूर्ती आढळून येते. नृसिंह जयंतीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात येथे केला जातो. वैशाख शुद्ध दशमीला मोठय़ा थाटात येथे उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचा रथदेखील आपल्याला मंदिराच्या इथे पाहायला मिळतो. पंचक्रोशीमध्ये हे राऊळ फार जागृत आहे असे मानले जाते. मंदिर परिसरामध्ये उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ श्री गणपतीचे मंदिर असून त्याच्या समोर एका संगमरवरी शिलास्तंभावर एक सुंदर पंचमुखी शिवलिंग आपले लक्ष वेधून घेते. चार दिशांना चार मुखे आपल्याला दिसतात. त्यातील एक मुख हे वरच्या बाजूस आहे. या मुखांची नावे  पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी आहेत. ही सगळी पंचमुखं शंकराची विविध रूपे आहेत. अशी ही सुंदर मूर्ती फार देखणी आहे.
अशी ही सुंदर मंदिरे ही धोम, वाई आणि मेणवली या परिसरात बांधलेली असून आज मात्र मोठय़ा प्रमाणात उपेक्षित आहेत. महाबळेश्वरला फिरायला अनेक लोक जातात, परंतु या उपेक्षित असलेल्या धोमच्या नृसिंहाला फिरकतदेखील नाहीत. मेणवली आज लोकांना हिंदी सिनेमांच्या शूटिंगमुळे माहीत तरी झाले आहे, परंतु निसर्गरम्य धोम येथील नृसिंह मंदिराबाबत माहितीदेखील नाही. असे हे सुंदर, देखणे धोम येथील श्री नृसिंह मंदिर महाराष्ट्रातील दुर्मिळ मंदिरांपैकी एक मंदिर आहे. अशा या आडवाटेवरच्या धोम येथील श्री नृसिंह मंदिराला महाबळेश्वरला जाताना एकदा तरी भेट द्यावी.

– [email protected]