ठसा : किशोर कदम (सौमित्र)

>>प्रशांत गौतम<<

प्रख्यात कवी तथा अभिनेते किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांना जालना येथील ‘दुःखी पुरस्कार’ घोषित झाला. त्याचे वितरण शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी ‘कवितेचा पाडवा’ या कार्यक्रमात झाले. प्रख्यात उर्दू शायर राम हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी जालना येथे ‘कवितेचा पाडवा’ या कार्यक्रमाचे आयोजन होत असते. वीस वर्षांपासून या उपक्रमात सातत्य आहे.

मराठी चित्रपटातील दमदार अभिनय आणि कवितेच्या क्षेत्रातील मुशाफिरी अशी ओळख लाभलेले किशोर कदम ‘सौमित्र’ या टोपण नावाने कविता करतात. दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. मुंबईत 9 नोव्हेंबर 1967 रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आणि काव्यलेखनाची आवड होती. शालेय शिक्षण आरव्हीटीएचएस शाळेत झाले. बी.कॉम. पदवीपर्यंतचे त्यांनी शिक्षण घेतले. मात्र आवडीच्या क्षेत्रास त्यांनी प्राधान्य दिले. काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाएवढेच व्यक्तिमत्त्वात असते. किशोर कदम त्याला अपवाद नाहीत. अभिनयात दमदार भूमिका करताना आणि काव्यलेखन करताना त्यांच्यातील संवेदनशील कलावंत हा रसिकांच्या मनात घर करीत असतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गारवा’ या अल्बमने लोकप्रियतेचे उच्चांक मोडले. नुसते विक्रम मोडले असे नाही तर तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटात स्थान प्राप्त केले. म्हणूनच आज अनेकांच्या ओठांवर ‘बघ माझी आठवण येते का?’ या ओळी अगदी सहज येऊन जातात. ‘ऊन थोडं जास्त आहे’ यासारख्या कितीतरी कविता उदाहरणादाखल सांगता येतील. हे यश कवितेचे आहे आणि अल्बम तयार करणाऱ्या राजश्री प्रॉडक्शनच्या मार्केटिंग विभागाचेही आहे. या ‘गारवा’ अल्बमची लोकप्रियता एवढी वाढली की, त्यांना नवनवीन ऑफर येऊ लागल्या, पण त्यांनी त्या नाकारल्या. हिंदीत गीतलेखन करण्याची ती ऑफर होती.

किशोर कदम हे अभिनेते आणि कवी आहेत. बालपणाच्या प्रवासात त्यांना वडील आणि भावाने मुभा दिली. वास्तविक, कदम यांची आवड आणि घरातील पारंपरिक व्यवसाय ही दोन टोके होती. असे असले तरी कदम यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी वडील आणि भावाची प्रेरणा होती आणि त्याच बळावर ते दोन्ही क्षेत्रांत आपल्या नावाची स्वतंत्र मुद्रा उमटवू शकले.

‘प्रेम आणि पाऊस’ हे सौमित्र यांच्या कवितेत आवर्जून असतेच. नव्हे, ती त्यांच्या कवितेतली खास बाब होय. सौमित्र हे कविश्रेष्ठ गुलजार यांचे चाहते होत. गुलजार यांच्या अनेक कविता त्यांनी मराठीत आणल्या आणि अनेक मराठी कवितांचा अनुवाद हिंदीत झाला. अनुवाद प्रक्रियेच्या भाषिक संवादामुळे दोन भाषांत अनुबंध निर्माण होत गेला. गुलजार यांच्यावरील ‘बात पश्चिमे की’ हा कार्यक्रम सौमित्र सादर करीत असतात.

सौमित्र आणि समुद्र यांचे वेगळेच नाते आहे. किंबहुना, समुद्र हा त्यांच्या जगण्याचा एक भाग झालाय.  त्यांच्या एका गाण्यास आशाताई भोसले यांचे स्वर लाभले आहेत. ‘आपली माणसं’ या चित्रपटासाठी आशाताईंनी गाणे गायिले होते. गाणे संपल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी ‘‘या गाण्याचे गीतकार कोण?’’ असे सहज विचारले. आशाताईंच्या डोळ्यांत आपल्या दमदार लेखनाने पाणी आणणारा कवी सौमित्र होते.

कवी सौमित्र यांचा दहा वर्षांपूर्वी ‘…आणि तरीही मी’ हा कवितासंग्रह आला. दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘बाऊल’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. सौमित्र आणि गुलजार या दोघांनी संयुक्तपणे अनेक वेळा काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर केले. अशा कार्यक्रमांतून त्यांना ऐकणे, अनुभवणे ही रसिकांसाठी मोठी पर्वणीच असते. अर्थात त्यासाठी वाचनही बहुश्रुत असावे लागते. अभिनय आणि काव्यलेखन ही दोन्ही क्षेत्रे परस्परांसाठी पूरकच असल्याने दोन्ही क्षेत्रांतील त्यांचे वाचन तगडे होते. तत्त्वज्ञानाची पुस्तके असोत, ओशो रजनीशांची पुस्तके असोत, नेरुदा असोत की स्पॅनिश कवी असोत, ते वाचतात, रमतातच.  वाचनाचा व्यासंग असल्याने अभिनय आणि कविता सशक्त होत जाते. ‘अभिलाषा’, ‘अवंतिका’, ‘कधी सांजवेळी मला’, ‘गारवा वाऱ्यावर भिरभिर’, ‘ढग दाटूनी येतात’, ‘माझिया मना जरा थांब’, ‘मेघ दाटले’, ‘रिमझिम धून आभाळ भरून’, ‘वादळे उठतात किनारे’, ‘हुरहुर असते तीच उरी’ यांसारखे बहारदार गीतलेखन म्हणजे अभिजात साहित्याचे उत्तम उदाहरण होय. नाटय़ क्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक पं. सत्यदेव दुबे यांचे ते आवडते शिष्य होते. त्यांच्याकडेच अभिनयाचे धडे त्यांनी गिरवले. सिनेक्षेत्रात प्रगती करताना कदम यांना नक्कीच फायदा झाला. अमोल पालेकर दिग्दर्शित ‘ध्यासपर्व’ (मराठी), ‘कल का आदमी’ (हिंदी) या चित्रपटांत कदम यांनी भूमिका केल्या. प्रा. र. धों. कर्वे या संतती नियमनासंदर्भात कार्य करणाऱ्या जगावेगळ्या व्यक्तीची भूमिका कदम यांनी साकारली. अरुण खोपकर यांनी बनवलेल्या नारायण सुर्वे यांच्या लघुपटात कदम यांनी कवी सुर्वेंची भूमिका साकारली. त्याचप्रमाणे ‘फॅण्ड्री’, ‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘बालक-पालक’ या चित्रपटांत कदम यांचा दमदार अभिनय रसिक प्रेक्षकांनी बघितला. ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है’ हा त्यांचा आगामी चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनय आणि काव्यलेखन या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल सौमित्र यांचा विविध पुरस्कारांनी आजपर्यंत गौरव झाला आहे, त्या प्रवासात आता जालना येथील राज्यस्तरीय ‘दुःखी पुरस्कारा’ची भर पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या