मुद्दा – हतबल पेन्शनधारक

1456

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक आता नाइलाजास्तव आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले असून नुकतेच 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी वाढीव पेन्शनसंदर्भात मुंबई, ठाणे येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेली अनेक वर्षे वाढीव पेन्शनसंदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्तांना सादर करून 5 डिसेंबर रोजी दिल्ली येथे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 1995 Employees Family  Pension या संदर्भात आजवर अनेक स्तरावर लढा दिला गेला, वर्तमानपत्रांतून लेखसुद्धा लिहिले गेले. मा. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ‘कोशियार कमिटीचा अहवाल’ व महागाई लक्षात घेता पेन्शनमध्ये वाढ करावी असे सुचवले इतकेच नाही तर याबाबत लोकसभेतसुद्धा हा प्रश्न वारंवार मांडला गेला असतानासुद्धा आजतागायत वाढ झालेली नाही. त्यामुळे उतारवयात निवृत्तधारकांना रस्त्यावर उतरावे लागते यासारखे दुर्भाग्य नाही. आज मिळणारे तुटपंजे पेन्शन रु. 500 ते 900 यामध्ये साधा औषधाचा खर्चसुद्धा भागत नाही. आजवर सर्व राजकीय पक्षांनी केवळ घोषणा आणि आश्वासने दिली, पण कोणीही पाठपुरावा केला नाही. आज सर्व क्षेत्रांतील निवृत्ती व्यक्तींना पेन्शन आणि त्यात होणारी वाढ कोणतेही आंदोलन न करता मिळत आहे. मग 1995 निवृत्ती वेतनधारकांवर अन्याय का? ही योजना त्याचे कोष्ठक त्याचे तपशीलवार लेख या आधीच प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार मिळणार पेन्शन अगदी नगण्य आहे. याबाबत केंद्र सरकारला काहीच कसे नाही वाटत! निवृत्तीनंतरच्या भविष्याच्या तरतुदीसाठी प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणूक या दृष्टिकोनातून विचार करून बँकांच्या मुदत ठेवी, पोस्ट ऑफिस आणि मिळणार पेन्शन यावर आपले आयुष्य व्यथित करत असतो. पण नगण्य पेन्शन, सातत्याने मुदत ठेवीवरील कमी होणारे व्याजदर आणि वाढती महागाई लक्षात घेता सांगा जगायचे कसे.? परदेशात निवृत्ती व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांना योग्य तो मानसन्मान त्याच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन नियोजन केले जात असते आणि आपल्या देशात उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा उभारावा लागतो. यासारखी दुसरी शोकांतिका नाही. निवृत्तीधारकांच्या रास्त मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार हे नक्की.

आपली प्रतिक्रिया द्या