सारांश – पितृसत्ताक मानसिकतेला आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. ऋतू सारस्वत

पितृसत्ताक निकषांमध्ये महिलांची प्रतिभा, शिक्षण आणि त्यांचे स्वावलंबन यांचा स्वीकार करण्यात येत नाही. त्यामुळेच केवळ दक्षिण कोरियाच नव्हे तर चीनमध्येही लग्न आणि मुले जन्माला घालण्याच्या परंपरागत भूमिका मुली धुडकावून लावत आहेत. जर पितृसत्ताक व्यवस्था आपल्या परंपरागत समजुतींमधून बाहेर आली नाही, तर दक्षिण कोरिया आणि चीनमधील सामाजिक बदलांचे पडसाद अन्य देशांमध्येही उमटल्यावाचून राहणार नाहीत.

घरातील जबाबदाऱया आणि ऑफिसमधील काम याचे ओझे कोविड-19च्या संसर्ग काळात महिलांवर एवढे वाढले की जागतिक पातळीवर 23 टक्के आणि हिंदुस्थानात 26 टक्के कामकरी महिला आपले काम सोडण्याचा विचार करीत आहेत. याबाबतचा खुलासा नुकत्याच जारी करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय अध्ययनातून झाला असून दहा देशांमधील 5000 महिलांच्या परिस्थितीचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. डेलाईट नावाच्या फर्मने केलेल्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अजिबात आश्चर्यजनक वाटत नाहीत. कारण संकट कोणतेही असो, त्याचा सर्वाधिक परिणाम महिलांवरच होतो आणि इतिहासाची पाने चाळल्यास या वास्तवाला पुष्टी मिळते. तसे पाहायला गेल्यास कामकरी महिलांचे खुल्या दिलाने स्वागत कोणत्याच देशात केले जात नाही. परंतु जेव्हा त्यांचे कुटुंब वाढते तेव्हा त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱया आधी पूर्ण कराव्यात. अनेकदा या प्राधान्यक्रमाचे पालन महिलांना आपल्या व्यावसायिक जीवनाला तिलांजली देऊन करावे लागते.

समाजात शतकानुशतके रुजलेला रुढीवाद असे सांगतो की, पुरुषाने पैसा कमवायचा असतो आणि महिलांनी घराची जबाबदारी सांभाळायची असते. तिने सर्वांची देखभाल करायची असते. ओईसीडीच्या अहवालानुसार हा रुढीवाद मानवी प्रगतीच्या सर्व दाव्यांना ठेंगा दाखवून आजही वास्तवात दिसून येतो. परंतु हे योग्य आहे का? निम्म्या लोकसंख्येची प्रतिभा, ऊर्जा आणि महत्त्वाकांक्षा केवळ एकाच कारणासाठी नाकारल्या जातात ते म्हणजे आर्थिक संसाधनांवर आपले अधिपत्य आहे असे पुरुष मानतात. परंतु ही मानवाधिकारांची सरळसरळ अवहेलनाच ठरत नाही का? परंतु प्रश्न आजही हाच निर्माण होतो की, विकसित देशांपासून विकसनशील देशांपर्यंत सर्वत्र आजही घरगुती कामाची जबाबदारी महिलांची आहे, असा समज घट्ट रुजून का बसला आहे?

‘जर्नल ऑफ सोशिओलॉजिकल सायन्स’मध्ये प्रकाशित एका राष्ट्रीय सर्वेक्षणावर आधारित ‘मॉनिटरिंग द फ्युचर’ या शोधनिबंधात 1976पासून 2014 या प्रदीर्घ कालखंडाचा आढावा घेतला आहे. या अध्ययनात संशोधन अवधीदरम्यान दरवर्षी बारावी इयत्तेत शिकणाऱया मुलांना असा प्रश्न विचारण्यात आला की, जेव्हा तुम्ही विवाहित व्हाल आणि तुमचा मुलगा प्राथमिक शाळेत जाऊ लागेल तेव्हा घरातील आणि बाहेरील जबाबदाऱयांची विभागणी तुम्ही कशी कराल? अधिकांश मुलांनी असे उत्तर दिले होते की, ‘‘पुरुष ऑफिसमध्ये काम करेल आणि स्त्राr घरात राहून मुलांचे संगोपन तसेच अन्य घरगुती कामे करेल.’’ एवढेच नव्हे तर कौटुंबिक जबाबदाऱया पार पाडण्यासाठी पुरुषाने घरी राहण्याची कल्पनाही कुणाला सहजासहजी पचली नाही. अशाच प्रकारचे एक अध्ययन 1983 ते 2014 या कालावधीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले. ‘द टाइम दे आर चेंजिंग ऑर आर दे नॉट? अ कम्पॅरिजन ऑफ जेंडर स्टीरिओटाइप 1983 टू 2014’ या नावाने प्रकाशित झालेल्या या शोधनिबंधात असे दिसून आले की, युवा पिढी पुरुष आणि स्त्रियांच्या समाजातील भूमिकेसंबंधी अजूनही रुढीवादी आहे. ही परिस्थिती विकसित देशांची असेल तर विकसनशील देशांमध्ये काय स्थिती असेल, याची कल्पना सहज करता येऊ शकते.

