नाद-मराठी – तू जो मेरे सूर मे…

>> अरुण जोशी

आपल्या  मराठमोळय़ा अमोल पालेकरचा ‘छोटी सी बात’ सिनेमा आठवत असेलच. हिंदी पडद्यावर सीधासाधा ‘हीरो’ म्हणून रुजलेला अमोल प्रेक्षकांना खूप आवडला. त्याच्या चित्रपटांतून ‘बॉय नेक्स्ट डोअर’ हीरो असावा असं रसिकांना वाटलं. तसा हिंदी चित्रपटांच्या प्रत्येक टप्प्यावरच्या आरंभाचा इतिहास मराठी ‘हीरो’चा. म्हणजे ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटाचा नायक मराठी आणि हिंदीतल्या पहिल्या ‘आलमआरा’ या चित्रपटाचे नायक मास्टर विठ्ठल हेसुद्धा मराठी… पण पुढच्या काळात मराठी नायिकांनी हिंदी पडदा जेवढा गाजवला तेवढं यश नायकांच्या वाटय़ाला आलं नाही. अपवाद अमोल पालेकर यांचा.

…अमोल पालेकरांच्या हिंदीतल्या पदार्पणाच्या वेळेस एक चुतरस्र गायकही रसिकांच्या मनात रुजला. त्याचं नाव येशूदास. आज ‘नाद-मराठी’त त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ.

केट्टासरी जोसेफ येशूदास यांचा जन्म केरळमधल्या कोची येथे 10 जानेवारी 1940 रोजी झाला. कुंजन वेळू यांच्याकडे गायनाचं शिक्षण घेतलेल्या या गोड गळय़ाच्या मुलाला अल्पावधीतच लोकप्रियता लाभली. मल्याळम आणि दक्षिणी चित्रपटांत पार्श्वगायन करता करता हिंदीमध्ये ‘जय जवान जय किसान’ चित्रपटासाठी (1971) गाण्याची संधी मिळाल्यावर त्यांच्या कारकीर्दीचा नवा अध्याय सुरू झाला. ‘दिलरुबा क्या हुआ, मुझे ये बता…’ हे त्यांचं गाणं क्वचितच कोणाला चटकन आठवेल, पण ‘छोटी सी बात’मधलं ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन’ हे त्यांनी लता आणि आशा या दोन दिग्गज गायिकांसह गायिलेलं गाणं नक्की लक्षात असेल. इथेच अमोल पालेकरचा ‘आवाज’ म्हणजे येशूदास असं रसिकमान्य झालं. तसा ‘घरौंदा’मध्ये अमोलसाठी भूपेंद्रचा स्वरही आहेच, पण ‘चितचोर’मधली ‘जब दीप जले आना’, ‘तू जो मेरे सूर मे, सूर मिला दे’ किंवा ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’ ही गाणी वाजताच आपण गुणगुणायला लागतो तो स्वर येशूदास यांचा. याशिवाय त्यांची इतरही अनेक  ‘का करू सजनी आये न बालम’, ‘आज से पहले आज से ज्यादा’, ‘कहां से आये बदरा,’ ‘सुनय S S ना’ अशी कितीतरी गाजलेली गाणी. ‘सदमा’ चित्रपटातली कमल हसन आणि श्रीदेवी यांचा उत्तम अभिनय  असलेली ‘सूरमयी अखियों मे नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे’ ही कदाचित पुरुषी भावस्पर्शी आवाजातली, गाजलेली एकमेव लोरी किंवा ‘अंगाई गीत’ असेल.

विस्तृत गान कारकीर्दीत येशूदास यांना अनेक मानसन्मान लाभले. आठवेळा उत्तम पुरुष गायकाचा सन्मान, पाचवेळा फिल्मफेअर ऍवॉर्ड, सर्व राज्यांमध्ये मिळून त्रेचाळीस वेळा उत्तम गायक म्हणून गौरव आणि 1975 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2017 मध्ये त्यांची गानकारकीर्द ‘पद्मविभूषण’ने सन्मानित झाली. दक्षिणेतल्या या ‘गानगंधर्वा’ने अवीट गोडीची हिंदी गाणी दिली आणि मराठीतही त्यांचा स्वर उमटला.

मुंबई आकाशवाणी केंद्रावर येशूदास यांनी संगीतकार यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचंच एक गीत गायिलं ते असं… ‘शब्दमाला पुरेशा न होती, स्पर्श सारेच सांगून जातो; लोचनाआड जातेस तेव्हा पापणीला तुझा रंग येतो.’

अनुराधा पौंडवाल यांच्यासह ‘वारा आला भेटायला प्रीतीचे गुज सांगायला’ हे ‘नणंद-भावजय’ चित्रपटातलं एक गाणं. या चित्रपटाचं संगीत अशोक पत्की यांचं. त्यांच्याकडे येशूदास यांनी अनेक गाणी गायिली. ‘मायेची साऊली, आनंदी बाहुली, आहे गुणाची…मोठय़ा मनाची, जाई जशी माझी ताई’ हे  ‘नणंद भावजय’ याच चित्रपटातलं गाणंही जरूर ऐका. येशूदास यांचा मराठी स्वर लक्षात राहील.

‘दूर दूर जाऊ या, अंतरात या,

ढगात यासोनपंख लावुनी

उंच उंच स्वैर धावू या

पाखरेच होऊनी

किंवा

वेलीवरी घुमले तरी,

वारा देई हिंदोला, माझ्या आजोळी

मनवीणेला अवचित सूर मिळाला…’

अशा गाण्यांमधून येशूदास यांचा स्वर मराठी रसिकांना परिचित झाला.

येशूदास यांनी अनेक मल्याळी चित्रपटांना संगीत दिलं. त्यांची या क्षेत्रातली कारकीर्द चतुरस्र आहे. तिरुवनंतपुरम (पूर्वीचं त्रिवेंद्रम) येथे त्यांनी ‘तरंगिणी’ स्टुडिओची निर्मिती केली. पुढे ते चेन्नईला गेले. गीत-संगीत क्षेत्रात नित्यनवे प्रयोग करताना त्यांनी अनेक हिंदुस्थानी भाषांमध्ये गाणी म्हटली. आपल्याकडच्याच नव्हे, तर जगभरच्या प्रसिद्ध गायकांचं वैशिष्टय़ हेच की, त्यांची गानप्रतिभा भाषिक मर्यादेत अडकली नाही. शेवटी स्वर, सूर हे वैश्विक आहेत. संगीत पौर्वात्य असो वा पाश्चात्त्य, दक्षिणी असो की उत्तर हिंदुस्थानी, शास्त्रीय असो की चित्रपट गीत, प्रत्येकाचं एक बलस्थान असतं आणि सच्चा सूर गवसलेल्या कुणाही गायक-गायिकेला या सर्व गान प्रांतात सहज संचार करता येतो.

येशूदास त्यापैकीच एक. त्यांची मराठी गाणी तुलनेने मोजकीच, पण आहेत ती श्रवणीय हे महत्त्वाचं. या लेखनाच्या निमित्ताने मराठी भाषिक नसलेल्या गायकांच्या गानवैशिष्टय़ांची थोडीफार ओळख करून देता येते आणि त्यांच्या मराठी ‘नादा’चा परिचय करून देता येतो. आता येशूदास वयाची आठ दशके पार करूनही संगीत क्षेत्रात रमलेले आहेत.