ठसा – प्रकाश कामतीकर

1644

>> प्रशांत गौतम

कवी, लेखक, समीक्षक, चित्रकार, पत्रकार अशा विविध क्षेत्रांत प्रकाश कामतीकर यांचा दबदबा होता. लघुनियतकालिकाच्या प्रवासात त्यांचे लक्षणीय योगदान होते. त्यांच्या निधनामुळे या सर्वच क्षेत्रांची हानी झाली आहे. मराठी साहित्याच्या विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारा अवलीया कलंदर आता चिरंतनाच्या प्रवासाला गेला आहे. ऐन कवितादिनी कवी किशोर पाठक यांच्या निधनाची बातमी आली. गुरुवारी जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी एका लेखक, कवी, चित्रकाराचे आपल्यातून निघून जाणे हे त्या क्षेत्रातील चाहत्यांसाठी क्लेशदायकच आहे. आपल्याच धुंदीत, मस्तीत जगणारा हा मनस्वी कलावंत होता. जालना येथे 9 ऑक्टोबर 1943 साली जन्मलेले प्रकाश कामतीकर प्रदीर्घकाळ सेलू येथे होते. तेथील नूतन महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. अलीकडच्या काळात पुण्यात स्थायिक झाले होते. सेलू येथील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी साहित्यविषयक अनेक उपक्रम, वाङ्मयीन चळवळी, लघुनियतकालिकांची चळवळ सुरू केली. 1970 च्या काळात कामतीकर यांनी ‘स.न.वि.वि.’ या नावाचे वाङ्मयीन अनियतकालिक आंतर्देशीय पत्रावर प्रकाशित केले. संपादक, मुद्रक, प्रकाशक सबकुछ कामतीकर असायचे. 1972 ते 82 या दशकभराच्या काळात त्यांनी मराठवाडा दिवाळी अंकाच्या कला विभागाचे साक्षेपी संपादन केले. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र असणाऱया वाङ्मयीन नियतकालिक ‘प्रतिष्ठान’च्या संपादक मंडळावर 1976 ते 1996 आणि पुढे 2000 पर्यंत कार्यरत होते. विविध गौरवअंक, स्मरणिका, वाङ्मयीन नियतकालिकाचे ते साक्षेपी संपादक म्हणून परिचित होते. व्यासंगी लेखक आणि कवी म्हणून त्यांचे लेखनकार्य अनेकजण जाणतात. स्वप्नगंधा (ललित लेखसंठाह), शब्दुली (कथासंठाह), तिसरी घंटा (नाटय़) शब्दांकित (कवितासंठाह), रंगसप्तक (बालनाटय़), त्रिविधा (समीक्षासंठाह), शब्दांनो मागुते या (संकलन), थोडं असं, थोडं तसं (विनोदी), संगीत सौभद्र, भाऊसाहेबांची बखर, उपयोजित मराठी भाग- एक (संपादन) अशी विविध वाङ्मयप्रकारातील साहित्य संपदा मराठी साहित्याचे जाणकार आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाची आहे. संपादक, लेखक, कवी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडणारे कामतीकर जालना येथे 1962 ते 1970 या काळात विविध दैनिकांचे पत्रकार होते. एवढेच नव्हे तर 1966 ते 1969 या काळात संभाजीनगर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्या आधी म्हणजे 1964 ते 1969 या काळात जालना तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस होते. एवढे सर्व व्याप सांभाळून कामतीकर विविध साप्ताहिक, दैनिक, वाङ्मयीन नियतकालिकांसाठी सदर लेखनही करीत असत. तसेच विविध पुस्तकांना प्रस्तावना, ब्लर्ब (पुस्तकाचे शेवटचे पान) लिहीत असत. स्वत: एक संवेदनशील कवी आणि चित्रकारही असल्याने त्यांच्या कविता मराठी, हिंदी, इंठाजी, बंगाली, मल्याळम भाषेतील प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध होत. कविता आणि रेखाटन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा गुणविशेष सांगता येईल. देशभरातील नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱया मान्यवर कवींच्या कवितेवर प्रकाश कामतीकर यांचे रेखाटन असायचे. विविध पुस्तकांना कामतीकर यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ असायचे. वाङ्मयीन नियतकालिक मग मराठी, हिंदी, इंठाजी अथवा बंगाली- मल्याळम असो, त्यातील कथा-कवितेवर रेखाटने ही त्यांची असत.

विविध वाङ्मयप्रकारातून लेखन करणारे कामतीकर विविध साहित्य संमेलनांच्या आयोजनात पदाधिकारी म्हणून सहभागी असत. सेलू येथील बालसंस्कार प्रतिष्ठानच्या उपक्रमात, विनायकराव चारठाणकर प्रति‰ानच्या उपक्रमात सहभागी असत. 1992 साली ‘अस्मितादर्श’चे दलित साहित्य संमेलन जालना येथे भरले होते. त्यातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद कामतीकर यांनी भूषविले होते. या सर्व लेखनकार्याचा विविध मानसन्मान, पुरस्कारांनी गौरव झाला होता. मात्र मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान त्यांच्या वाटय़ाला येऊ शकला नाही. कवी केशवसुत, मर्ढेकरांच्या कविता जेवढय़ा तन्मयतेने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असत, तेवढय़ाच तन्मयतेने दृष्टांतपाठ आणि भाऊसाहेबांची बखरही शिकवायचे. पुस्तकदिनाच्या दिवशी प्रकाश कामतीकर यांच्या निधनाची बातमी आली. त्याची हळहळ साहित्य, कला क्षेत्रातील चाहत्यांना वाटणे स्वाभाविक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या