लेख – जागतिक शांततेसाठी!

>> दिलीप जोशी

सोमवारी 21 सप्टेंबरला जागतिक शांतता दिवस साजरा झाला. माणसाच्या इतिहासात आजवर जी अनेक युद्धं झाली त्यापैकी विसाव्या शतकातील दोन महायुद्धांनी तर कहर केला. अवघं जग काही पाश्चात्य आणि पौर्वात्य राष्ट्रांच्या संघर्षाच्या सपाटय़ात सापडलं. अणुबॉम्बचा वापर 1945 मध्ये झाल्यानंतर युद्धाच्या कथा ‘रम्य’ असतात हा समज विरला आणि या घटना किती ‘दाहक’ असतात याचा प्रत्यक्ष अनुभव जपानने घेतल्यावर उद्या आपल्यावर अशी वेळ आली तर… या कल्पनेनेच जग थरारलं.

अर्थात तरीही आंतरराष्ट्रीय संघर्ष थांबले नाहीत. न्याय्य हक्कासाठीचे स्वातंत्र्यलढे वेगळे आणि केवळ विस्तारवादी आक्रमणखोरी निराळी. अशा अकारण आक्रमकतेचं विदारक दर्शन जगाच्या सर्व भागांत घडलं. कधी अमेरिकेने व्हिएतनाम युद्ध छेडलं, कधी रशियाने अफगाणिस्तानात फौजा घुसवल्या, तर कधी इराकने कुवेत गिळंकृत करायचा प्रयत्न केला आणि कालांतराने अमेरिका इराकमध्ये उतरली. 1962 मध्ये कपटी चीनच्या आक्रमक विस्तारवादाचा फटका हिंदुस्थानलाही बसला आणि मागचाच कित्ता गिरवत चीन आजही शांततेची पोकळ भाषा करीत आपल्या सीमांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करताना दिसत आहे.

शांततामय सहजीवन हा मानवी जीवनाचा मूलाधार असायला हवा या विचारातून हिंदुस्थानातील अनेक तत्त्वज्ञांनी प्राचीन काळापासून आपले विचार मांडले आहेत. गौतम बुद्धांपासून ते महात्मा गांधींपर्यंत अनेकांनी सत्य, अहिंसा या तत्त्वांचा प्रसार जगभर करण्याचा प्रयत्न केला. जगात ज्या काळात सामाजिक, राजकीय स्थैर्य आणि शांतता नांदली त्यावेळी अनेक संस्कतींचा विकास होऊन नवनवे वैज्ञानिक शोध लागले. कलाकृती निर्माण झाल्या. आपल्याकडे अजिंठा-वेरूळसारख्या अप्रतिम कलाकृती निर्माण होण्याइतका शेकडो वर्षांचा स्थैर्याचा काळ लाभला असणार म्हणूनच कैलास लेण्यासारखं अपूर्व लेणं आकाराला आलं. जगातही अनेक ठिकाणी अशी उदाहरणं सापडतील. प्रजाहितदक्ष आणि सामर्थ्यवान राज्यकर्ते असण्याच्या काळात जगात माणसाच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष दिसून आले.

मात्र त्याचबरोबर जगाने अतिशय यातनामय अशा युद्धांचा काळही अनुभवलाय. ‘आय फॉर आय’ अशा वृत्तीने सारेच वागले तर जगाच्या डोळय़ांपुढे अंधकार पसरेल असं चार सुज्ञांनी सांगितलं तरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्यांनी जुलमी राजवटी लादल्या. अगदी विसाव्या शतकातही शांततावादी नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेत कठोर बंदिवासात राहावं लागलं. अखेर त्यांची जिद्द जिंकली. सुबुद्ध जगाने त्यांना पाठिंबा दिला आणि गोरे हुकूमशहा नमले.

दोन महायुद्धांच्या उत्पातानंतर आइन्स्टाइनसारख्या वैज्ञानिकानीही जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले. 1981 पासून काही संस्थांनी जागतिक शांतता दिवस पाळण्याचं ठरवलं. युनोमध्येही त्याची चर्चा झाली. कालांतराने ‘युनो’ने ठराव करून 21 सप्टेंबर हा जागतिक शांततेचा दिवस घोषित केला. मग दरवर्षी वेगवेगळय़ा बोधवाक्यासह त्याचा प्रसार सुरू झाला. 2010 मध्ये तरुणांना उद्देशून असलेल्या बोधवाक्याची रचना ‘शांतता भविष्य हे गणित सोपं आहे’ असं बोधवाक्य आलं. 2016 मध्ये ‘सर्वांना शांततेचा अधिकार आहे’ यावर भर दिला गेला. ढासळत्या पर्यावरणाचा विचार करून शांततेसाठी पर्यावरण संवर्धन अशी थीम आली. या वर्षीचं बोधवाक्य ‘एकत्रितपणे शांतता साकार करूया’ असं आहे. माणसांच्या जगाचं एक विसंवादी चित्र आरंभापासूनच तयार झालंय. एका बाजूला आर्थिक, सामाजिक दरी, राजकीय अस्थिरता, युद्धखोरी, सत्तालालसा आणि त्यातच उद्भवणाऱया नैसर्गिक आपत्ती यांच्याशी माणसाची झुंज अव्याहत सुरू आहे, तर दुसरीकडे कमालीची वैज्ञानिक प्रगती, सहज संपर्काच्या साधनांचा वापर, विश्वाचं आकलन होण्याइतका झालेली वैज्ञानिक प्रगती आणि चंद्र-मंगळाकडे वसाहतीसाठी लागलेली नजर आणि वैज्ञानिकतेबरोबरच कलासाधनेतील मनोहारी अविष्कार असं सारं मानवी जगात घडलं आहे.

तरीही ‘डूम्स डे’ (विनाशकारी) दाखवणाऱया घडय़ाळात जगाचे ‘बारा’ वाजायला थोडय़ाच मिनिटांचा अवधी आहे. जपानने 1954 मध्ये संयुक्त राष्ट्रांना दिलेली ‘शांती घंटा’अ ही हेच सांगत आहे. भाई सावध व्हा! ‘सर्वेः सुखिनः सन्तु’ या उक्तीचा माणसाच्या जगाला प्रत्यय कधी येणार? ठाऊक नाही.

आपली प्रतिक्रिया द्या