‘तरु’णाई – दैवी पारिजातक

>> डॉ. सरिता विनय भावे

पारिजातक बाळगोपाळांना ‘टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले; भिरभिर त्या तालावरती गाणे अमुचे जुळे’ अशी साथ देतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना मोतिया-केशरी रंगसंगतीमुळे ‘माणिकमोती’ बाळगून असणारा आणि आपली ही ‘पुष्पसंपत्ती’ प्रेयसी धरणीवर पूर्णपणे उधळून ‘रिक्त’ झालेला पारिजात ‘संन्यासी’च वाटतो!

मागील लेखात धरतीवर ‘देववृक्ष’ मानल्या जाणाऱया वृक्षांची नावे आपण वाचली. या लेखात ज्याचा जन्मच देवलोकात झाला आहे अशा पारिजातकाबद्दल आपण जाणून घेऊया. समुद्रमंथनात उत्पन्न झालेले पारिजाताचे झाड (पारी म्हणजे समुद्र, जात म्हणजे जन्मलेला) इंद्राच्या नंदनवनाचे मुख्य आकर्षण होते. श्रीकृष्णांनी त्याला मोठय़ा खुबीने धरणीवर आणले, पण ते होते जात्याच खोडकर! त्यांनी याच्या निमित्ताने सत्यभामा आणि रुक्मिणीत भांडणही लावून दिले! श्रावणसरीत भिजलेले; नाजूक, सुगंधी, पांढऱया-केशरी रंगसंगतीच्या फुलांनी बहरलेले प्राजक्ताचे झाड पाहून, त्याच्या उत्पत्तीशी स्वर्गातील देवतांचा संबंध नसता तरी ते या धरतीपेक्षा स्वर्गातच जास्त शोभून दिसले असते असे भासत राहते आणि त्याचे ‘देवतरू’ हे नाव सार्थ वाटते. फक्त याचीच जमिनीवर पडलेली फुले देवाला अर्पण करण्यासाठी ‘चालतात’, यावरूनच याचे ‘दैवी स्वरूप’ स्पष्ट होते.

आपल्या ‘पश्चिम बंगाल’ या राज्याचे हे ‘राज्यपुष्प’ असून; हरसिंगार, पारिजात, शेफाली (हिंदी), प्राजक्त, पारिजातक (मराठी), शेफाली, शिऊली (बंगाली), पारिजातमू, पगडमल्लै (तेलुगू), पवलमल्लिकै (तामीळ), पविझमल्ली (मल्याळम), पारिजात (संस्कृत, कानडी), गुलजाफरी (उर्दू), कोरल जॅस्मिन (इंग्रजी) या नावांनी विविध भाषांत त्याला संबोधतात. डोळ्यांतून मूकपणे टपटप झरणाऱया अश्रूंसारख्या, रात्रीतून हळुवारपणे गळणाऱया याच्या फुलांमुळे त्याचे वनस्पतीशास्त्र्ाात Nyctanthes arbortristis असे नामकरण असून त्याचा शब्दशः अर्थ आहे ‘ट्री ऑफ सॉरो’. पारिजातकाचे झाड मध्यम उंचीचे असून खोडाची साले पटकन निघणारी असतात. पाने साधी, खरखरीत, पसरट, दंतूर कडांची, काळपट हिरवी, बारीक लव असलेली आणि समोरासमोर असतात. फुले अत्यंत सुवासिक; पांढऱया 5 ते 8, किंचित दुभंगलेल्या पाकळ्यांची आणि नाजूक केशरी देठांची असतात. एका गुच्छात 2 ते 7 फुले येतात. सूर्यास्तानंतर फुले उमलायला सुरुवात होऊन पहाटे अंगणभर फुलांची पखरण झालेली दिसते आणि सगळा परिसर सुगंधाने दरवळून निघतो. सूर्यस्पर्शाचा जणू शापच असलेली ही फुले उन्हे वाढली की, मात्र मलूल होऊ लागतात. साल, पाने, फुले, बिया ताप, कफ, पित्त, सांधेदुखी इ. विकारांवर उपयुक्त आहेत. फुलांचा सजावटीसाठी आणि खाण्याचा पिवळा/केशरी रंग, विविध अत्तरे, सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी उपयोग होतो.

पारिजातक बाळगोपाळांना ‘टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले; भिरभिर त्या तालावरती गाणे अमुचे जुळे’ अशी निरागस साथ देतो, तर कोमल रूपगंधामुळे प्रेमकवितांमध्येही त्याचे वारंवार आगमन होत असते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना मोतिया-केशरी रंगसंगतीमुळे ‘माणिकमोती’ बाळगून असणारा आणि आपली ही ‘पुष्पसंपत्ती’ प्रेयसी धरणीवर पूर्णपणे उधळून ‘रिक्त’ झालेला पारिजात ‘संन्यासी’च वाटतो! आपल्या ‘उषःकाल’ कवितेत ते म्हणतात, ‘माणिकमोत्यांची पायाशी घालून बरसात, बसे संन्यस्त पारिजात; वाहू लागला सुगंध वारा तो वातावरणी, झाला उषःकाल राणी!’ कवी सुरेश भट कधी ‘……..स्वरांचा अबोल पारिजात’ तर कधी ‘……स्पर्श तुझा पारिजात’ असे लिहून जातात! दुर्गाबाई भागवतांना त्याच्या फुलांचा सडा ‘मोत्यापोवळ्या’च्या राशीसारखा वाटतो! इतर वेळी कठोर भासणाऱया सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी’मध्ये प्राजक्ताच्या फुलांनी न्हाऊन निघाल्याच्या त्यांच्या पुलंबरोबरच्या सुगंधी आठवणीचे तरलतेने वर्णन करताना पारिजातकासारख्याच मृदू होऊन जातात.  असा हा ‘चौदा रत्नांपैकी एक रत्न’ असूनही साधाच असलेला प्राजक्त आपल्या क्षणभंगूर पण सुगंधी अस्तित्वात ‘जगावे कसे’ हा धडाच आपल्याला देऊन जातो!

आपली प्रतिक्रिया द्या