मनुष्य गौरवाचा विचार !

>> अनिकेत रोहिदास सोनगिरे,प्राध्यापक, अशोका महाविद्यालय, नाशिक

आज 25 ऑक्टोबर. हा दिवस पूज्य दादांचा निर्वाणदिन. या दिवसाला दादाजींप्रती कृतज्ञता म्हणून ”अनन्याह”च्या माध्यमातून स्वाध्यायी एकत्र येऊन गीता पारायण करतात व आयुष्यभर गीता स्वतःच्या जीवनातून जगून दाखवणाऱ्या पूज्य दादांना वंदन करतात . त्या निमिताने…

भारतीय संस्कृती खूप भव्य दिव्य जरी असली तरी जातीभेद, वंशभेद , वर्णभेद अशा अनेक भेदाने या संस्कृतीला जनमानसात रुजवण्यापासून कायम दूर ठेवले. मानवी बुद्धी आणि मनाला पुरून उरेल असे वाङ्मय त्यात सापडेल. वेद, पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्रे, दर्शनशास्त्र, भगवदगीता याद्वारे मानवी जीवनापासून ते ब्रह्मांडापर्यंतचा परिपूर्ण विचार यात केला गेला. मनू महाराजांनी या भारतीय विचाराला खरे तर वैश्विक बनवण्याचा विचार मांडला

“एतद् देश प्रसूतस्य शकासाद् अग्रजन्मन : , स्वं-स्वं चरित्रं शिक्षरेन् पृथ्वियां सर्व मानव :”

परंतु तथाकथित काही स्वार्थी धर्मगुरूंनी अशा वैश्विक होऊ पाहणाऱ्या धर्माला ‘ सप्तबंदी ‘ द्वारे संकुचित बनवून टाकले. ह्या सप्तबंदीने ( वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधूबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी ) समाजाला पोखरून काढले. यातून भारतीय समाजात असा भेदाभेद पसरला की “भारतीय तत्वज्ञान व विचार ही अती संकुचित विचारधारा असून त्यात आपल्याला निम्न, तुच्छ, नगण्य स्थान आहे” असा विचार अनेक वर्गांच्या समाजमनात निर्माण झाला. त्यामुळे इंग्रजांचे भारतात येणे खरे तर वरदान असल्याचे अनेक लोकांना वाटले. परंतु त्याच्याने परिणाम असा झाला की,” या संस्कृतीत असलेल्या रत्नांचा खजिना भारतीय समाजाला कळेल कसा ? ” असा मोठा प्रश्न निर्माण झाला . परंतु वैदिक ऋषीनी केलेल्या प्रार्थना या भूमीत निरंतर जिवंत आहेत . ” ओम् आ ब्रह्मन् ब्राह्मणों ब्रह्मवर्चसी जायताम..!” अशा प्रार्थना इथे फळ पावतात. त्याचाच परिणाम इथे त्या विचारांचा पुनर्विचार झाला. भक्तीला चळवळीचे स्वरूप देऊन संतांनी जनमानसात वेदोक्त विचार पुनः प्रस्थापित केला. या विचारांनी ” अवघाची संसार सुखाचा करीन” चा निर्धार करून संत ज्ञानेश्वरांनी ” सर्वेत्र सुखिनः संतु …” ची आठवण करून दिली तर

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।

भेदाभेदभ्रम अमंगळ ॥

हे सांगून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वैदिक धर्म कुणाचीही मक्तेदारी नसून तो तर अखिल मानवी कल्याणासाठी आहे हे पटवून दिले. तथाकथित धर्मगुरूंनी संतांना खूप त्रास दिला पण ” वेदांचा तो अर्थ आम्हांसी ठावा , येरानी वहावा भारमाथा ” अशा आत्मविश्वासाने संतांनी वैदिक धर्माला सर्वजनीन केले.

पुनरुज्जिवित केले. वेदान्तातील वेदांत तत्वज्ञान संपूर्ण जगाला सांगणारे स्वामी विवेकानंद हे वेदांत केसरीच खरे !तथाकथित धर्ममार्तंडांनी त्यांनाही अडवण्याचा खूप प्रयत्न केला . ” तुम्ही संन्यासी !!!! समुद्र उल्लंघून जाऊ कसे शकता ?!” असे अनेक प्रश्न ठेऊन विवेकानंदाना अडवण्याचा प्रयत्न झाला खरा पण थांबेल तो विवेकानंद कसला!! विवेकानंदानी विश्वभरात वेदांत समजावला व भारतीयांबद्दल व त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल असलेली भ्रामक समज काढून टाकली. परंतु भेदाभेद नावाचा रोग अजूनही छुप्या स्वरूपात आपल्या समाजात भिनलेला आहे. मनुष्याला जात , पात , धर्म, शिक्षण. आर्थिक स्थिती, सामाजिक कीर्ती ह्याच चष्म्यातून पाहावे का !! मनुष्याला “मनुष्य” असल्याचा गौरव नाही का ? हा प्रश्न मांडून त्यावर उत्तरे देऊन मनुष्याला गौरव प्राप्त करून देण्याचे काम आजच्या काळात स्वाध्याय कार्याचे प्रणेते पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले(पूज्य दादा) यांनी केले.

