
आपल्याकडील पदार्थांत कमालीचे वैविध्य आहे. त्यातही जाता येता तोंडात टाकता येणाऱया पदार्थांची संख्या विलक्षण आहे. या सहज चाळा म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचेही पोषणमूल्य जपण्याचा धोरणी विचार आपल्या पूर्वजांनी केलेला दिसतो. असाच सामान्य वाटणारा, पोटाला आधार देणारा, पण तरी लोकप्रिय पदार्थ म्हणजे चिक्की. या चिक्कट चिक्कीची ही गोड कहाणी.
साधारणपणे चिक्कीचे जन्मस्थान म्हणून लोणावळय़ाकडे बोट दाखवले जाते. लोणावळय़ाच्या आसपास सातत्याने विकली जाणारी चिक्की पाहता तसे वाटणे स्वाभाविक आहे, पण प्रत्यक्षातील इतिहास वेगळा आहे.
आपल्याकडे प्रवासातून, उन्हातून आलेल्या पाहुण्यांचा बाकीचा पाहुणचार होण्याआधी गुळपाणी द्यायची पद्धत होती. पाण्याचे भांडे, गुळाचा खडा आणि काही वेळा शेंगदाणे असे दिले जायचे. हे खाऊन पाहुण्यांनी दम खाल्ला की, मग पुढचा पाहुणचार. गुळाचा खडा आणि शेंगदाणे ऊर्जा देत असत.
या पद्धतीतून मग पुढे गुडदाणी किंवा गुडदाणासारखा पदार्थ जन्माला आलेला दिसतो. याच गुडदाणीचे अधिक विस्तारलेले रूप म्हणजे चिक्की. एक प्रकारे हे गरीबांचे ऊर्जादायी खाणे म्हणता येईल. कारण त्यात वापरले जाणारे घटक स्वस्त आणि मस्त होते. ही चिक्की किंवा आधीची गुडदाणी घरोघरी सहज बनवलेल्या पदार्थांपैकी एक होती. तिला नेटके रूप देत, त्याचे व्यावसायिक मार्पेटिंग करत चिक्कीला विशेषत्व प्राप्त झाले आणि हे सगळे ज्या प्रांतात, लोणावळय़ात घडले तोच प्रांत चिक्कीशी जोडला गेला. हे कसे घडले याची कथाही खास आहे
ब्रिटिश काळात 1888 साली मुंबई-लोणावळा रेल्वेमार्गाचे काम सुरू होते. याच परिसरात मगनलाल अगरवाल यांचे छोटेसे मिठाईचे दुकान होते. त्या दुकानात गुडदाणा विकला जायचा. उत्तर हिंदुस्थानात आवडीने खाल्ला जाणारा हा पारंपरिक पदार्थ! तिथे काम करणारे कामगार हे मगनलाल यांचे हक्काचे गिऱहाईक होते. गूळ व दाणे यामुळे खूप सारी ऊर्जा मिळत असे. हा पदार्थ चवीलाही चांगला होता. सहज जाता जाता तोंडात टाकण्यासारखा होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो खिशाला परवडणारा होता. मगनलाल यांनी या गुडदाण्याला ‘मगनलाल चिक्की’ या ब्रँडनेमसह विकायला सुरुवात केली. पुणे रेल्वे स्थानक तसेच पुणे महामार्ग देशातल्या महत्त्वाच्या मार्गावर असल्याने पुणे-मुंबई किंवा त्याच मार्गाने पुढे प्रवास करणाऱया प्रवाशांच्या वाटेवर लोणावळा हे चिक्की घ्यायचे हक्काचे ठिकाण ठरले. तिथून चिक्कीची लोकप्रियता वाढली.
अशी ही म्हटले तर लोकल आणि म्हटली तर ग्लोबल चिक्की आबालवृद्धांना प्रिय आहे. कवळी लावलेले दात चघळत तिचा आस्वाद घेतात, तर चिल्ल्यापिल्ल्यांना तिचा गोडवा भावतो. शेंगदाण्यासह राजगिरा, खोबरे, डाळी, काजू, बदाम आणि हवे हवे ते पदार्थ गुळात डुबकी मारून चिक्की रूपात समोर येतात. तुकडा मोडताच दाताच्या अणुरेणूंना व्यापणारी चिक्की म्हणजे चिकट गोडव्याची न सोडणारी अपूर्वाई.
याचा अर्थ चिक्की फक्त महाराष्ट्रातच लोकप्रिय आहे का? तर तसे नाही. वेगवेगळय़ा प्रांतांत चिक्कीची वेगवेगळी नावे आहेत. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ती ‘लाइय्या पट्टी’ आहे, सिंधी लोकांची ‘लायी’. गंमत म्हणजे ब्राझीलमध्येही चिक्कीसारखाच पदार्थ खाल्ला जातो, ‘पे-द-मोलेक’ असं त्याचं नाव. पराग्वे देशात चिक्कीसदृश ‘ka-ladrillo’ नावाचा पदार्थ आढळतो. परदेशात ‘पिनट ब्रिटल’ अर्थात चिक्कीसारखा पदार्थ पँडी म्हणून खाल्ला जातो. मात्र तिथे गुळाऐवजी साखर आणि कॉर्न सिरप जोडणीला वापरतात.




























































