लेख – ओमायक्रोन विषाणूः  धोका आणि खबरदारी

>> प्रा. डॉ. गजानन . एकबोटे

सध्या ओमायक्रोन प्रकारामुळे संक्रमण वेगाने होत आहे, परंतु या प्रकारामुळे पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना गंभीर रोग किंवा मृत्यू यांचे भय कमी आहे, असा निष्कर्ष दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय तज्ञांनी काढलेला आहे. पूर्ण लसीकरण, आणि कोविड19 संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे अतिजोखीम असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देणे अतिशय महत्त्वाचे आहे, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ञांनी काढलेला आहे. ओमायक्रोन या कोरोना  नियमावली पाळली आणि पूर्ण लसीकरण करून घेतले तर आपणास घाबरण्याचे कारण नाही, हे सर्वांनी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने व्हायरस उत्क्रांती (टॅग-व्हीई) वरील आपल्या तांत्रिक सल्लागार गटाच्या सल्ल्यानुसार बी.1.1.529 या विषाणूच्या प्रकाराला ‘ओमायक्रोन’ हे नाव दिले. हा निर्णय टॅग-व्हीईला सादर केलेल्या पुराव्यावर आधारित होता. ओमायक्रोनमध्ये अनेक उत्परिवर्तन (म्युटेशन्स) होत आहेत, ज्याचा परिणाम ते कसे वागते, ते किती सहजपणे पसरते किंवा आजारपणाची तीव्रता किती आहे यावर होतो. सध्या यासंदर्भात जे ज्ञात आहे, त्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे. दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील संशोधक ओमायक्रोनबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी अभ्यास करत आहेत आणि या अभ्यासांचे निष्कर्ष उपलब्ध झाल्यावर ते ही माहिती उपलब्ध करून देतील.

संक्रमण क्षमता

‘डेल्टा’सह इतर प्रकारांच्या तुलनेत ओमायक्रोन या प्रकारामुळे अधिक प्रमाणात संक्रमण होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही (उदा. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये अधिक सहजपणे पसरणे). या प्रकारामुळे (ओमायक्रोन) प्रभावित झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील सकारात्मक चाचणी करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे, परंतु हे ओमायक्रोनमुळे आहे किंवा इतर घटकांमुळे आहे का? हे समजून घेण्यासाठी या महामारीविषयक अभ्यास सुरू आहे.

रोगाची तीव्रता 

डेल्टासह इतर प्रकारांच्या संसर्गाच्या तुलनेत ओमायक्रोनच्या संसर्गामुळे अधिक गंभीर रोग होतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहिती असे सुचविते की, दक्षिण आफ्रिकेमध्ये हॉस्पिटलायझेशनचे वाढते प्रमाण आहे, परंतु हे ओमायक्रोनच्या विशिष्ट संसर्गाच्या परिणामाऐवजी एपूण संक्रमित झालेल्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे असू शकते. ओमायक्रोनशी संबंधित लक्षणे इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत, हे सूचित करण्यासाठी सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सुरुवातीच्या अहवालानुसार हे संक्रमण विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये होते. तरुण व्यक्तींना अधिक सौम्य रोग असतो. परंतु ओमिक्रॉन प्रकाराच्या तीव्रतेची पातळी समजण्यास काही आठवडे लागतील. जगभरात प्रबळ असलेल्या डेल्टा प्रकारासह कोविड-19 चे सर्व प्रकार सर्वात असुरक्षित लोकांसाठी (जोखीम आलेल्या) गंभीर रोग किंवा मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे प्रतिबंध करणे नेहमीच महत्त्वाचे असते.

प्राथमिक पुरावे सूचित करतात की, इतर प्रकारांच्या तुलनेत ओमायक्रोनने पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो (म्हणजे, ज्या लोकांना पूर्वी कोविड झाला आहे त्यांना ओमायक्रोनने अधिक सहजपणे पुन्हा संसर्ग होऊ शकतो), परंतु ही माहिती मर्यादित आहे. अधिक माहिती येत्या काही आठवडय़ांत उपलब्ध होईल.

लसींची परिणामकारकता 

लसींसह आमच्या विद्यमान प्रतिकार उपायांवर या प्रकाराचा संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना इतर शास्त्रज्ञांसोबत काम करत आहे. गंभीर रोग आणि मृत्यू कमी करण्यासाठी लस महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये प्रबळपणे प्रसारित होणाऱ्या डेल्टा या प्रकाराचा समावेश आहे. सध्याच्या सर्व लसी कोरोनाच्या सर्व प्रकारांमुळे होणाऱ्या गंभीर रोग आणि मृत्यू यांच्या विरुद्ध कमी-अधिक प्रमाणात प्रभावी आहेत.

मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पीसीआर चाचण्या ओमायक्रोनचा संसर्ग शोधतात, जसे की असे आपण इतर प्रकारांमध्ये देखील पाहिले आहे. या प्रकारच्या विषाणूचा जलद प्रतिजन शोध चाचण्यांसह (रॅपिट अॅण्टीजेन टेस्ट) इतर प्रकारच्या चाचण्यांवर काही परिणाम होतो का? हे निर्धारित करण्यासाठी अभ्यास चालू आहे.

कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि ‘आयएल 6’ रिसेप्टर विरोधी औषधे गंभीर कोविड-19 असलेल्या रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी अजूनही प्रभावी आहेत. ओमायक्रॉन प्रकारातील विषाणूच्या काही भागांमध्ये झालेले बदल पाहता इतर उपचार तितकेच प्रभावी आहेत की नाही, हे पाहण्यासाठी इतर उपचारांचे मूल्यांकन चालू आहे.

सध्या ओमायक्रोनला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जगभरातील संशोधकांशी समन्वय साधत आहे. सध्या सुरू असलेल्या अभ्यासांमध्ये संक्रमणाची तीव्रता, संसर्गाची तीव्रता (लक्षणांसह), लसींची कार्यक्षमता, निदान चाचण्या आणि उपचारांची परिणामकारकता यांचा समावेश होतो. येत्या काही आठवडय़ात यासंदर्भातील अधिक माहिती समोर येईल.

देशांसाठी शिफारस केलेल्या कृती

ओमायक्रोनला धोकादायक विषाणू म्हणून घोषित केले गेले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सर्वच देशांना निरीक्षण करणे आणि अशा प्रकरणांची नोंद ठेवण्यासह अनेक कृती करण्याची शिफारस केली आहे. ‘जीआयएसएआयडी’सारख्या सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीवर जिनोम अनुक्रमसंबंधी माहिती देणे, जागतिक आरोग्य संघटनेला प्रारंभिक प्रकरणे किंवा क्लस्टर्सचा अहवाल देणे, ओमिक्रॉनमध्ये भिन्न संक्रमण किंवा रोग वैशिष्टय़े आहेत काय? लस, उपचार, निदान, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपायांच्या परिणामकारकतेवर परिणाम होतो का? हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी क्षेत्रीय तपासणी आणि प्रयोगशाळेचे मूल्यांकन करणे इत्यादी कृती करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने अनेक देशांना केली आहे.

देशांनी जोखीम विश्लेषण आणि विज्ञान-आधारित दृष्टिकोन वापरून एपूणच कोविड-19 चा प्रसार कमी करण्यासाठी प्रभावी सार्वजनिक आरोग्य उपायांची अंमलबजावणी सुरू ठेवली पाहिजे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने सुचविले आहे. या प्रकरणांमधील वाढ रोखण्यासाठी देशांनी सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय सोयी-सुविधा यांची क्षमता वाढवल्या पाहिजेत. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेना देशांना सहकार्य आणि मार्गदर्शन प्रदान करत आहे.

याव्यतिरिक्त, सर्व ठिकाणी आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध व्यक्तींसह सर्व असुरक्षित (अति जोखीम असलेले) गटांना उपचार आणि निदानाच्या समान संधीसह त्यांना पहिला आणि दुसरा डोस मिळावा, याची खात्री करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोविड-19 विरुद्ध असलेल्या लसींच्या संधीबरोबरच उपचारातील असमानता तातडीने दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोविड19 लोकांसाठी शिफारस केलेल्या कृती

या प्रकाराचा (ओमायक्रोन) विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी, नागरिकांनी कोविड-19 संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. इतरांपासून किमान एक मीटर अंतर ठेवणे, योग्य मास्क वापरणे, वायुविजन सुधारण्यासाठी खिडक्या उघडणे, गर्दीच्या जागा टाळणे, हात स्वच्छ ठेवणे, खोकताना किंवा शिंकताना टिश्यु पेपरचा वापर करणे, पूर्ण लसीकरण करणे इ.

सध्या ओमायक्रोन प्रकारामुळे संक्रमण वेगाने होत आहे, परंतु या प्रकारामुळे पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना गंभीर रोग किंवा मृत्यू यांचे भय कमी आहे, असा निष्कर्ष दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय तज्ञांनी काढलेला आहे. पूर्ण लसीकरण, आणि कोविड-19 संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे अतिजोखीम असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देणे अतिशय महत्त्वाचे आहे, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ञांनी काढलेला आहे. आपल्या देशातही बूस्टर डोसविषयी धोरणात्मक निर्णय लवकर घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. पेंद्र शासन व महाराष्ट्र शासन याबाबतीत तातडीने कारवाई करतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. ओमायक्रोन या कोरोना विषाणूच्या प्रकारात वरील नियमावली पाळली आणि पूर्ण लसीकरण करून घेतले तर आपणास घाबरण्याचे कारण नाही, हे सर्वांनी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

(लेखक बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर ऑफ सर्जरी आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत.)