“ज्याच्या हृदयात राम आहे तो हीन, दीन , दुबळा, लाचार कसा असू शकेल तो तर ” अमृतस्य पुत्र: ” आहे ” हा विचार दादाजींनी समाजाला पटवून दिला. भक्तीतून सर्व प्रश्न सुटू शकतात व त्यातून समाजातील सर्व भेद मिटून समाजात अपेक्षित अशी पंचरंगी क्रांती ( सामाजिक , आर्थिक, राजकीय,भावनिक , सांस्कृतिक ) घडू शकते हे दादांनी समजावले. ” भक्ती ही एक वृत्ती आहे” असे सांगून दादांनी सांस्कृतिक साधनांचा खरा अर्थ समजावून सांगितला. “एकादशी खाण्यातील बदल नाही तर चालण्यातला बदल आहे म्हणून 14 दिवस स्वतःसाठी पण 15 व दिवस भगवंतासाठी द्यायला हवा ” या विचाराने लाखो स्वाध्यायी भगवंताचे विचार घेऊन गावागावात जाऊ लागले व त्रिकाल संध्येच्या माध्यमातून भगवंताविषयीच्या कृतज्ञतेचा विचार समाजात रुजला. अशा प्रकारे मंदिर, एकादशी, यज्ञ ह्यांचा खरा अर्थ समजावून दादांनी सांस्कृतिक साधनांचा जीर्णोद्धार केला. ” भक्ती ही सामाजिक शक्ती आहे ” ( Bhakti is Social Force ) हा क्रांतिकारी विचार दादाजींनी दिला व त्याला प्रयोगाची जोड देऊन हा विचार कृतिशील केला . ” योगः कर्मसू कौशलम ” अर्थात कर्म-कौशल्य भगवंताला अर्पण करून देखील मी भक्ती करू शकतो हा गीतेतील विचार दादांनी समजावला . ” चॅरिटी काय श्रीमंतच करू शकतात ?! भगवंताने दिलेल्या घामातून अर्थात कष्टातून महालक्ष्मी उभी राहू शकते ” याचे प्रात्यक्षिक मत्स्यगंधा, योगेश्वर कृषी , हिरामंदीर अशा अनेक प्रयोगांमार्फत दादांनी दाखवून दिले. मनुष्यात चंद्र सूर्य चालवणारी शक्ती येऊन बसली आहे – ” सर्वस्य चाहं हृदिसंनिविष्ठो ” , त्यामुळे हाच त्याचा गौरव आहे हा ‘आत्मगौरव ’व भगवंत जसा माझ्यात आहे तसा तो दुसऱ्यातही आहे – ” ममैंवांशो जीवलोके..” हा ‘परसन्मान’. यातून दुसरा दुसरा नसून तो माझा दैवी भाऊ आहे “Other is not Other but he is my divine brother” हा विचार वैश्विक भ्रातृभाव निर्माण करतो. अशाप्रकारे आत्मगौरव व परसन्मान “मनुष्यगौरव” उभा करू शकतो हे पुज्य दादांनी समाजाला विचाराने व त्याचे प्रात्यक्षिक करवून पटवून दिले. आज स्वाध्याय परिवार संपूर्ण विश्वभरात पसरला आहे . “आम्ही एका भगवंताची लेकरे ” या विचाराने प्रत्येक स्वाध्यायी मग तो कोणत्याही भाषा, धर्म, पंथाचा, आर्थिक , शैक्षणिक स्थितीतील असो तो स्वाध्यायाच्या बैठकीवर मांडीला मांडी लावून बसतो आहे व सर्व भेद विसरून भगवंताच्या प्रेमाचा अनुभव घेत आहे. ह्या स्वाध्याय विचाराला आजच्या काळात गतिमान ठेवण्याचे काम पूज्य जयश्री आठवले- तळवलकर अर्थात “दीदीजी ” करत आहे . “दादांनी दिलेली त्रिकालसंध्या शेवटल्या माणसापर्यंत पोहोचवल्यानेच भगवंताचे खरे काम होऊ शकते.” या विश्वासातून दीदीजी पूज्य दादांच्या 100 व्या जन्मवर्षानिमित्त अधिक परिश्रम घेत आहेत. आज 25 ऑक्टोबर हा दिवस पूज्य दादांचा निर्वाणदिन. या दिवसाला दादाजींप्रती कृतज्ञता म्हणून ”अनन्याह”च्या माध्यमातून स्वाध्यायी एकत्र येऊन गीता पारायण करतात व आयुष्यभर गीता स्वतःच्या जीवनातून जगुन दाखवणाऱ्या पूज्य दादांना वंदन करतात . मनुष्याला खरा “मनुष्य गौरव ” समजावणाऱ्या कांतदर्शी पूज्य दादांना वंदन .

आपली प्रतिक्रिया द्या