आठवणींच्या आल्बमची कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक समेळ, [email protected]

कविता… आपल्या संपूर्ण जगण्यात कविता आहे. फक्त ती शोधता आली पाहिजे. काहींना ती सहज गवसते…

ते साल 1989. दूरदर्शनवर नुकत्याच मालिका सुरू झाल्या होत्या. प्रत्येक धडपडय़ा कलाकाराला आपणही एखादी मालिका करावी ही मनीषा होती. मी नाटक करणारा माणूस. लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मातासुद्धा. एक दिवस माझा एक विद्यार्थी आला आणि म्हणाला, सर तुम्ही एखादा विषय शोधून काढा.  तो लिहून दूरदर्शनकडून आपण मंजूर करून घेऊ आणि आपणही तेरा भागांची मालिका बनवू. त्या काळी प्रायव्हेट चॅनेल नव्हते. त्यामुळे दूरदर्शनची अटच होती की, मालिका ही तेरा भागांतच संपायला हवी. मी खूप विचार केला. महान कादंबरीकार, नाटककार जयवंत दळवी यांचा मी मित्र होतो. त्यांच्या ‘आल्बम’ कादंबरीवर मालिका करायची ठरवली. दळवीकाकांकडे गेलो. त्यांचा व्यवहार ठरवून ‘आल्बम’ कादंबरीचे हक्क मी घेतले आणि त्याची पटकथा लिहायला बसलो. दिग्दर्शन मीच करणार होतो.

‘आल्बम’ माणसाचा ‘भूतकाळातला आरसा’… कोकणात स्वतःचं वाडावजा घर असलेला ‘बागल’ या टोपणनावाने मुंबईत नोकरी करीत असतो. तरी त्याचं सतत लक्ष असते ते आपल्या कोकणातल्या घराकडे. एकेकाळी त्या घरात गोकुळ नांदायचं. त्याचे दोन भाऊ… मोठय़ा भावाची पत्नी, आई, वडील, आजोबा, आत्या, काका, काकांची मुलं. आत्या तिची मुलं, मावशी तिची मुलं… मग संपूर्ण गावचे वर्णन… कोकणातली हिरवीगार वनश्री, तांबडी माती… तिथला आंबा, नारळ, फणस, कोकम आणि वरून फणसासारखी दिसणारी काटेरी माणसं, आतून गऱयासारखी मधूर कशी असतात याचं प्रत्येक माणसाचं केलेलं व्यक्तिचित्रण अप्रतिम होतं. त्यांची होणारी भांडणे, रुसवे फुगवे, जीव तोडून केलेलं प्रेम सर्वच सामान्य माणसाचं होतं तरी असामान्य होतं. शेवटी माणूस म्हणजे काय याचं प्रचंड वर्णन केलेली कादंबरी म्हणजे ‘पटकथा’ लिहिण्यासाठी मला आव्हान होतं. तेवढेच त्याचे संवाद करणंही कठीण होतं. कारण जयवंत दळवी, कोकणातल्या शिरोडा गावचे. त्यामुळे ते निसर्गाच्या, नारळ, आंबा, फणस, कोकमाच्या जवळ होते. तेवढा मी नव्हतो. पण कादंबरीत त्यांनी माझ्यासाठी अनेक जागा, त्याला आम्ही लेखक ‘Between The Line‘ म्हणतो. त्या सोडल्या होत्या.

हा बागल आता एका सरकारी कचेरीतून निवृत्तीच्या मार्गावर आहे. तेव्हा त्याची इच्छा आहे की, धावणारी मुंबई सोडून आपल्या कोकणात आपला बंद वाडा उघडून त्याची साफसफाई करून राहायचं. तेव्हा तिथे आपल्याला काय काय सामान लागेल असा तो विचार करीत रोज फर्निचरची दुकाने पालथी घालतो. इतर सामान काहीही असलं तरी ओसरीवर त्याला बसायला एक आरामखुर्ची हवीच असते. घरी, आपल्या घरी येऊन आपलं हे स्वप्न जेव्हा आपल्या पत्नीला सांगतो तेव्हा ती चिडून बोलते, ‘मेली मी नाही हो त्या खेडेगावात राहायला येणार, ना पोरंही… तुम्ही जा आणि रहा एकटे भुतासारखे.

