आभाळमाया – सूर्यस्पर्श!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

‘त्याने’ चक्क ‘कोरोना’ला स्पर्श केला तरी ‘ते’ सुखरूप आहे हे वाचून दचकू नका. सध्या ‘कोरोना’ हा शब्द कोविड आणि त्याच्या नित्यनव्या अवतारांशी एवढा निगडित झालाय की, सूर्याच्या तेजस्वी प्रभामंडळाला ‘सोलार कोरोना’ म्हणतात याचाच विसर पडलाय. शिवाय ‘कोरोना बोरिऑलिस’ किंवा उत्तर मुकुट हा एक सुंदर तारकासमूहसुद्धा अवकाशात आहे. तर अशा या ‘सौर कोरोना’ ऊर्फ सूर्याच्या विलोभनीय प्रभा मंडळाला ‘नासा’च्या ‘पार्कर सोलार प्रोब’ (सौर अभियान) या यानाने ‘स्पर्श’ केला. साक्षात सूर्याला त्याच्या अगदी जवळ म्हणजे सत्तर लाख किलोमीटरवरून स्पर्श करणारं हे पहिलंच मानवनिर्मित यान. त्याचे संपूर्ण निष्कर्ष आपण या वर्षाच्या अखेरीस त्या यानाला सूर्यस्पर्शाचं वर्ष पूर्ण होताना जाणून घेऊच, पण ही अंतराळ इतिहासातली खूप महत्त्वाची घटना म्हणून त्याची त्वरित नोंद घेतली. मानवी यानांच्या अवकाश झेप घेण्याच्या या मालिकेत ‘स्पुटनिक’नंतर अमेरिकेचं पहिलं यान कोणतं ते पुढच्या आठवडय़ात जाणून घेऊ.

आधी सौर ‘कोरोना’विषयी थोडंसं. सूर्य हा ‘तेजोनिधी’ तर आहेच, पण तो ‘लोहगोल’ असला तरी वैज्ञानिकदृष्टय़ा ‘वायुगोल’ आहे. तेजोमेघातून निर्माण झालेला पाच अब्ज वर्षे वयाचा अवकाशगंगा किंवा ‘मिल्की वे’मधला सर्वसामान्य तारा आहे. त्याच्या अंतर्भागात असलेल्या प्रचंड हायड्रोजन वायूचं तितक्याच प्रचंड घुसळणीमुळे हिलियम वायूत क्षणोक्षणी रूपांतर होत असतं. त्यातूनच प्रकाश आणि ऊर्जा निर्माण होते. नेपच्यूनपर्यंतचे ग्रह आणि आपल्या सौरमालेतील सर्व परप्रकाशित घटक सूर्यापासूनच जन्माला आले आहेत अशा या सूर्याचं आपल्यासाठी ‘जीवनदायी’ आणि ‘सृष्टी पालक’ असं महत्त्व आहे. सूर्य सृष्टीचा जनक तर पृथ्वी ‘संगोपनकर्ती’ आहे. त्यातही आपल्या चंद्राने महत्त्वाचा वाटा उचलल्याने आपलं जीवनचक्र (माणसाने बिघडवलं नाही तर) अव्याहत पुढची काही अब्ज वर्षे सुरळीत सुरू राहील.

याच सूर्यातून पृथ्वीवरचं सगळं वस्तुमान म्हणजे धातू वगैरे गोष्टी निर्माण झाल्या आहेत. ‘तारे आपले पूर्वज’ या लेखात ते आपण पाहिलंच, तर सुमारे पंधरा कोटी प्रकाशवर्षे अंतरावरून आपल्याला ऊर्जा देणारा सूर्य सुखद ऊन, प्रकाश आणि अनेकदा असहय़ ‘ताप’ही आणतो. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही माणसाची ‘किमया’ त्यात भर घालते ते निराळंच.

