मन में है विश्वास

681

>> मेधा पालकर

स्वत:च्या निर्णयाबद्दल ‘मन में है विश्वास’ ही भावना असली की अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही घडवून आणता येतात हे अक्षयने स्वत:च्याच उदाहरणातून सिद्ध केलं आहे. ही ऊर्जा अशीच राहावी असेही तो आवर्जून सांगतो.

उत्साह, प्रचंड सकारात्मकता आणि खंबीरपणा म्हणजे फोटोग्राफर अक्षय परांजपे. फोटोग्राफीचं कोणत्याही पद्धतीचं फॉर्मल शिक्षण न घेता तो ती शिकला. रत्नागिरी ते पुणे असा प्रवास करून पुण्यात स्वत:चे एक स्थान त्याने निर्माण केले. दिवसाचे सोळा तास काम करणारा आणि मराठी सेलिब्रिटींचा लाडका फोटोग्राफर म्हणून अक्षय याची ओळख आहे. तीन वर्षांचा असताना अक्षयला ताप येऊन कानाच्या शिरांवर परिणाम झाला आणि ऐकू येणं बंद झालं. मग तो लिप-रिडिंग शिकला. पहिली ते चौथी कानाला मशीन न लावता त्याने शिक्षण घेतले. त्या काळात शिक्षकांनी खूप सांभाळून घेतलं आणि मदतही केली. पाचवीपासून कानाला कर्णयंत्र लागले. दहावीच्या सहामाहीपर्यंत सगळं मस्त चाललं होतं. सहामाहीनंतर तो आजारी पडला आणि थेट चार वर्षं बेडवर काढली. पुढे त्याला थोड्याफार मूव्हमेंट्स करता यायला लागल्यानंतर मात्र दहावीची परीक्षा द्यायचा त्याचा हट्ट होता. हा हट्ट बाबांनीही पुरवला आणि त्याने जीवतोड मेहनतही घेतली. 2014 साली दहावीची परीक्षा दिली. बारावीची परीक्षा त्याने त्याच्याच शाळेतून, पण बाहेरून दिली. या काळात त्याला शिक्षकांनी चांगला सपोर्ट केला आणि मदतही केली.

अक्षयने कॅमेरा पहिल्यांदा हातात घेतला तोदेखील अवचित. वास्तविक त्याला कोणतंही ट्रेनिंग किंवा शिक्षण नव्हतं. स्वत: प्रयत्न करत त्याने कॅमेऱ्यावर हात बसवला. मुळात ‘मी कॅमेरा का हातात घेतला हे मलाच माहीत नाही. फोटोग्राफीच का निवडली याला काही लॉजिक नाही, कारण नाही. पण मी कॅमेरा मागितला आणि मला आजोबांनी आणून दिला, अगदी कोणताही प्रश्न न विचारता की कोणतीही शंका न घेता,’ असे अक्षय स्वत:च सांगतो. पुढे स्वत:च्या प्रयत्नांनी तो फोटोग्राफी शिकत गेला, हात स्थिर ठेवत गेला. कॉलेजमधल्या इव्हेंट्सचे फोटो त्याने काढायला सुरुवात केली. अक्षयचे कॉलेजमधले मित्र त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याच्यासोबत होते. त्याला फोटोग्राफीच्या सुरुवातीच्या संधी मिळवून देण्यापर्यंत मित्रांनी त्याला सर्वतोपरी साथ दिली.

akshay-prajanjape-2

अर्थात फोटोग्राफी हे प्रोफेशन म्हणून करायचं हा निर्णय अक्षयसाठी तेवढा सोपा नव्हता. अनिश्चिततेची टांगती तलवार कायमच या क्षेत्रावर असते. आज काम आहे याचा अर्थ उद्या असेलच अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे हे पूर्णवेळ प्रोफेशन म्हणून निवडताना त्याने बारावीनंतरचे शिक्षण थांबविले नाही. एम.आय.टी.मधून फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा केला आणि सोबतच इतिहास विषयात ग्रॅज्युएशनही केले. व्यावसायिक फोटोग्राफी करण्याचे एकदा पक्के झाल्यानंतर मात्र अक्षयने त्याचाच ध्यास घेतला. कामं शोधून, मेहनत करून स्वत:ला सिद्ध करण्याची त्याची धडपड हळूहळू फलद्रूप व्हायला लागली. पुण्यात आल्यावर दोन चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचं काम त्याने समर्थपणे पेललं आणि त्याच्या करीअरच्या वाटा विस्तृत झाल्या. ‘बायबाय बायको’, ‘हॅम्लेट’, ‘आमच्या हिचं प्रकरण’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ अशा सुमारे 12 नाटकांचे फोटो अक्षयने प्रयोगादरम्यान काढले आहेत आणि ते सोशल मीडिया पब्लिसिटीसाठी वापरण्यात आले आहेत. पुण्यात यायचं निश्चित झाल्यावर घरच्या सगळ्यांनीच त्याला प्रचंड सपोर्ट केला. `आपलं मूल सामान्य मुलांसारखं नाही हे लक्षात आल्यावरही पालकांनी मला कधीही एकटं पडू दिलं नाही, माझा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही किंवा मला कधीच कमी लेखलं नाही. हा काय मोठे करीअर करणार आहे असा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही,’ असे जेव्हा अक्षय सांगतो तेव्हा त्याच्या पालकांना दाद द्यावीशी वाटते. मुळात पुण्याला त्याला एकटं ठेवणं त्यांनाही कठीणच होतं. मात्र तसं कधी त्यांनी मला जाणवू दिलं नाही की बोलून दाखवलं नाही. उलट त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्याचे आई-बाबा, आजी-आजोबा, बहीण या सगळ्यांमुळेच तो व्यावसायिक फोटोग्राफीत त्याचे स्वत:चे एक स्थान निर्माण करू शकला आहे. सध्या अक्षय मराठी सेलिब्रिटींच्या गळ्यातला ताईत आहे. स्वत:च्या निर्णयाबद्दल ‘मन में है विश्वास’ ही भावना असली की अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही घडवून आणता येतात हे अक्षयने स्वत:च्याच उदाहरणातून सिद्ध केलं आहे. त्याने आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींचे फोटो काढले आहेत. फोटो काढणे, त्याचे एडिटिंग, फोटो प्रिंटला देईपर्यंत सर्व कामं अक्षय स्वत: करतो. त्याला प्रचंड आवड असल्यामुळे कधी थकवा येत नाही. ही ऊर्जा अशीच राहावी यासाठी आपण फोटोग्राफी करत राहणार असेही तो आवर्जून सांगतो. र्

आपली प्रतिक्रिया द्या