दोन्ही अध्ययनांमधून असे स्पष्ट झाले आहे की, जगभरात महिलांचे अस्तित्व, अधिकार आणि निर्णय घेण्याची त्यांची क्षमता नाकारण्याचीच पद्धत रूढ आहे आणि हे सर्वकाही कुटुंब आणि संस्कृती किंवा मूल्यांचे रक्षण करण्याच्या नावाखाली केले जाते. अशा स्थितीत प्रश्न असा की, हीच परिस्थिती यापुढेही कायम राहणार का? जर असे झाले तर लैंगिक समानता हे एक दिवास्वप्नच ठरेल. त्यामुळे या विषयावर गांभीर्याने विचार केला जाणे गरजेचे झाले आहे. कारण जर कोणत्याही व्यक्तीच्या, वर्गाच्या किंवा समुदायाच्या हिताची सातत्याने उपेक्षा झाली तर भविष्यात त्याचे परिणाम समाजासाठी अहितकारक ठरतील. पुरुषानेच कामावर जावे आणि महिलेने घराची देखभाल करावी हा विचार पीडादायक आहे. कारण या विचारांद्वारे महिलांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला जातो. लैंगिक श्रमविभागणीचा संबंध हा पालनपोषणाच्या रुढीगत पद्धतींशी जोडलेला आहे. या ठिकाणी मुलींचा संबंध घरगुती कामकाजाशी आहे, असे मानले जाते. त्यामुळे जर समाजात बदल घडवून आणायचा असेल तर मुलीला वेतनाशी संबंधित कामाशी संलग्न व्हावे लागेल. एवढेच नव्हे तर मुलांनी वेतनाशी संबंधित नसलेल्या म्हणजे घरगुती कामांची जबाबदारी उचलणेही गरजेचे असून तसे त्यांना शिकविले गेले पाहिजे.

  •  ‘गुड गाईज ः हाऊ मेन कॅन बी बेटर फॉर विमेन इन द वर्क प्लेस’ या पुस्तकाचे लेखक स्मिथ आणि जॉनसन म्हणतात की, कामाच्या ठिकाणी लैंगिक समानतेची सुरुवात पुरुषांनी घरात समान जबाबदारी उचलण्यापासूनच होऊ शकेल. स्मिथ आणि जॉनसन यांच्या संशोधनपर पुस्तकात म्हटले आहे की, जिथे पुरुषांनी रुढीवादी लैंगिक विचार आणि तथाकथित पुरुषी कामांशी स्वतःला जोडून घेतले नाही आणि उदारवादी विचारधारा स्वीकारली त्या ठिकाणी 96 टक्के महिलांना लैंगिक समानतेचा वास्तविक अनुभव आला. पुरुष जोपर्यंत आपल्या पुरुषी भूमिकेतून बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत लैंगिक समानता प्रस्थापित होणार नाही, हेही वास्तव आहे. अनेकांना सर्वसाधारण वाटणारी ही गोष्ट येणाऱया काळात किती घातक ठरू शकते याचे उदाहरण दक्षिण कोरियातील महिलांच्या ‘4-नो’ भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. ‘4-नो’चा अर्थ असा की, नो डेटिंग, नो सेक्स, नो मॅरेज अँड नो चिल्ड्रेन. दक्षिण कोरियात विवाहाचा दर सातत्याने कमी होत चालला आहे. कारण एका संभाव्य पत्नीच्या रूपात स्त्राr ही पती आणि सासरच्या मंडळींची देखभाल करण्यास सक्षम आहे की नाही, यालाच सर्वाधिक महत्त्व असते. कठोर पितृसत्ताक निकषांमध्ये महिलांची प्रतिभा, शिक्षण आणि त्यांचे स्वावलंबन यांचा स्वीकार करण्यात येत नाही. त्यामुळेच केवळ दक्षिण कोरियाच नव्हे तर चीनमध्येही लग्न आणि मुले जन्माला घालण्याच्या परंपरागत भूमिका मुली धुडकावून लावत आहेत. ‘विबो’ या चीनच्या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर याविषयी बरेच काही वाचावयास मिळते. जर पितृसत्ताक व्यवस्था आपल्या ‘मेलबॉक्स’मधून बाहेर आली नाही, तर दक्षिण कोरिया आणि चीनमधील सामाजिक बदलांचे पडसाद अन्य देशांमध्येही उमटल्यावाचून राहणार नाहीत, हे निश्चित आहे.

(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)