पृथ्वीवरून सूर्य ‘जाणून’ घेणं म्हटलं तर सोपं आणि खूप कठीणही. सोपं अशासाठी की, ‘पार्कर’ यानाने सूर्याची थेट भेट घेऊन त्याला आता स्पर्श केला असला तरी सूर्य मात्र पृथ्वीवरच्या चराचराला गेली साडेचार अब्ज वर्षे स्पर्श करत आहे. सकाळच्या वेळी कोवळय़ा उन्हाचा किंवा खिडकीतून येणाऱया सूर्यकिरणांचा स्पर्श झाला की, आपण सुखावतो. त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही की, आपल्याला याक्षणी स्पर्श करून ऊब आणि ‘ड’ जीवनसत्त्व वगैरे देणारे सूर्यप्रकाशाचे हे कण सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी सूर्याच्या गाभ्यात जमा झालेत! आपला रोजचा ‘ताजा’ सूर्यस्पर्श असा दहा लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला आहे हे जाणणंच थरारक आहे. मात्र सूर्यप्रकाश कधी ‘शिळा’ होत नाही. प्रकाशकण अव्याहत ताजेच राहतात. सूर्याच्या गाभ्यातील प्रकाशकण, त्याच्या जन्मानंतर किचकट गर्दीतला ‘प्रवास’ करत सुमारे सात लाख किलोमीटर (सूर्याची त्रिज्या) पार करून दहा लाख वर्षे दमछाक न होता जिद्दीने पुढे सरकत सूर्याच्या पृष्ठभागावर येतो आणि तिथून सुसाट निघाला की, पंधरा कोटी किलोमीटर अंतर अवघ्या सव्वाआठ मिनिटांत पार करून आपल्याला स्पर्श करतो म्हणजे केवढे ‘श्रीमंत’ आपण, पण आपल्याला त्याची जाणीव कुठे असते? कारण अमूल्य सूर्यप्रकाश ‘फुकट’ मिळतो ना!

आपल्याला अवकाशात दिवसाही सर्वाधिक तेजस्वी दिसणारा एकमेव तारा म्हणजे सूर्य. सूर्यामुळेच ‘दिवस’ होतो. त्याच्या पृष्ठभागावरचं तापमान सुमारे 5 हजार केल्विन किंवा जवळपास तेवढंच सेल्सियस असतं. आपण पस्तीस, चाळीस सेल्सियस तापमानाला उन्हाची काहिली म्हणतो. हा दूरस्थ प्रवास करून आलेला सूर्यकिरण आपल्याला सौम्य ऊर्जा देतो. ती ऊर्जाही साठवता आली तर सर्व जगाला पुरेल एवढी वीज तयार करता येईल. सूर्य असल्या जीवनाला आवश्यक ते सर्व काही देतो. त्याच्या गाभ्यातील थर्मोन्यूक्लिअर ऊर्जा आपल्याला अब्जावधी वर्ष पुरेल असा तो ‘अक्षय’ साठा आहे.

शेवटी सूर्याच्या ‘फोटोस्फीअर’ ऊर्फ पृष्ठभागाबाहेर ‘स्पाईक’च्या स्वरूपात झगमगणारा ‘कोरोना’ केवळ खग्रास सूर्यग्रहणाच्याच वेळी काही सेकंद किंवा काही मिनिटे दिसतो. 16 फेब्रुवारी 1980 च्या दुपारी आम्ही रायचूर येथून सूर्याची डायमंड रिंग, बेलीज बीड्स अनुभवली आणि ‘कोरोना’चं अडीच मिनिटे दुर्मिळ दर्शन झालं. तो क्षण विलक्षण होता. सूर्याच्या पृष्ठभागावरील प्रकाशापेक्षा कोरोना ‘कमी’ उष्ण असला तरी तो सूर्याचाच भाग आहे. सौर संशोधनासाठी गेलेलं पार्कर यान त्याला अनेकदा स्पर्श करून सूर्याच्या अंतरंगाच्या मागोवा घेणार आहे. अवकाश झेपेतील आतापर्यंतची ही आगळीवेगळी कामगिरी म्हणून त्याचं महत्त्व. शिवाय आपला एकमेव सौरसाठा असलेली मकर संक्रांत उद्याच असल्याने सौर यानाचं औचित्यपूर्ण स्मारण झालं.