मुद्दा – पॉल व्होल्कर यांची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीमा खंडागळे

कोरोनामुळे सध्या सर्व जग हे प्रचंड महागाईच्या प्रश्नाला समोर जात आहे. हिंदुस्थानात महागाईने गेल्या बारा वर्षांचा उच्चांक गाठला आहे, तर अमेरिकेत महागाईने 40 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. जगात 2003 पासून महागाई वाढत होती, पण या महागाईमुळे मालमत्ता व शेअर यांच्या मूल्यात वाढ झाली होती, पण आता महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. अनेक आर्थिक तज्ञांनुसार जग हे अमेरिकेत 1979ते 1983 च्या दरम्यान निर्माण झालेल्या ‘स्टॅगफ्लेशन’ या आर्थिक संकटाला सामोरे जाणार आहे.

स्टॅगफ्लेशन म्हणजे प्रचंड दराने वाढत जाणारी महागाई व कमी आर्थिक विकास दर होय. या आर्थिक प्रश्नाला तोंड देण्यासाठी 1979 वर्षी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी पॉल व्होल्कर यांची नेमणूक अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हवर केली होती. पॉल व्होल्कर यांनी जेव्हा आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली त्या वेळेस अमेरिकेतील महागाई ही सुमारे दहा टक्क्यांच्या वरती गेली होती. या महागाईला तोंड देण्यासाठी पॉल व्होल्कर यांनी कठोर निर्णय घेतले. यामध्ये घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे त्यांनी ठरवले की, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह ही व्याजदर नियंत्रित करून पैशाच्या किमतीवर नव्हे तर त्याच्या पुरवठय़ावर नियंत्रण करेल, तर पैशाचा व्याजदर हा बाजारपेठ ठरवेल. पुढे पॉल व्होल्कर यांनी व्याजदर वाढवत तो 21 टक्के एवढा वाढवला. अमेरिकेत घर व कार यांची विक्री थंडावली. शेतकऱ्यांनी मालाला उठाव नसल्याने मोठय़ा प्रमाणात प्रदर्शन केली. तरीही पॉल व्होल्कर यांनी आपली कडक आर्थिक धोरणे कायम ठेवली. या काळात पॉल व्होल्कर यांच्या धोरणांमुळे अमेरिकन राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांना अमेरिकन जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. तरीही राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी पॉल व्होल्कर यांच्या धोरणांना पाठिंबा दर्शवला. सुमारे तीन वर्षांनंतर पॉल व्होल्कर यांच्या आर्थिक धोरणाला फळ मिळाले. साल 1983 पर्यंत पॉल व्होल्कर यांच्या आर्थिक धोरणामुळे अमेरिकेतील महागाईचा दर हा चार टक्क्यांवर आला होता.

आर्थिक शिस्तीचे धडे हे पॉल व्होल्कर यांना लहानपणापासून आपल्या वडिलांकडून मिळाले होते. त्यांचे वडील हे 1929 च्या आर्थिक मंदीच्या काळात न्यू जर्सीजवळील ‘टिनेक’ नामक एका छोटय़ा शहरातील कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आर्थिक मंदीच्या काळातही त्यांनी आपल्या कडक आर्थिक धोरणांमुळे ‘टिनेक’या नगरपालिकेची आर्थिक बाजू उत्तम संभाळली होती.

जोडीला पॉल व्होल्कर यांची आर्थिक दूरदृष्टी खूप चांगली होती. त्यांनी 1980 मध्ये अमेरिकेत असणारा ग्लास स्टीगल ऍक्ट हा कायदा मागे घेण्यासाठी विरोध दर्शविला होता. ग्लास-स्टीगल कायद्याने व्यावसायिक बँकिंगला (कमर्शियल बँकिंग) व गुंतवणूक बँकिंग (इन्व्हेस्टमेंट बँकिंग) पासून प्रभावीपणे वेगळे ठेवले होते. यामुळे बँका गुंतवणूकदारांचे पैसे हे शेअर बाजारसारख्या घटकांमध्ये गुंतवणूक करू शकत नव्हत्या, पण पुढे 90 च्या दशकात हा कायदा मागे घेण्यात आला. यामुळे 2008 च्या जागतिक महामंदीचा पाया रोवला गेला. 2008 च्या जागतिक महामंदीनंतर बँकिंग क्षेत्रावर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आर्थिक पुनर्प्राप्ती सल्लागार मंडळाची स्थापना केली. यामध्ये पॉल व्होल्कर यांनी बँकिंग क्षेत्रासाठी काही नियम सुचवले होते. हे नियम या मंडळाने स्वीकारले. तसेच या नियमांना ‘व्होल्कर रुल’ असे नावही दिले. या नियमांमुळेच 2010 ते आतापर्यत तरी बँकिंग क्षेत्रात कोणतीही मोठी समस्या निर्माण झाली नाही. व्होलकर यांचे 8 डिसेंबर 2019 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

सध्याचा आर्थिक काळ 1970, 1980 पेक्षाही अधिक वेगळा आहे. 1970, 1980 च्या दशकामध्ये जागतिकीकरण हे मोठय़ा प्रमाणावर झाले नव्हते. तसेच गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये जगातील खास करून पश्चिम जगातील देशात व्याजदर कृत्रिमरीत्या खूप कमी ठेवण्यात आले आहेत. तसेच जगातील अनेक देशांनी कल्याणकारी योजनांच्या नावाखाली खूप मोठय़ा प्रमाणावर चलनाची छपाई केली आहे. शिवाय कोरोना महामारी व सध्या चालू असलेले रशिया व युक्रेन यांच्यामधील युद्धामुळे अनेक मोठे आर्थिक प्रश्न जगासमोर निर्माण केले आहेत. यासाठीच जगाला या आर्थिक प्रश्नातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला पॉल व्होल्करसारख्या अर्थतज्ञाची गरज आहे. कारण त्यांनी लोकप्रिय आर्थिक धोरणांच्या ऐवजी दीर्घकालीन लोकहिताच्या धोरणांना प्राधान्य दिले, भले त्यांना यासाठी कितीही रोषाला सामोरे जावे लागले असेल तरी.

(लेखिका जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत.)
[email protected]