समाधानाचे क्षण!

>> दिलीप जोशी

आपल्या आयुष्यातले काही क्षण अचानक अतीव समाधान देऊन जातात. पत्रकारितेच्या क्षेत्रात पंचेचाळीस वर्षे वावरत असताना अनेक मोठी व्यक्तिमत्त्वं जवळून पाहायला मिळाली. कलाक्षेत्रातील दिग्गजांना भेटता आलं. पुष्कळ मुलाखती घेतल्या. त्यापैकी अनेक ध्वनिमुद्रितही झाल्या, परंतु काही कर्तृत्ववान मंडळी कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय अचानक भेटली ते क्षण विलक्षण होते.

एक उदाहरण सांगायचं तर लोणार सरोवराचं चित्रण करण्यासाठी नव्वदच्या दशकात गेलो असताना परिसर फिरून गेस्ट हाऊसकडे परतीच्या प्रवासात आम्ही गाण्याच्या भेंडय़ा सुरू केल्या. त्यावेळी मला मराठीतलं बहुधा पहिलं ध्वनिमुद्रित झालेलं कवी ना. घ. देशपांडे यांचं ‘रानारानात गेली बाई शीळ’ हे गाणं आठवलं. ते ऐकताच तिथले बुगदाणे गुरुजी म्हणाले, ‘‘अहो, ना.घ. इथेच मेहकरला राहतात.’’ मी विचारलं, ‘‘जाता येईल त्यांच्याकडे?’’ आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही सात-आठ जण अनाहूतपणे नाघंच्या दारी पोचलो. गुरुजींना म्हटलं, त्यांना वेळ आहे का विचारा, मगच जाऊ. पाच मिनिटांत ना.घ. स्वतःच घराच्या दारात आले आणि वैदर्भी पद्धतीने त्यांनी आमचं दिलखुलास स्वागत केलं. योगायोगाने आमच्याकडे व्हिडीओ कॅसेटचा स्टॉक होता. रवी कदमने पंचेचाळीस मिनिटांची मुलाखत चित्रीत केली.

…असं नंतर अनेकदा घडलं. ‘अवचित भेट घडे’ असा हा प्रकार. अर्थात प्रत्येक वेळी रेकॉर्डिंग किंवा फोटो घेणं त्या काळात शक्यच नव्हतं. नाहीतर मुंबईत आलेल्या आर्मस्ट्राँगचाही फोटो ‘मोबाईल’वर घेता आला असता. हिंदुस्थानचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमात भेटला. तिथे जायला मला संपादकांनी अगदी आयत्या वेळी सांगितलं होतं.

पुढे पत्रकारितेबरोबरच वैज्ञानिक क्षेत्रात, तेसुद्धा खगोल मंडळांसारख्या संस्थेत सक्रिय काम करताना अनेक देशीविदेशी शास्त्र्ाज्ञांना ऐकण्याचा, भेटण्याचा योग आला. या क्षेत्रात आल्यावर खगोलभौतिकी आणि गणित या विषयांशी अपरिचित असलेल्या माझ्यासारख्या कला शाखेच्या विद्यार्थ्यालाही रस वाटू लागला. त्या विषयाचा थोडा अभ्यास करून व्याख्यानं ऐकण्याचा परिपाठ ठेवला. त्यातलं काही कळलं, काही इतरांकडून समजून घ्यावं लागलं, पण एका वेगळय़ा विषयाचं ज्ञान थोडं थोडं जमा होत राहिलं. हिंदुस्थानातले आपले डॉ. नारळीकर, डॉ. चित्रे आणि रेडिओ दुर्बिणीचे प्रवर्तक गोविंद स्वरूप यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. समकालीन विदेशी शास्त्र्ाज्ञांचीही माहिती होत गेली.

1997 मध्ये डिसेंबर महिन्यात मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये जगप्रसिद्ध खगोल आणि गणितज्ञ प्रा. रॉजर पेनरोज यांचं व्याख्यान असल्याचं समजल्यावर आम्ही अनेक जण वेळेआधीच तिथे पोहोचलो. रवी वाघमारे व्हिडीओ कॅमेरा घेऊन आला होता. पेनरोज यांना भेटण्याची शक्यता कमीच होती, पण कार्यक्रमाआधी ते लाऊंजमध्ये निवांत बसलेले दिसले. माझ्यातला पत्रकार जागा झाला. रवीसह आम्ही त्यांना भेटलो. चटकन् उभं राहत त्यांनी हस्तांदोलन केलं आणि मी त्यांना आमच्या खगोल संस्थेची माहिती दिली. स्थानिक मराठी भाषेतून आम्ही या शास्त्र्ााचा प्रसार करतो असं सांगून आमच्याकडे असलेला ‘खगोल वार्ता’चा अंकही दाखवला. माझ्या सहकाऱयांची ओळख करून दिली. त्यांनी आमचं कौतुक केलं. हे सारं चित्रबद्ध होत होतं.

हे सारं आज इतक्या वर्षांनी आठवलं, कारण कृष्णविवराच्या संशोधनासाठी रॉजर पेनरोज यांना गेल्या 5 ऑक्टोबरला प्रतिष्ठsचा ‘नोबेल’ सन्मान लाभला. यावेळी एकूण तिघांना तो लाभला आहे. ब्रिटनच्या पेनरोज यांच्यासह जर्मनीचे रेनहार्ड गेझेल आणि अमेरिकेच्या आंद्रेया गेझ यांना यंदाचं भौतिकशास्त्र्ााचं नोबेल प्राप्त झालंय.

हिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते चंद्रशेखर सुब्रमण्यम इथे आले होते तेव्हा त्यांना भेटता आलं नव्हतं. आता नोबेल मिळालेल्यांपैकी पेनरोज यांना भेटता आलं होतं याचा आनंद वाटतो. पेनरोज यांचे सहकारी स्टीफन हॉकिंग यांनी व्हीलचेअरवरून दिलेलं व्याख्यान सन दोन हजारमध्ये मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात ऐकलं तेव्हा सारं सभागृह स्तिमित झालं होतं. ही सारी विश्वाचा धांडोळा घेणारी श्रेष्ठ मंडळी. पेनरोज यांच्या संशोधनावर अभ्यासक मंडळी साकल्याने लिहू शकतील, पण आम्हा अनेकांना त्यांच्या भेटीने एक ऊर्जा दिली एवढं नक्की.

लेखासोबतच्या चित्रातील पेनरोज यांच्या कल्पनेतला ‘जिना’ पहा. पायऱया चढत गेलात तर वर जात राहाल आणि उतरत गेलात तर उतरतच राहाल!

आपली प्रतिक्रिया द्या