मग बागल निराश व्हायचा आणि कपाटात जपून ठेवलेला जुना फोटोंचा आल्बम काढून बघायचा आणि मग एक एक व्यक्ती जिवंत होऊन त्याला समोर दिसायची. प्रथम घर… मग घरातली माणसं. त्याचा तीन नंबरचा भाऊ घर सोडून तरुण वयातच भ्रमिष्ट होऊन गाव सोडून गेलेला असतो. बाळी त्याचा मोठा भाऊ आणि बागल. आजही त्याला शोधत होते. 40 वर्षे झाली या गोष्टीला तरी सापडेल या आशेवर शोधत राहायचो. तसेच आजोबा त्यांच्या म्हातारपणात घर सोडून जाणतेपणी गेले आणि कसे परत आले? बनूमावशीचे लाडू? आईच्या हातचं जेवण? दुपारी अंगणातलं ते खेळणं आणि संध्याकाळी रॉकेलच्या दिव्यावर किंवा कंदिलाच्या उजेडात अभ्यास करणं. हिवाळा, पावसाळा सुसह्य होता. पण उन्हाळा घामोळय़ाने अंगाची गोधडी करून टाकत असे. तशी घरात तीसएक माणसं आणि पाहुणे रोज असायचे. पण कधी वरणभात, कालवण भातासाठी हात पसरावा लागला नाही. भाजी परसातच उगवायची. मासे बाजारातून जाऊन आणायचे. त्या जेवणाला एक सुंदर कोकमाची, खोबऱयाची चव होती. बायकोच्या मुंबईतल्या जेवणाला नव्हती. असा ‘आल्बम’ पाहत तो रोज बसतो. रोज कुणीतरी त्याच्या आल्बममधून बाहेर येतं ते मधूर स्मृतीचा सुगंध घेऊन. ‘आल्बम’ हे बागलचं जगणं होतं. नवीन होतं. निवृत्तीनंतर तो जाणारच होता कोकणात. पत्नीची जेवायला हाक आली तसा उठला. डायनिंग टेबलवर बसला. डायनिंग टेबलवर बसला की त्याला हमखास गावात शेणाने सारवलेल्या जमिनीची आठवण यायची आणि तो वास नाकात सुखावून जायचा. त्या हवेचा दर्प मुंबईच्या प्रदूषणयुक्त हवेला बापजन्मात येणार नाही.

अशी ही ‘आल्बम’ कादंबरी. त्यावर मी पटकथा, संवाद लिहिले. ते दूरदर्शनने मंजूर केले आणि आम्ही कै. दाजी भाटवडेकर, कै. सुधा करमरकर, कै. यशवंत, कु. आशालता, ते , रजनी जोशी इत्यादी मोठय़ा कलाकारांना घेऊन ‘आल्बम’ याच नावानं मालिका करायची ठरवले. दुर्दैवाने जयवंत दळवी यांना ईश्वरआज्ञा झाली. त्यामुळे ते ही मालिका बघू शकले नाहीत. मालिकेचं दिग्दर्शन मीच करणार होतो.

शीर्षकगीत कुणी लिहायचे? असा प्रश्न पडला. संगीतकार म्हणून मी ‘शांक-नील’ या द्वयीला संगीत दिले. पण गीतकार मिळेना. मी ग्रेट पी. के. सावळाराम यांना विचारले. नंतर ठाण्यातल्या आणखी प्रथितयश गीतकारांना विचारले, पण ‘देतो’ सांगून कुणी दिली नाही. मला कविता हवी होती. ती गाणार होते सुरेश वाडकर आणि संजिवनी समेळ. पण गीताचा फॉर्म नको होता. गाणं आधी तयार हवं होतं. मग मी स्वतःला जागवलं. कागद, पेन हातात घेतलं आणि मला ‘आल्बम’ची कविता गवसली-

ते घरकुल माझे। ते घरकुल माझे।

कुणी सख्खे सावत्र कुणी।

कुणी मावस चुलत कुणी।

सगळीच माणसं माझी होती।।

हरवले दिवस ते।

हरवली माणसे ती।

उरल्या फक्त स्मृती

दाटून आल्या उरी।

उघडून आल्बम आल्बम आल्बम।।

त्याचे दुसरे कडवे होते-

आठवणी। त्या आठवणी।

दाटून येती त्या आठवणी।।

आठवणी बेचैन करणाऱया,

आठवणी गंध दरवळणाऱया,

सुगंध देणाऱया आठवणी

फक्त आठवणी।।

पिसाट वाऱयाशी झुंजणाऱया,

अथांग सागराशी झगडणाऱया,

पहाटेच्या गारव्याची झुळूक देणाऱया

रात्रीची हळूवार चादर पांघरणाऱया,

सदैव हव्याहव्याशा वाटणाऱया आठवणी

फक्त   आठवणी

आल्बम आल्बम आल्बम

ही कविता म्हणा, मुक्तकाव्य म्हणा, गाणं म्हणा, सर्वांना आवडलं. कारण ते गोष्टीला धरून होतं…

सुंदर चाल आणि पं. सुरेश वाडकर, संजीवनी समेळने सुंदर गायलं होतं.

माझी मालिका खूप गाजली. सगळय़ात मोठं प्रमाणपत्र दिलं ते भाई ऊर्फ पु. ल. देशपांडे यांनी. त्यांना भेटायला आशालता पुण्याला गेली होती. तेव्हा तिला ते म्हणाले, ‘अगं तुमची ‘आल्बम’ सीरियल मी पाहतो आणि कोकणात जातो. आशालताने हे मला सांगितलं तेव्हा कष्टाचं सार्थक झालं.

पुढच्या फुलोरात सर्व प्रतिष्ठत कवींच्या मला गवसलेल्या कविता तुम्हाला ऐकवीन.