लोकपरंपरेचा जागर

गोंधळ, जागरण, जोगवा… ही आपली पारंपरिक लोकपरंपरा…आजही कोणत्याही शुभकार्याआधी कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी या सर्व प्रथा पार पाडल्या जातात. संबळ, तुणतुण अशा वाद्यांच्या साथीनं गाणं आणि नृत्याच्या तालावर भक्त देवीची आळवणी करतात. पूर्वापार सुरू असलेल्या या लोककला जपणारा ‘जागर कुलस्वामिनीचा’ हा कार्यक्रम खास नवरात्रोत्सवानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कलारंजन मुंबई निर्मित या कार्यक्रमाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि संकल्पना उदय साटम यांची आहे. ठाणे, मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाबाबत ते सांगतात, देवीदेवतांचा महिमा सांगणारा हा कार्यक्रम निवेदन, नृत्य आणि गाण्यांच्या साथीनं साकारण्यात येणार आहे. यामध्ये आताच्या आणि पूर्वीच्या लोकप्रिय पारंपरिक जोगवा, गोंधळ आणि जागरण गीतांचा समावेश असणार आहे. तसेच खंडोबा, अंबाबाई, सरस्वती, महालक्ष्मी या देवींचा महिमा, त्यांची शिकवण, त्यांची युद्धकला यांचा रसिकांना नृत्य, नाटय़ आणि संगीताच्या साथीनं आनंद घेता येईल. शिवाय देवीची साडेतीन शक्तिपीठं, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, जेजुरी अशा स्थानांचे माहात्म्य वर्णनही ऐकता येईल.

50 कलाकारांचा सहभाग

गोंधळ, जागरण आणि जोगवा या प्रत्येक परंपरा वेगवेगळ्या पद्धतीने कशा पार पाडल्या जातात? कुलाचार, वाघ्या-मुरळींची गीतं आणि नृत्यातून केलेली खंडेरायाची स्तुती, नमन, आवाहन, मल्हारी कथन, काकडय़ा गोंधळ, संबळ गोंधळ,  लोकपरंपरेतील या अनेक प्रथा संगीत, नृत्याद्वारे सादर करण्यासाठी 50 कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

स्त्री सशक्तीकरणाचा संदेश

शत्रूचा संहार करण्यासाठी आदिमायेची म्हणजे देवीच्या रूपांची प्रार्थना केली जाते. विविध वाद्यांचे नाद, सूर आणि नृत्य करत तिची आळवणी केली जाते. कुलस्वामी, ग्रामदेवता ही जशी शक्तीची वेगवेगळी रूपे आहेत तशीच सुप्त शक्ती प्रत्येक स्त्र्ााrमध्येही दडलेली आहे. योग्य वेळी तिने तिचा वापर करायला हवा असा  स्त्री सशक्तीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्नही कार्यक्रमाद्वारे केला आहे. त्यामुळे मनोरंजनासह प्रबोधनाचा हेतूही साध्य होईल, असे मत उदय साटम व्यक्त करतात.

आपली प्रतिक्रिया द्या