वेब न्यूज – पोलोनियम – 210

>> स्पायडरमॅन

जेव्हा कधी विषाची चर्चा होते, तेव्हा जगातील सर्वात घातक विष कोणते, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. आपल्यापैकी अनेक लोक सहजपणे त्याचे उत्तर सायनाईड असे देतात. मात्र सायनाईडलादेखील मागे टाकेल असे एक अत्यंत धोकादायक विष आहे पोलोनियम- 210. अवघ्या एक ग्रॅम पोलोनियम-210मुळे हजारो लोकांना मृत्यू येऊ शकतो असे म्हणतात. पोलोनियम-210 हा खरेतर एक किरणोत्सर्गी घटक आहे. याचा शरीरात प्रवेश होताच त्याच्या किरणोत्सर्गी प्रभावाने अंतर्गत अंग आणि डीएनएदेखील नष्ट व्हायला सुरुवात होते. हा मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती क्षणात संपवण्याची ताकद ठेवतो. पोलोनियम-210मुळे मृत्यू पावलेल्या मृतदेहात या विषाचे अस्तित्व शोधणेदेखील जवळपास अशक्य आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, हिंदुस्थानसारख्या प्रगत देशात तर अशी चाचणी करण्याची सोयदेखील उपलब्ध नाही. रसायन आणि भौतिकशास्त्रातील एक जगविख्यात नाव म्हणजे संशोधक मेरी क्युरी. शुद्ध रेडियमच्या पृथक्करणावरील त्यांच्या कार्यासाठी मेरी क्युरी यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक, तर रेडिओऑक्टिव्हिटीच्या शोधाबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. या प्रख्यात मेरी क्युरी यांनी पोलोनियम- 210चा शोध 1898 मध्ये लावला. आधी त्याचे नाव ‘रेडियम एफ’ असे ठेवण्यात आले होते, जे पुढे बदलण्यात आले. असे सांगतात की, दुर्दैवाने या विषाचा पहिला बळी मेरी क्युरीची मुलगी ईरीन ज्युलिएट क्युरी होती. तिने दुर्दैवाने या विषाचा एक कण चाखला आणि त्याच्या प्रभावाने तिचा मृत्यू झाला. शरीरात शिरताच डीएनए, रोगप्रतिकारक शक्ती आणि अंतर्गत अवयवांवर क्षणात हल्ला करणाऱया या विषाला खाद्यपदार्थात मिसळल्यास त्याचे अस्तित्व कळणेदेखील अशक्य बनते. दिवंगत पॅलिस्टीन नेते यासर अराफात यांचा मृत्यू याच विषाने झाल्याचा दावा करण्यात आला होता. दफन केल्यानंतर त्यांचे प्रेत अनेक वर्षांनी पुन्हा बाहेर काढण्यात आले होते. त्या शरीरात पोलोनियम-210 आढळल्याचा दावा स्विस संशोधकांनी केला होता.