
>> साबीर सोलापुरी
अन्याय, अत्याचाराच्या निर्दयी टाचेखाली
चिरडले गल्ली मुहल्ल्यातील उसासे
जातीधर्माच्या द्वेषातून पडले माणुसकीचे मुडदे
सामान्यांच्या दैवाचे उलटे पडते फासे
सामाजिक भान तीव्र असलेल्या कवी मुबारक शेख यांनी आपल्या व्यथा, भावनांना, समाज जाणिवांना कवितेतून वाट मोकळी करून दिलीय. त्यांच्या ‘अजान आणि चालिसा’ कवितासंग्रहातून राजकारणाच्या नावाखाली नाडल्या गेलेल्या माणसांचा रोष आणि खंत संयतपणे, प्रभावीपणे प्रकट झालीय. प्रस्तुत कवितासंग्रह अनेक कळीचे प्रश्न उपस्थित करतो. इथल्या मातीत जन्मलेल्या पिढय़ानपिढय़ा इथंच राहणाऱया, इथल्या मातीवर अविचल निष्ठा ठेवणाऱया देशप्रेमी भारतीय नागरिकांना सुरक्षेची हमी देण्याऐवजी त्यांना विश्वासानं पाठबळ देण्याऐवजी त्यांना हद्दपार करण्याच्या आरोळ्या काही वाचाळ नेत्यांकडून ठोकल्या जातात. त्यामुळे अल्पसंख्याक समाज आज भयभित झाल्याचं चित्र दिसून येतंय.
सर्वसमावेशकता, सार्वमत हा संविधानाचा मूलभूत पाया आहे. परंतु हा पायाच जाणीवपूर्वक उखडून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येतं. ही राजकारणाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. इथं वर्षानुवर्षे गुण्यागोविंदानं राहणाऱया गंगाजमनी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया समाजासमाजात भावनिक मुद्दे मांडून धार्मिक ध्रुवीकरण घडविणाऱया नेत्यांना ‘अजान आणि चालिसा’ हा विषयदेखील हिंसाचार माजविण्यासाठी पुरेसा ठरतो. पण हा मुद्दाच लोकशाहीला गिळंकृत करणारा ठरतो. ‘अजान आणि चालिसा’वरून राजकारण तापू लागतं. निवडणुकीला मुद्दा मिळतो. तोच लोकशाहीला गिळतो. दंगलीच्या अनेक कविता अंतर्मुख करणाऱया आहेत.
होते देशात कुठंतरी हिंस्त्र हरकत
येते त्याला बरकत
उमटतात त्याचे रक्तरंजित पडसाद
वाढत जातो बरबादीचा वाद
दोन्हीकडं लहूचा रंग लाल
इन्सानियतला फासला जातो हरताळ
ही सामान्य माणसाच्या बरबादीची दास्तान कविता विषण्ण करते, लिहिते करते. केवळ संशयावरून एखाद्या निष्पापाला झुंडीनं ठेचून मारणं हे न्यायाचे कसं ठरू शकतं? अशा हिंसाचाराच्या घटना सतत घडताहेत. इथं सर्व काही ‘पेड‘ आहे. द्वेषही ‘पेड‘ आहे अन् दंगलही ‘पेड‘ आहे. मृगजळाच्या वाटेवर संभ्रमाचं जाळं पसरवलं जातंय.
अचानक दंगल उसळलेली
झिंदाबाद–मुर्दाबादच्या घोषणांनी
लोक नखशिखान्त पेटलेले
शिट्टय़ा, लाठीमार, हवेत गोळीबार
तरीही पत्थरांच्या वर्षावाला ‘सीमा’ नसते
स्टेनगनच्या गोळ्यांनी
कित्येकांच्या बदनची चाळणी झालेली
मनामनाची फाळणी झालेली
‘जातीला जात दुश्मन’ या कवितेतून कवीनं मुस्लिम समाजातील विषमतेवर, आंतर्विरोधावर जळजळीत प्रकाशझोत टाकलाय.
कसं बसं चढू तर घेती वाढूनिया सिढय़ा
वरपर्यंत पोचलेल्या घमेंडी अश्रफांच्या पिढय़ा
उर्दू-हिंदीमिश्रित शब्दांच्या नेमक्या येजनेन पडदानशिन जिंदगीतले चित्र सुस्पष्ट होत जाते. मुस्लिम समाजाची मनोदशा उलगडत जाते. फिजूल परंपरेवर कवीने केलेले वार वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते. माणसाचे दुःख, दर्द हे इथून-तिथून सारखेच जातीधर्माच्या पार असलेले. दैन्य, दारिद्रय़ाच्या वरवंटय़ाखाली भरडल्या गेलेल्या आणि बदनशिबीच्या फेऱयात अडकलेल्या जैतुन, चाँदनी, मुमताज, झेबुनिस्सा, मालन राबिया यांच्या अपार कष्टांचे, असह्य दुःखाचे वेगवेगळे कंगोरे मुहल्ल्या मुहल्ल्यातून उजागर होत जातात. त्या अनुभवांचे टोकदारपण कवीमनाला टोचत जाते, ते भळभळत कागदावर उतरते.
वहिदा गाळुनी पसीना बदन मोडून करित काम
घमेली भरून देते मिस्त्राrला
कसं बसं मिळविते दाम
डबा बाटली है क्या लोहा लोखंड
जिंदगीचे तुकडे खंड खंड
इकठ्ठा करत मोडक्या वाकडय़ा
सायकलीवरून पैडल मारत
अहमद दारोदार दौडत असतो अखंड
जीवापाड राबूनही त्यांना वाजवी मोबदला मिळत नाही. मुळात कामधंद्याचा भरवसा नसतो. मुस्लिम समाजाच्या बेरोजगारांचे आंर्तबाह्य शोषणाचे चित्रण विविध कवितांमधून येते. एरवी कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा कित्येक विषयांना कवीने कवितेचे विषय बनवले आहे. ‘अजान आणि चालिसा’ हा कवितासंग्रह निराळ्या जीवनविश्वाचे दर्शन घडविणारा आहे. तो मराठी काव्य, वाङ्मयास अधिक व्यापक आणि समृद्ध करणारा आहे याची नोंद घेणे जरुरीचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी या अनुभवसंपन्न चित्रकाराचे आशयपूर्ण मुखपृष्ठ तितकेच बोलके आहे.
अजान आणि चालिसा
कवी ः मुबारक शेख
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे ः 90, मूल्य ः 150 रु.