जाऊ शब्दांच्या गावा – जरीपटका

>> साधना गोरे

हल्ली लग्न समारंभात, सांस्पृतिक कार्यक्रमात किंवा गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सारखेच केशरी फेटे बांधायची पद्धत रूढ झाली आहे, पण एकेकाळी पटका किंवा फेटा हा भारतीय पुरुषांच्या दैनंदिन पोशाखाचा भाग होता. सर्वसाधारणपणे पुरुष शेतात उन्हातान्हात काम करताना साधा पांढरा पटका बांधत. शिवाय लग्न समारंभात, सणासुदीला बांधण्यासाठी म्हणून केसरी किंवा इतर रंगातला खास ठेवणीतला एखादा तरी पटका असे. भारतभर पटके बांधण्याच्या पद्धती प्रांतानुसार, जातीनुसार वेगवेगळ्या दिसतात. पटक्याच्या लांबीनुसारही तो बांधण्याच्या पद्धती बदलतात.

तर हा ‘पटका’ शब्द आला कुठून? संस्पृतमधील ‘पट्ट’ शब्दापासून हिंदी व मराठीमध्ये ‘पटका’, पंजाबीमध्ये ‘पटुका’, सिंधीमध्ये ‘पट्को’, नेपाळीमध्ये ‘पटुका’ असे शब्द आले. तामीळमध्ये ‘पुट्टम्’ म्हणजे कापड. पटकासुद्धा साडीप्रमाणे पुठंही शलाई नसलेला पोशाख असल्यामुळे तामीळमधला हा अर्थ लक्षणीय आहे.

‘पटका’ शब्दाशी साधर्म्य असणारा दुसरा शब्द म्हणजे ‘पगडी’ किंवा ‘पागोटे’. पटका आणि पगडी यातला महत्त्वाचा फरक म्हणजे पटक्याला सोगा म्हणजे शेमला असतो, जो कानामागून खांद्यावर येतो, पण पगडीला असा सोगा नसतो. हा ‘पगडी’ शब्दही पटक्याप्रमाणे संस्पृतमधील ‘पट्ट’ किंवा ‘पट्टम’ शब्दापासून आला आहे. या शब्दाचं Puggree असं इंग्रजी रूपही आहे. मराठीसह ओडिया, हिंदी, पंजाबी या भाषांमध्ये त्याचं ‘पगडी’ असंच रूप आहे, तर बंगालीत ‘पागडी’ आणि सिंधीत ‘पगिडी’ अशी रूपं आहेत.

‘पटका’ हे डोपं झाकण्याचं वस्त्र असलं तरी जनमानसात त्याभोवती मानापनाचे संकेतही जोडले गेलेले आहेत. एखाद्याला अगदी कळकळीची विनंती करण्यासाठी डोक्याचा पटका काढून समोरच्या व्यक्तीच्या पायांवर ठेवला जाई. जरीपटका हे मराठय़ांचं मुख्य निशाण होतं. मोहिमेवर जाणाऱया सेनापतीला ते दिलं जाई. कवी गोविंदाग्रजांची दसरा सणावरची एक कविता आहे. त्यात ते म्हणतात – ‘जरीपटका घ्या सुधारणेचा, भगवा शेंडा नव्या मताचा, नव्या दमाने फडकविण्याचा, मानवधर्माचा हा दसरा, नव आशेच्या तृणांपुरांचा’. असं जरीपटक्याचं नातं थेट सुधारणेशी जोडलं गेलेलं दिसतं.

अलीकडे मराठीत पटक्याला मोठय़ा प्रमाणात ‘फेटा’ म्हटलं जातं. ‘पटका’, ‘पगडी’ शब्दांप्रमाणे ‘फेटा’ शब्दही काही भारतीय भाषांमध्ये सूक्ष्म बदल करून वापरला जातो. वि. का. राजवाडे यांच्या मते, संस्पृतमधील ‘स्फिट्’ या शब्दापासून ‘फेटा’ शब्द आला, पण कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘‘हे अलीकडे केलेलं संस्पृतीकरण आहे. हिंदीमधून हा शब्द मराठीत आला.’’ बौद्ध धर्मातील घुमटाकार पागोडा – पॅगोडा आणि पगडी या शब्दांच्या साम्याबरोबरच त्यांच्या सारख्या रचनाही विचार करायला लावणाऱया आहेत.

डोक्याला बांधायचे फडके, रुमाल किंवा फेटा या अर्थाने ‘मुंडासे’ हा शब्दही मराठीत वापरला जातो. ‘मुंडास’ हा शब्द मुळात कानडी आहे. कानडीत मुंड म्हणजे डोके. त्यामुळे ‘डोक्याला बांधायचे वस्त्र’ या अर्थाने तो वापरला जातो. थोडं विषयांतर करून सांगायचं तर लग्नात नवरानवरीच्या डोक्याला बांधायच्या शोभेच्या माळेला ‘मुंडावळी’ म्हणतात.

पटका किंवा पगडी या मानाने टोपी हे तसं आधुनिक शिरस्त्राण म्हणायला हवं. गांधीटोपीबरोबरीनेच आता विविध आकारांच्या टोप्या बाजारात उपलब्ध दिसतात. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पटका – पगडी बांधण्यापेक्षा टोपी घालणं अगदीच सोपं आहे. कदाचित यावरूनच फसवणूक, लबाडी या अर्थानं वापरला जाणारा ‘टोप्या घालणं’ हा शब्दप्रयोग वापरात आला असावा. तर सांगायचा मुद्दा असा की, संस्पृतमधील स्तुभ – स्तूप या शब्दापासून टोपी शब्द आल्याचं कुलकर्णी म्हणतात. इथं बौद्ध धर्मातील स्तूप आणि टोपी या शब्दांचं आणि त्यांच्या रचनेतलं साम्य नजरेत भरणारं आहे. शरीराच्या सगळ्यात वरच्या भागात म्हणजे डोक्यावर टोपी घातली जाते आणि याच अर्थाने इंग्रजीत आणि काही युरोपीय भाषांमध्ये ‘टॉप’ हा शब्द वापरला जातो. यातील साधर्म्यही नक्कीच चिंतनीय आहे.

हल्ली डोकं झाकण्याचं सहज उपलब्ध असलेलं एक वस्त्र म्हणजे रुमाल. हा शब्द फार्सातून हिंदीत आणि मग मराठीत आला. फार्सामध्ये ‘रु’ म्हणजे चेहरा आणि ‘माल’ म्हणजे फडकं. मराठीत हा शब्द दोन अर्थांनी वापरतात – एक तोंड पुसायचं फडकं आणि दुसरं म्हणजे डोक्याला बांधायचं फडकं. सर्वसाधारणपणे रुमालाचा आकार चौकोनी असतो, पण निरनिराळ्या काळात या फडक्याची लांबी,रुंदी वाढत गेली आहे. इंग्रजीत आपण त्याला ‘स्कार्फ’, ‘स्टोल’ अशा नावांनी संबोधतो, पण मुळात ते रुमालच आहेत.